प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.

दक्षिणदिग्विजय (१६७३-१६८०) मोंगलांबरोबरचें युद्ध समाप्त झाल्यावर इ. स. १६७४ त शिवाजीनें स्वतःस राज्याभिषेक करवून आपल्या राज्यास लौकिक दृष्ट्या मान्यता मिळविली. शिवाजीचीं यापुढील दोन अडीच वर्षें राज्याच्या बंदोबस्तांत गेलीं. नंतर १६७६ च्या अखेरीस तो गोवळकोंड्याचा तोफखाना घेऊन कर्नाटकच्या मोहिमीवर निघाला. या मोहिमींत त्यानें तो मुलूख मिळविला त्यांतील कांहीं प्रत्यक्ष विजापुरच्या राज्यांतील होता व कांहीं शहाजीच्या जहागिरीपैकीं होता. शहाजीच्या मरणानंतर त्याच्या जहागिरीचा कारभार शिवाजीचा सावत्र भाऊ व्यंकोजी हा पहात होता. शिवाजीच्या मनांत शहाजीची जहागीर व्यंकोजीकडून काढून घ्यावयाची नसल्यामुळें व्यंकोजी विजापूरचें अधिपत्य झुगारून देऊन आपली जहागीर मराठी साम्राज्यात समाविष्ट करण्यास तयार होतांच त्यानें शहाजीची सर्व जहागीर व्यंकोजीकडेच पुन्हां देऊन शिवाय चालू मोहिमींत विजापुरापासून जिंकलेला मुलूखहि त्यानें व्यंकोजीच्या स्वाधीन केला. याचवेळीं शिवाजीनें विजापुरकरांस औरंगजेबाच्या सैन्याविरूद्ध मदत केल्यामुळें त्यांनीं कोपळ, बल्लारी व त्यापुढें दक्षिणेस जिंजी वगैरे जे प्रांत शिवाजीनें काबीज केले होते त्यांवरील व तंजावरच्या जहागिरीवरील आपला हक्क सोडला.