प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.

स्वराज्यस्थापनेंतील शहाजीचें श्रेय.- महाराष्ट्रास स्वातंत्र्य मिळवून देण्याचें श्रेय सर्वतोपरी ह्या समयीं जन्मास आलेल्या वीर पुरूषासच सामान्यतः देण्यांत येतें. मुसुलमानी आमदानीनंतर महाराष्ट्रांत स्वराज्याच्या कल्पनेस मूर्त स्वरूप आणून देणारा हाच पहिला पुरूष असल्यामुळें एका अर्थी तें बरोबरहि आहे. शिवाजीसारखा महाराष्ट्रदीपक पुत्र लाभल्यामुळें त्याचा बाप शहाजी यास निःसंशय धन्यताच वाटली असेल; तथापि आपल्या पुत्राच्या उज्वल तेजापुढें आपलें तेज फिकें पडून आपली वास्तविक योग्यता ध्यानांत येण्यास पुढील पिढ्यांनां फार प्रयास पडतील याची विचा-यास कल्पनाहि नसेल !

शिवाजीच्या चरित्रांतील विविध प्रसंग उद्भवण्यास वस्तुतः शहाजीचेंच चरित्र कसें कारणीभूत झालें याचें रा. वासुदेवशास्त्री खरे यांनीं आपल्या उपर्युक्त निबंधांत फार मार्मिक विवेचन केलें आहे. ते म्हणतात:-

 ''विजापुरकरांच्या चाकरींत शिरल्यानंतर (इ. स. १६३७) पहिल्या तीनचार वर्षांत शहाजीच्या मनोवृत्तींत जो क्षोभ उत्पन्न झाला, त्यांतच शिवाजीच्या राज्यस्थापनेचें बीज आहे. राज्यसंस्थापकाच्या पदवीस पोचलेल्या शहाजीस हें परमुलुखांत सेवावृत्तीचें लाजिरवाणें जिणें पतकरणें कशामुळें प्राप्त झालें ? मोंगलांच्या नांवानें तो जवळ होताच. पण विजापुरकरांनीं आयत्या वेळीं आपणास दगा देऊन स्वतःचा स्वार्थ साधून घेतला याबद्दल त्याचें मन फार दुखावलें होतें. 'महंमद आदिलशहानें विश्वासघात करून माझें राज्य बुडविलें आणि जहागीर दिल्याचा उपकार दाखवून मला हद्दपारीची शिक्षा भोगावयास लाविली. ज्यांच्या मांडीस मांडी लावून बसण्याची योग्यता आपण संपादन केली होती त्यांचीच आतां ताबेदारी सोसावी, चाकरी करावी, मर्जी धरावी असे दिवस आपणास प्राप्त झाले ! आणि इतकें असून याबद्दल तोंडांतून अक्षरहि काढण्याची सोय नाहीं. हा गुपित मारा यावज्जीव सोसलाच पाहिजे,' असे विचार उद्भवून त्याच्या मनास फार खेद वाटे ! 'ज्यांनीं हें सर्व केलें त्या शत्रूंवर अगर हितशत्रूंवर सूड उगविण्याच्या संधी आतां माझ्या आयुष्यांतून सूड उगविण्याच्या संधी आतां माझ्या आयुष्यांतून निघून गेल्या. तर मग या अपमानाचें परिमार्जन आतां कुणी करावें ? हें उसनें कोणी फेडावें ?' असें जेव्हां जेव्हां त्याच्या मनांत येई, तेव्हां तेव्हां शिवाजीची आठ वर्षांची छोटी मूर्ति त्याच्या डोळ्यांसमोर उभी राही. करील तर हें सर्व माझा शिवाजीच करील असें त्यास वारंवार वाटे. शहाजी हा महाप्रतापी महाकारस्थानी पुरुष. हा राज्यक्रांति करणारा चळवळ्या दक्षिणेंत राहू दिला तर आपलीं राज्यें नांदूं देणार नाहीं; असें मानून दिल्लीचा शहाजहान व विजापुरचा महंमद यांनीं शहाजीस कर्नाटकांत डांबून घातलें व पुनः त्यानें दक्षिणेंत येऊं नये असा बंदोबस्त केला.''

