प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
स्वराज्यस्थापनेंतील शहाजीचें श्रेय.- महाराष्ट्रास स्वातंत्र्य मिळवून देण्याचें श्रेय सर्वतोपरी ह्या समयीं जन्मास आलेल्या वीर पुरूषासच सामान्यतः देण्यांत येतें. मुसुलमानी आमदानीनंतर महाराष्ट्रांत स्वराज्याच्या कल्पनेस मूर्त स्वरूप आणून देणारा हाच पहिला पुरूष असल्यामुळें एका अर्थी तें बरोबरहि आहे. शिवाजीसारखा महाराष्ट्रदीपक पुत्र लाभल्यामुळें त्याचा बाप शहाजी यास निःसंशय धन्यताच वाटली असेल; तथापि आपल्या पुत्राच्या उज्वल तेजापुढें आपलें तेज फिकें पडून आपली वास्तविक योग्यता ध्यानांत येण्यास पुढील पिढ्यांनां फार प्रयास पडतील याची विचा-यास कल्पनाहि नसेल !
शिवाजीच्या चरित्रांतील विविध प्रसंग उद्भवण्यास वस्तुतः शहाजीचेंच चरित्र कसें कारणीभूत झालें याचें रा. वासुदेवशास्त्री खरे यांनीं आपल्या उपर्युक्त निबंधांत फार मार्मिक विवेचन केलें आहे. ते म्हणतात:-
''विजापुरकरांच्या चाकरींत शिरल्यानंतर (इ. स. १६३७) पहिल्या तीनचार वर्षांत शहाजीच्या मनोवृत्तींत जो क्षोभ उत्पन्न झाला, त्यांतच शिवाजीच्या राज्यस्थापनेचें बीज आहे. राज्यसंस्थापकाच्या पदवीस पोचलेल्या शहाजीस हें परमुलुखांत सेवावृत्तीचें लाजिरवाणें जिणें पतकरणें कशामुळें प्राप्त झालें ? मोंगलांच्या नांवानें तो जवळ होताच. पण विजापुरकरांनीं आयत्या वेळीं आपणास दगा देऊन स्वतःचा स्वार्थ साधून घेतला याबद्दल त्याचें मन फार दुखावलें होतें. 'महंमद आदिलशहानें विश्वासघात करून माझें राज्य बुडविलें आणि जहागीर दिल्याचा उपकार दाखवून मला हद्दपारीची शिक्षा भोगावयास लाविली. ज्यांच्या मांडीस मांडी लावून बसण्याची योग्यता आपण संपादन केली होती त्यांचीच आतां ताबेदारी सोसावी, चाकरी करावी, मर्जी धरावी असे दिवस आपणास प्राप्त झाले ! आणि इतकें असून याबद्दल तोंडांतून अक्षरहि काढण्याची सोय नाहीं. हा गुपित मारा यावज्जीव सोसलाच पाहिजे,' असे विचार उद्भवून त्याच्या मनास फार खेद वाटे ! 'ज्यांनीं हें सर्व केलें त्या शत्रूंवर अगर हितशत्रूंवर सूड उगविण्याच्या संधी आतां माझ्या आयुष्यांतून सूड उगविण्याच्या संधी आतां माझ्या आयुष्यांतून निघून गेल्या. तर मग या अपमानाचें परिमार्जन आतां कुणी करावें ? हें उसनें कोणी फेडावें ?' असें जेव्हां जेव्हां त्याच्या मनांत येई, तेव्हां तेव्हां शिवाजीची आठ वर्षांची छोटी मूर्ति त्याच्या डोळ्यांसमोर उभी राही. करील तर हें सर्व माझा शिवाजीच करील असें त्यास वारंवार वाटे. शहाजी हा महाप्रतापी महाकारस्थानी पुरुष. हा राज्यक्रांति करणारा चळवळ्या दक्षिणेंत राहू दिला तर आपलीं राज्यें नांदूं देणार नाहीं; असें मानून दिल्लीचा शहाजहान व विजापुरचा महंमद यांनीं शहाजीस कर्नाटकांत डांबून घातलें व पुनः त्यानें दक्षिणेंत येऊं नये असा बंदोबस्त केला.''
