प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
नूतन राज्याचा बंदोबस्त.- (१६४६-१६५४) शिवाजीचा पहिला उद्योग केवळ जाहागिरीपुरताच होता. परंतु आजूबाजूचा प्रदेशहि त्याच धर्तीचा असून शिवाजीला तो सर्व सलंग्न करून किल्ले, फौजा व राज्यव्यवस्था यांनीं तो मजबूत करावयाचा होता. इ. स. १६४६ पासून पुढें जवळ जवळ आठ वर्षेपर्यंत शिवाजीचे प्रयत्न ह्या दिशेनेंच चालले होते. इ. स. १६४६ त तोरण्याच्या किल्लेदाराशीं संधान बांधून त्यानें तो किल्ला आपल्या हस्तगत केला व त्याच सुमारास तोरण्याच्या आग्नेयीस तीन मैलावर राजगड नांवाचा दुसरा एक किल्ला बांधला. या दोन किल्ल्यांचा शिवाजीस बांदल नांवाच्या एका बंडखोर देशमुखास दस्त करण्याच्या कामीं फार उपयोग झाला. सुप्याचा अधिकार शिवाजीचा सावत्र मामा संभाजी मोहिते याजकडे होता. तो शिवाजीला साह्य करण्यास तयार नसल्यामुळें शिवाजीनें त्याला पकडून वडिलाकडे कर्नाटकांत रवाना केलें. चाकण येथें फिरंगोजी नरसाळा नांवाचा किल्लेदार होता त्यास वश करुन तो किल्ला शिवाजीनें आपल्या स्वाधन करून घेतला व नंतर पुढें पुरंदर व सिंहगड हे दोन किल्लेहि असेच युक्तिप्रयुक्तीनें आपल्या कबजांत घेतले.
हळू हळू शिवाजी अधिकाधिक हिंमतीचीं कृत्यें करूं लागला. एकदां त्यानें कोकणांतून विजापुरात जात असलेला खजिना हस्तगत केला व कांगारी, तिकोना व लोहगड हे किल्ले काबीज करुन उत्तरेकडील मावळ प्रांत आपल्या ताब्यांत आणला. ह्याच सुमारास कल्याण प्रांत व त्यांतील किल्लेहि काबीज करण्यांत आले. कोंकणामध्यें शिद्दयाच्या जुलुमामुळें त्याच्या अंमलास लोक इतके त्रासले होते कीं, त्याच्याच कांहीं सरदारांनीं शिवाजीस त्याच्या मुलखावर स्वारी करुन येण्याची भर दिली. त्याप्रमाणें शिवाजीनें शिद्दयाच्या मुलुखांत शिरुन त्याचे तळें व घोसाळें हे दोन किल्ले काबीज केले. याच स्वारींत रायरीचा डोंगरहि शिवाजीच्या ताब्यांत येऊन त्या ठिकाणीं त्यानें लिंगाणा नांवाचा एक मजबूत किल्ला बांधला. हाच किल्ला पुढें रायगड नावानें प्रसिद्धीस आला. एवढेंच करुन शिवाजी स्वस्थ बसला नाहीं. शिद्दयाच्या अप्रियतेचा फायदा घेऊन त्यानें त्याच्या राजापुर बंदरावरहि स्वारी केली, व तें हस्तगत करुन विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, रत्नागिरी, खारेपाटण वगैरे ठिकाणीं आपला अंमल बसविला. सारांश, इ. स. १६४६ पासून पुढें तीन चार वर्षांच्या अवधींत शिवाजीनें कल्याणपासून राजापुरापर्यंतची कोंकणपट्टींतील मुख्य मुख्य ठिकाणें, तसेंच तेवढ्या टापूंतील घांटमाथ्यावरील मोठमोठे किल्ले हस्तगत केले. नकाशावर वसईवरुन इंदापूरपर्यंत एक रेंघ काढून, इंदापुरावरुन कोंकणांत राजापुरापर्यंत दुसरी रेघ काढली म्हणजे राजापुरापासून वसईपर्यंतचा किनारा ही पायाची रेषा धरुन इंदापूरच्या शिरोबिंदूवर जो त्रिकोण होईल तेवढा टापू आतां स्थूल मानानें शिवाजीच्या कबजांत आला होता. (मराठी रियासत पृ. २०५.)
अर्थात हा शिवाजीचा नवीन उपक्रम विजापूरच्या दरबारास रुचण्यासारखा नव्हता. शिवाजी जेव्हां किल्ले काबीज करून स्वतःच्या मुलखाचा बंदोबस्त करूं लागला तेव्हां त्याचा स्वतंत्र होण्याचा उद्देश स्पष्ट दिसून येऊन त्याला आंतून शहाजीची फूस असली पाहिजे, अशी विजापुरकरांस शंका येऊं लागली.
इ. स. १६४७-४८ च्या सुमारास त्यांनीं शहाजीस पकडून मुलाचा बंदोबस्त कर नाहीं तर तुला भिंतींत चिनून मारूं अशी त्यास भीती घातली. शिवाजीस हें समजलें तेव्हां त्यानें श्हाजहान बादशहाकडे वकील पाठवून त्याची नोकरी करण्यास आपण तयार आहों असें दाखविलें. श्हाजहानास शहाजीची व ऐकीव माहितीवरून शिवाजीची योग्यता ठाऊक होती. हे अनकूल झाले असतां विजापुरचें राज्य जिंकण्यास विलंब लागणार नाहीं अशा समजुतीनें त्यानें शहाजीस सोडण्याविषयीं विजापुरच्या सुलतानास पत्र पाठविलें. बादशहाचा हुकूम आल्यावर शहाजीस अपाय करण्याची विजापुरकरांची छाती नसल्यामुळें १६४९ च्या अखेरीस शहाजीची सक्त कैद कमी होऊन त्यास विजापुरांत नजरेखालीं रहाण्याची परवानगी मिळाली. याप्रमाणें शहाजीच्या जिंवावर आलेलें संकट टळलें. तरी जोपर्यंत तो विजापुरांतच होता तोपर्यंत शिवाजीस विजापुरकरांच्या वाटेस जातां येईना. यामुळे पुढील तीन वर्षें शिवाजीस आपल्या राज्याची अंतव्यवस्था करण्यांतच घालवावीं लागलीं असें दिसतें; व नंतरहि १६५५ च्या नोव्हेंबरांत मोरे प्रकरण हातांत घेईपर्यंत शिवाजीनें कोठें स्वारी केल्याचें उपलब्ध नाहीं. दरम्यान इ. स. १६५२ त विजापुरकरांनीं मात्र शिवाजीस पकडण्याचा एकदां प्रयत्न करून पाहिला. परंतु शिवाजीनें त्यांजकडून आलेल्या बाजीशामराव नांवाच्या सरदारावर हल्ला करून त्याचा मोड केल्यामुळें तो प्रयत्न फसला.
हा काळ पावेतों शिवाजीचे प्रयत्न आपल्या बापाच्या जहागिरींत स्वतंत्र राज्याची स्थापना करून तिचा बंदोबस्त करण्यांतच खर्च झाले होते. परंतु यापुढें त्यानें आसमंतांतील राज्यांशीं युद्धे करून आपल्या राज्याचा विस्तार करण्यास प्रारंभ केला. हें कार्य साधण्यासाठीं त्यास साहजिकच प्रथम ज्याच्या राज्यांत त्यानें स्वतंत्र राज्य स्थापण्यास सुरवात केली होती त्या विजापुरकरांशीं युद्ध करावें लागलें.