प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
पेशव्यांच्या अधिकाराचें स्वरूप.- पेशवाईच्या अधिकारासारखा अधिकार दुनियेंत कधीं कोणीं चालविला नसेल ! पेशवे दिल्लीच्या बादशहाचे सुभेदार, छत्रपतींचे प्रधान व आपल्या स्वतःच्या राज्यापुरते मालक होते. हे तीन विजातीय संबंध एके ठिकाणीं आल्यामुळें पेशव्यांचें राज्ययंत्र बरेच बिकट व नाजूक झाले होतें ! बादशहाच्या नोकरांशीं म्हणजे सुरत, जंजिरा, सावनूर, अर्काट वगैरे संस्थानांच्या नबाबांशीं दोस्त सरकार या नात्यानें त्यांस वागावें लागे. हे संस्थानिक चौथसरदेशमुखीच्या ऐवजीं फक्त खंडणी देण्यास पात्र होते. निजामाशीं पेशव्यांचा संबंध त्याहून अधिक निकट होता. कारण कीं, मोंगलाईच्या सहा सुभ्यांत ठाणीं बसवून चौथसरदेसमुखीचा वसूल परभारें घेण्याचा प्रघात पेशव्यांनीं यापूर्वीं पुष्कळ दिवस पाडला होता. त्यामुळें मोंगलाईचें व पेशवाईचें नफानुकसान एकच असल्यामुळें हर्षामर्षाचे प्रसंग वारंवार येत. हे सर्व परके संस्थानिक वगळले म्हणजे राज्यांत पेशवाईस स्वतःहूनहि वरिष्ठ अशी दोन संस्थानें होतीं. त्यांपैकीं पहिलें सातारकर छत्रपतीचें संस्थान पूर्णपणें त्यांच्या ताब्यांत होतें. पण दुस-या म्हणजे करवीर संस्थानाचा प्रकार निराळा होता. तें संस्थान कोणासहि खंडणी देण्यास पात्र नसून हल्लीं स्वतः पुरतें स्वतंत्र व पृथक झालें होतें. इतकें असून पुनःशिवशाहीमध्यें त्याचा अंतर्भाव होतच होता ! त्या खालचा दर्जा नागपूरकर व अक्कलकोटकर भोसले, गायकवाड, प्रतिनिधि, सचिव, आंग्रे व वाडीकर सावंत इत्यादि संस्थानिकांचा असून ते पेशव्यांच्या बरोबरीचे होते. त्यांनीं जेथपर्यंत राज्यांत कांहीं फंदफितूर केला नाहीं तेथपर्यंत त्यांच्या संस्थानांत ढवळाढवळ करण्याचा पेशव्यांस अधिकार नव्हता. हे सर्व सालिना जुजबी खंडणी देण्यास पात्र होते. यांपैकीं कांहींजणांस कधीं काळीं तर कांहींस दरवर्षीं लष्करी चाकरी करावी लागे. आंग्रे, सचिव व सावंत यांस लष्करी चाकरीचें कलम लागू नव्हतें आसपास कोठे काम पडले तर तितक्यापुरती त्यांनीं जुजबी फौजेनिशीं मदत करावयांची असे. तसेंच पाटणकर, घोरपडे वगैरे हुजरातीचे मानकरी होते तेहि सर्व, मानानें पेशव्यांच्या बराबरीचेच होते. त्यांनींहि जेथपर्यंत फंदफितूर केला नाहीं तेथपर्यंत त्यांच्या वाटेस जाण्याचा पेशव्यांस अधिकार नव्हता. या मानक-यांत मातबर होते त्यांच्या सरंजामास लहान मोठे तालुके होते. पण गरीब-पांच दहा स्वारांचे धनी-होते ! हे सर्व मानकरी फक्त लष्करी नोकरी करणारे होते, त्या खालचा दर्जा पेशव्यांनीं ज्यांच्या सरदा-या उत्पन्न केल्या होत्या त्यांचा. ते शिंदे, होळकर, रास्ते, पटवर्धन, विंचूरकर वगैरे असंख्य होते. त्यांवर मात्र नारायणरावसाहेबांच्या खुनापर्यंत पेशव्यांची सत्ता अबाधित चालत होती. हे जे सर्व दर्जांचे लोक वर सांगितले आहेत, त्या सर्वांचा सांभाळ होऊन त्यांचें ऊर्जित व्हावें, त्यांचे परस्परांत कलह होऊन रयतेची पायमल्ली न व्हावी, व ती रयत निर्भय व संतुष्ट हावी, म्हणून शाहूनें मराठी साम्राज्य 'शिवस्व' म्हणून पेशव्यांच्या हवालीं केलें. थोरल्या मुलावर संसाराचा व कुंटुंबाचा भार सोपवून एखाद्या मनुष्यानें महायात्रेस जावें त्याप्रमाणें शाहूनें पेशव्यावर राज्य सोंपवून कैलासवास केला. ती जबाबदारी ओळखून पेशव्यांनीं हें 'शिवस्व' यथाशक्ति संभाळिलें यांत संशय नाहीं. त्यांनीं कोणाच्याहि दौलतीचा अभिलाष केला नाहीं, अपराधावांचून कोणास शासन केलें नाहीं, सामर्थ्यानें उन्मत्त होऊन कोणास पायांखालीं तुडविलें नाहीं, रावापासून रंकापर्यंत सर्वांचे मानमरातब व सरंजाम यथास्थित चालविले. हे त्यांस मोठें भूषणास्पद आहे. शाहूनें भोसले-गायकवाडांस अधिकार दिला असता तरी याहून अधिक त्यांच्या हातून खचित झालें नसतें ! नाना फडनवीस ह्यात होते तोपर्यंत पेशवाईचे हे सर्व कायदे निर्बाधपणें चालले.