''शिवाजीनें निराळें राहून स्वतंत्र राज्य करावें ही कल्पना शहाजीस सुचली खरी, पण तो अशा बिकट परिस्थितींत सांपडला होता कीं, तो अमलांत आणतांना फार सावधपणानें वागणें त्यास प्राप्त होतें. शिवाजीचा जन्म झाल्या दिवसापासून शहाजीचा सर्व काळ लढायांच्या धामधुमींत गेल्यामुळें मुलांचा सहवास त्याला फारच थोडा लाभला होता. मुलगा मोठा होऊं लागला, तसतशी त्याची चालचर्या पाहून आपला बेत पक्का करणें त्यास जरूर होतें. त्यासाठीं त्यानें इ. स. १६३८|३९ त व पुढें १६४१ त शिवाजीस आपणाकडे बोलावून जवळ ठेवून घेऊन परीक्षा पाहिली. त्यांत शिवाजीचें उदयोन्मुख अपूर्व तेज त्याच्या चांगलेंच दृष्टोत्पत्तीस आलें. मग त्यानें आपल्या कारभारी मंडळींशीं खलबत करून पुढें योजलेला बेत पार पाडण्यासाठीं एव्हांपासून एकेक पाऊल धीरें धीरें कसें टाकावयाचें हा निश्चय ठरविला. नंतर जिजाऊ आपणास आवडत नाहीं, शिवाजी आपल्या मर्जीबाहेर वागणार सबब जवळ ठेवण्याच्या सोयीचा नाहीं, असें खोटेंच निमित्त ठेऊन त्या दोघांसहि आपणापासून दूर पुण्यास ठेवण्याची मसलत योजिली. आणि शिवाजीस विश्वासू दिवाण दादोजी कोंडदेव याजबरोबर पुण्यास रहावयास पाठविलें आणि त्याबरोबरच आपलें कारभरीमंडळहि कोणत्या ना कोणत्या तरी निमित्तानें तिकडेच रवाना केले'' [भारत इतिहाससंशोधक मंडळ त्रैमासिक अंक १ पृ. ३२.].

स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची कल्पना प्रथम शहाजीसच सुचली होती व मराठी राज्य स्थापन करण्याचा डाव त्यानेंच पुढें शिवाजीकडून जुळवून आणला ही गोष्ट आतां सप्रमाण सिद्ध झाली आहे. मराठ्यांच्या इतिहासाचीं साधनें खंड १५ पान ४७०,४७१; खंड २०, पान ३४९ व रामदास आणि रामदासी भाग ९ पान २२ यांत शिवाजीचा एक शिक्का आहे तो असा:-

  प्रतिपच्चंद्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
  शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भाति यशस्विनी ।।

ही मुद्रा शिवाजीच्या शके १५६१ अश्विन शुद्ध ८ च्या एका आज्ञापत्रावर सांपडते. या वेळीं शिवाजीचें वय अवघें १० वर्षांचें होतें. परंतु ह्या मुद्रेंतील मजकुराचा डौल तर असा दिसतो कीं, तिच्या मालकानें स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा जणूं निश्चयच केला होता. ही मुद्रा शिवाजीच्या इतक्या अल्प वयाच्या वेळची आहे कीं, तिजवरून स्वराज्यस्थापनेच्या योजनेचा उगम एकट्या शिवाजीपासून निघणें शक्य नाहीं हें उघड दिसतें. याच्या पुष्टयर्थ रा. वासुदेवशास्त्री यांनीं आपल्या मालोजी व शहाजी या निबंधांत व धुळ्याचे रा. भट यांनीं इतिहास व ऐतिहासिक मासिक पुस्तकाच्या २८ व्या अंकांत व रा. राजवाडे यांनीं राधामाधव विलास चंपू या ग्रंथाच्या प्रस्तावनेंत जें विवेचन केलें आहे त्यावरून पुढील माहिती मिळते.