प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
उत्तरेकडील व दक्षिणेकडील लढ्यांतील फरक - नर्मदेच्या उत्तरेस मुसुलमानांशीं टक्कर देण्याचें काम जसें रजपुतांनीं केलें, तसें दक्षिणेस तें प्रथम विजयानगरच्या राजांनीं केलें. उत्तरेकडील मुसुलमानांस अफगाणिस्तानांतून व मध्यआशियांतून इस्लामी पंथाच्या कडव्या लोकांचा अव्याहत पुरवठा होत गेल्यामुळें त्यांनां त्या भागांत आपल्या संस्कृतीचा प्रसार करण्यांत बरेंच यश आलें. परंतु दक्षिणेंतील मुसुलमानांची स्थिति तशी नव्हती. दक्षिणेंत मुसुलमानी संस्कृतीचा प्रसार करण्याचें काम प्रथम ज्या बहामनी सुलतानांकडे आलें होतें ते किंवा त्या राज्याचीं शकलें होऊन निर्माण झालेले विजापुरादि मुसुलमानी राज्यांचे सुलतान हे सर्व दिल्लीच्या बादशहांशीं बंडखोर असल्यामुळें त्यांनां उत्तरेकडून मदत मिळण्याची मुळीच अपेक्षा नव्हती. त्यांनीं जें संस्कृतिप्रसाराचें कार्य केलें तें बहुतेक हिंदूंमधील बाटविलेल्या लोकांच्या जोरावरच होय. परंतु हे वाटलेले मुसुलमान कांहीं अंशीं अस्सल मुसुलमानांपेक्षांहि हिंदू लोकांस जास्त जाचक झाले यांत संशय नाहीं. एकदां परधर्मांत गेल्यावर पूर्व धर्माचा पाडाव करण्यास लोकांस विशेष स्फुरण येत असतें. शिवाय या बाटलेल्या लोकांस हिंदूचीं व्यंगें व राहणी ठाऊक असल्यामुळें त्या माहितीचा उपयोगहि त्यांनीं मुसुलामानांस करून दिला.