प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.

पेशव्यांचा उदय व राज्य पद्धतींतील फरक - १७०८ पासून मराठी सत्तेचा उत्तरार्ध सुरू होतो. त्यांतील विशेष म्हणजे (१) मराठी राजे दुर्बल बनून पेशव्यांच्या हातांत खरी सत्ता जाणें, (२) मराठी राज्याची वाढ मराठी साम्राज्यांत होणें, व (३) त्याबरोबरच शिवाजीनें घालून दिलेली राज्यपद्धति बदलून तिच्यांत फेरफार करणें.

या उत्तरार्धाचें म्हणजे १७०८ पासून १८१८ पर्यंतच्या इतिहासाचें तीन भाग पडतात; (१) पेशव्यांचा उदय व साम्राज्याची स्थापना १७०८-१७६०, (२) पानिपतचा आघात वे त्याचें निवारण १७६१ ते १७८५, व (३) मराठी सत्तेचा -हास व नाश १७८५ ते १८१८.

१७०८ मध्यें मराठी राजघराण्यांत दुफळी झाल्यामुळें मंत्रिमंडळांत व मराठे सरदारांतहि दुफळी झाली. स्वतः शाहूराजा मोंगली दरबारांत वाढल्यामुळें दगदग सोसून राज्यकारभाराचें किंवा स्वा-या लढायांचें काम जातिनिशी करण्याचें कर्तृत्त्व किंवा उमेद त्याच्या अंगीं नव्हती. अशावेळीं लेखणीबहाद्दर व तरवारबहाद्दर असा सव्यसाची इसम शाहूला पाहिजे होता. बाळाजी विश्वनाथ हा सदरहू गुणांत लायक दिसतांच शाहूनें त्याच्याकडे महत्त्वाच्या कामगि-या देतां देतां अखेर त्यानें त्याला आपला मुख्य प्रधान उर्फ पेशवा नेमिलें. बाळाजीनें प्रथम खटावकराचें व थोराताचें बंड मोडलें व आंग्-यास शाहूच्या पक्षास वळविलें. अशा रीतीनें मराठी राज्यांत शांतता व सुव्यवस्था स्थापन करून बाळाजीनें १७१५ पासून दिल्लीकडील कारस्थानांत लक्ष घातलें. अवरंगजेबानंतर प्रांतोप्रांतीचे मुसुलमान सरदार बादशाही अंमल झुगारून देऊन स्वतंत्र होण्याची खटपट करूं लागले, व त्यामुळें दिल्लीस अनेक पक्ष उद्भवून बादशाही सत्ता दुर्बल बनली. दिल्लीचे बादशाहा व त्यांचे वजीर सय्यदबंधू यांच्या आपसांतील सामन्यांचा फायदा घेऊन बाळाजीनें शिवाजींचें राज्य व नवीन जिंकलेला खानदेश, गोंडवण, व-हाड, हैदराबाद व कर्नाटक ह्या सर्व मुलुखाची सनद, मोगलांच्या दक्षिणेंतील मुलुखावर चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मिळविले. हा तह मोठा कारस्थानीपणाचा आहे. एकीकडे बाळाजीनें बादशहास दहा लाख खंडणी कबूल करून मोंगलांचें मांडलिकत्व पत्करलें, तर उलट चौथाई सरदेशमुखीचें उत्पन्न घेऊन त्याऐवजीं बादशाहाच्या मदतीकरितां पंधरा हजार फौज ठेवण्याचा करार केला. या दुस-या कलमाचा परिणाम वेलस्लीच्या सबसिडियरी सिस्टिमसारखा झाला. बादशाहा मराठ्यांच्या कह्यांत आला, दिल्लीच्या कारभारांत मराठ्यांचा हात शिरकला, व बादशाहाचे शत्रू प्रांतोप्रांतीचे मुसुलमान सरदार यांचा पाडाव करण्याची कामगिरी मराठ्यांनां मिळाली, म्हणजे स्वराज्याबाहेर पडून इतर प्रांत जिंकून घेण्याची संधि आयती मिळाली. तात्पर्य, हा बाळाजीनें मोगल बादशहाबरोबर केलेला तह म्हणजे मराठ्यांनां मिळालेली साम्राज्याची सनदच होय.

हा क्षण मराठी सत्ताधा-यांच्या मोठ्या परीक्षेचा होता. तलवारबहाद्दरांनां पराक्रम करून साम्राज्य कमावण्यास ही सोन्याची संधि मिळाली व तिचें चीज मराठे वीरांनीं करून १७२० ते १७६० या चाळीस वर्षांत दिल्लीअटकेपासून तंजावरापर्यंत मुलुख मराठी सत्तेखाली आणला. पण त्याबरोबर लष्करी व मुलकी कारभाराची पूर्ण विभागणी करून स्वराज्य व साम्राज्याचा नवा जिंकलेला मुलुख यांत सुधारलेली शासनपद्धति सुरू करणें जरूर होतें. यूरोपांत याच सुमारास ब्रिटिश साम्राज्यांची वाढ होत होती. इंग्लंडमध्यें प्रधानमंडळ सर्व सत्ताधारी राहून त्याच्या हुकूमाखालीं सेनापती दूरदूर देशीं पराक्रम करून मुलुख साम्राज्यास जोडीत होते, आणि जिंकलेल्या मुलुखाची व्यवस्था पाहणारे मंत्री व मुलकी अधिकारी निराळे व पगारी होते. वंशपरंपरा अधिकारी कोणकडेहि चालत नव्हता. उलटपक्षीं मराठ्यांनी जिंकलेल्या मुलुखांत सरंजामी पद्धति सुरू केली. शिवाजीची कामगारांस रोख तनखा देण्याची व अष्टप्रधानांत कामाची वाटणी स्पष्टपणें करण्याची व्यवस्था बंद होऊन जहागि-या व पिढीजाद नोक-यांची पद्धति सुरू झाली.