प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
बहामनी राज्याचीं शकलें व हिंदूंचें वर्चस्व. - बहामनी राज्यापासून पुढें जीं पांच मुसुलमानी राज्यें निर्माण झाली त्यांत तर हिंदू सरदारांचें वर्चस्व पूर्वींहूनहि वाढत्या प्रमाणांत होतें. अहमदनगरच्या निजामशाही घराण्याचा संस्थापक मलीक अहंमद हा वस्तुतः एका ब्राह्मण कुळकर्ण्याचाच मुलगा असून लहानपणींच त्यास सुलतान अहमदशहा वली यानें बाटवून मुसुलमानी धर्माची दीक्षा दिली होती. त्याचा पुत्र बु-हाण निजामशहा यानें १५२९ च्या सुमारास आपल्या राज्यांतील पेशवाईची जागा एका ब्राह्मणाच्या हवालीं करून आपण होऊनच आपल्या राज्यांत हिंदूंचे वर्चस्व वाढवून घेतलें. १५५५ सालीं विजापूरचा इब्राहिम अदिलशहा तख्तनशीन झाला तेव्हां त्यानें देखील महाराष्ट्रांतील लोकांबद्दलच आपला पक्षपात व्यक्त केला. त्यानें फारशीमध्यें जमाखर्च ठेवण्याची जुनी वहिवाट बंद करून सर्व हिशेब मराठींत ठेवण्याचा शिरस्ता पाडला. कांहीं महत्त्वाचे कागदपत्र असत तेवढे मात्र दोन्ही भाषांतून लिहून ठेवण्याचा प्रघात असे. याच्या योगानें विजापुरच्या राज्यांत महाराष्ट्रीय ब्राह्मणांचें वर्चस्व साहजिकच पूर्वीपेक्षां अधिक झालें. इब्राहिम आदिलशहा एवढेंच करून थांबला नाहीं. त्यानें परकी शिपायांस व सरदारांसहि आपल्या नोकरींतून कमी करून त्यांच्या जागीं दक्षिणी लोकांची भरती केली. [ग्रँट डफ पु. १. पृ. ५९].