''शिवाजीनें निराळें राहून स्वतंत्र राज्य करावें ही कल्पना शहाजीस सुचली खरी, पण तो अशा बिकट परिस्थितींत सांपडला होता कीं, तो अमलांत आणतांना फार सावधपणानें वागणें त्यास प्राप्त होतें. शिवाजीचा जन्म झाल्या दिवसापासून शहाजीचा सर्व काळ लढायांच्या धामधुमींत गेल्यामुळें मुलांचा सहवास त्याला फारच थोडा लाभला होता. मुलगा मोठा होऊं लागला, तसतशी त्याची चालचर्या पाहून आपला बेत पक्का करणें त्यास जरूर होतें. त्यासाठीं त्यानें इ. स. १६३८|३९ त व पुढें १६४१ त शिवाजीस आपणाकडे बोलावून जवळ ठेवून घेऊन परीक्षा पाहिली. त्यांत शिवाजीचें उदयोन्मुख अपूर्व तेज त्याच्या चांगलेंच दृष्टोत्पत्तीस आलें. मग त्यानें आपल्या कारभारी मंडळींशीं खलबत करून पुढें योजलेला बेत पार पाडण्यासाठीं एव्हांपासून एकेक पाऊल धीरें धीरें कसें टाकावयाचें हा निश्चय ठरविला. नंतर जिजाऊ आपणास आवडत नाहीं, शिवाजी आपल्या मर्जीबाहेर वागणार सबब जवळ ठेवण्याच्या सोयीचा नाहीं, असें खोटेंच निमित्त ठेऊन त्या दोघांसहि आपणापासून दूर पुण्यास ठेवण्याची मसलत योजिली. आणि शिवाजीस विश्वासू दिवाण दादोजी कोंडदेव याजबरोबर पुण्यास रहावयास पाठविलें आणि त्याबरोबरच आपलें कारभरीमंडळहि कोणत्या ना कोणत्या तरी निमित्तानें तिकडेच रवाना केले'' [भारत इतिहाससंशोधक मंडळ त्रैमासिक अंक १ पृ. ३२.].
स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची कल्पना प्रथम शहाजीसच सुचली होती व मराठी राज्य स्थापन करण्याचा डाव त्यानेंच पुढें शिवाजीकडून जुळवून आणला ही गोष्ट आतां सप्रमाण सिद्ध झाली आहे. मराठ्यांच्या इतिहासाचीं साधनें खंड १५ पान ४७०,४७१; खंड २०, पान ३४९ व रामदास आणि रामदासी भाग ९ पान २२ यांत शिवाजीचा एक शिक्का आहे तो असा:-
प्रतिपच्चंद्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भाति यशस्विनी ।।
ही मुद्रा शिवाजीच्या शके १५६१ अश्विन शुद्ध ८ च्या एका आज्ञापत्रावर सांपडते. या वेळीं शिवाजीचें वय अवघें १० वर्षांचें होतें. परंतु ह्या मुद्रेंतील मजकुराचा डौल तर असा दिसतो कीं, तिच्या मालकानें स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा जणूं निश्चयच केला होता. ही मुद्रा शिवाजीच्या इतक्या अल्प वयाच्या वेळची आहे कीं, तिजवरून स्वराज्यस्थापनेच्या योजनेचा उगम एकट्या शिवाजीपासून निघणें शक्य नाहीं हें उघड दिसतें. याच्या पुष्टयर्थ रा. वासुदेवशास्त्री यांनीं आपल्या मालोजी व शहाजी या निबंधांत व धुळ्याचे रा. भट यांनीं इतिहास व ऐतिहासिक मासिक पुस्तकाच्या २८ व्या अंकांत व रा. राजवाडे यांनीं राधामाधव विलास चंपू या ग्रंथाच्या प्रस्तावनेंत जें विवेचन केलें आहे त्यावरून पुढील माहिती मिळते.
स्वराज्यस्थापनेंच्या योजनेशीं शिवाजीमहाराजाखेरीज तत्कालीन ज्या अनेक व्यक्तिंचा संबंध असावा अशी कल्पना होते, त्यांपैकीं शहाजी व दादोजी कोंडदेव ह्या दोन प्रमुख व्यक्ती होत असें म्हणावें लागतें. कारण रामदास आणि रामदासी मालेंतील १५ व्या भागांत विजापुरच्या अल्ली आदिलशहा यास शहाजीनें लिहिलेलें शके १५७८ (इ. स. १६५६) च्या सुमाराचें एक पत्र प्रसिद्ध झालें आहे. तें वाचलें असतां तें लिहिण्याच्या कित्येंक वर्षें अगोदर शहाजीनें आदिलशाहीवर आलेलीं अनेक संकटे निवारण करून आणि अनेक प्रदेश जिंकून व ते विजापुरच्या राज्यांत सामील करून दरबारांत आपली विलक्षण छाप बसविली होती असें दिसून येत. शहाजीसारख्या कर्तृत्ववान् विचारी पुरूषास तत्कालीन परिस्थितीच्या विचाराअंतीं स्वराज्यप्राप्तीचें काम सहज घडून आणण्यासारखें आहे असें वाटणें स्वाभाविक होतें. स्वतःविजापूरच्या बादशहाच्या दरबारांत राहून कमकुवत झालेल्या बादशाही सत्तेस संकटसमयीं मदत करून व तिजवर आपली छाप व दरारा ठेऊन विजापुरापासून ब-याच दूर असलेल्या स्वराज्यस्थापनेस योग्य अशा पुणें, सुपें, बारामती इत्यादि सह्याद्रीलगतच्या त्याच्या जहागिरींतील प्रदेशांत आपल्या कर्तृत्ववान् मुलाच्या हातून पोक्त व अनुभवी अशा दादोजी कोंडदेवासारख्या स्वामिनिष्ठ कारभा-याच्या सल्ल्यानें स्वराज्यस्थापन करण्याचा बेत शहाजीनें ठरविला असला पाहिजे असें अनुमान वरील अल्पशा पुराव्यावरून काढ्यास हरकत दिसत नाहीं (इतिहास आणि ऐतिहासिक अंक २८-३१ पृ. १३२).
