प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
बलाढ्य मराठे सरदारांचा उदय.- सोळाव्या शतकाच्या अखेरीस आदिलशाही व निजामशाही राज्यांत लुकली जाधव, गणेजी नाईक निंबाळकर, शहाजी भोसले यांच्यासारखे बलाढ्य सरदार निर्माण होण्यास तेथील मुसुलमानी बादशहांचें वर सांगितलेलें धोरणच बहुतांशीं कारण झालें होतें हें वरील विवेचनावरून स्पष्ट होईल. जाधवराव हे त्या काळीं केवढें मोठें बलाढ्य प्रस्थ समजलें जात होतें हें इ. स. १६२० त जाधवराव निजामशाही सोडून मोंगल पक्षास जाऊन मिळाला तेव्हां मोंगल बादशहानें त्याचा पराकाष्ठचा गौरव करून शहाजाद्याससुद्धां सहसा मिळावयाची नाहीं अशी २४००० स्वारांची मनसब त्यास एकदम देऊन टाकली या एकाच उदाहरणावरून सहज ध्यानांत येईल. वणगोजी नाईक उर्फ जगपाल हा विजापूरच्या आदिलशाहींतील एक सरदार होता. तथापि तो चळवळ्या व धाडसी स्वभावाचा माणूस असल्यामुळें कोठेंहि लढाई निघाली कीं, तेथें तो हरज असावयाचाच. वणगोजीचा दक्षिणेंतील मुसुलमानी राजांस किती वचक होता हें 'राव वणंगपाळ बारा वजीरांचा काळ' ह्या एका जुन्या म्हणीवरून व्यक्त होतें. तिसरा जो शहाजी त्यास मलिकंबरानें निजामशहाकडून सरलष्करीचा अधिकार देवविला होता. सरलष्करचा हुद्दा हा जवळ जवळ सेनापतीइतकाच महत्त्वाचा आहे. याच शहाजीनें शहाजहान बादशहा तख्तनशीन झाल्यावर त्याच्या विरूद्ध बंड करणा-या खानजहान लोदीस मदत करण्याचें धाडस केलें, व त्यानेंच पुढें सन १६३३ मध्यें निजामशाहीच्या तख्तावर एक बाहुलें बसवून त्याच्या नांवावर दिल्लीपतींच्या प्रचंड सेनेस तीन वर्षे सर्व महाराष्ट्रभर इकडून तिकडे नाचविलें.