इ. स. १६३८ च्या अखेरीस शिवाजी बेंगरूळहून पुण्यास आला. येतांच त्यानें बात मावळें काबीज केलीं असें सभासदाच्या बखरींत लिहिलें आहे; पण तेव्हां तर शिवाजी आठ वर्षांचा होता. आठ वर्षांच्या मुलानें ही मावळें काबीज करावी कशी ? अर्थात् त्याच्या नांवावर हणमंते वगैरे कारभा-यांनी ही मुलखगिरी केली हे स्पष्ट आहे. 'येतांच' ह्या बखरींतील पदावरून बेंगरूळास ठरलें होतें त्याप्रमाणें शिवाजीनें पुण्यास येतांच बारा मावळें काबीज केलीं असा ध्वनि निघतो. चिटणिशी बखरींत तर ''शिवाजीमहाराज शके १५६२ यांत या (राज्यस्थापनेच्या) मसलतीचा आरंभ करते झाले'' असें स्पष्टच म्हटलें आहे (भारत इतिहाससंशोधक मंडळ त्रैमासिक अंक १, पान ३४).
शिवाजीच्या ज्या आज्ञापत्रावर उल्लेखलेली 'प्रतिपच्चंद्र रेखेव........ इत्यादि' मुद्रा आहे तो लेखांक शिवाजीच्या दहाव्या वर्षाच्या वेळचा आहे हें वर सांगितलेंच आहे. शहाजी व दादोजी कोंडदेव यांची मनें जर विजापुरच्या बादशहाविषयीं राजनिष्ठ असतीं तर दादोजी कोंडदेवासारख्या स्वामिनिष्ठ कारभा-यास वरील मुद्रेंतील मजकूर संमत होऊन ती मुद्रा कागदोपत्रीं सुरू करण्याची परवानगी बालशिवाजीराजास त्यानें कधींच दिली नसती. अर्थात् शहाजी व दादोजी यांच्या सल्लामसलतीनेंच स्वराज्यस्थापनेची कल्पना निश्चितपणें अमलांत आणण्याचें ठरून वरील मुद्रा बालशिवाजीच्या आज्ञापत्रावर विराजमान होऊं लागली असली पाहिजे (इतिहास आणि ऐतिहासिक अंक २८-३१ पान १३३).
मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांच्या पंधराव्या खंडांतील २६८ व्या लेखांमुळें या अनुमानास चांगलीच बळकटी येते. शके १५६७ वैशाख शुद्ध प्रतिपदेचें (म्हणजे शिवाजीमहाराजांच्या १६ व्या वर्षाच्या वेळचें) लेखांक २५८ हे पत्र आहे. हे पत्र दादाजी नरसू प्रभू यास शिवाजीमहाराजांनीं लिहिलेलें असून त्या पत्रांत स्वयंभू अशा रोहिडेश्वराच्या प्रसादानें आम्हांस यशप्राप्ति झाली असून तोच आमच्या हातून हिंदवी स्वराज्य स्थापन करून आमचे मनोरथ पूर्ण करणार आहे असें शिवाजी दादाजीस लिहीत आहे. पत्राच्या शेवटी ''राजश्री श्री दादापंताचे विद्यमानें बावाचें व तुमचें व आमचें श्रीपाशीं इमान जाले तें कायम वज्रप्राय आहे. त्यांत अंतर आम्ही, आमचे वंशज लेकराचे लेकरीं वतन वगैरे चालविण्याविषयीं कमतर करणार नाहीं.'' असें शिवाजीमहाराज दादाजीस बजावून लिहीत आहेत. यावरून दादोजी कोंडदेव याच्या मार्फतीनें नरसी बावाशीं व दादाजोशीं शिवाजीनें विजापुरच्या बादशहाच्या ताब्यांतील मुलुखासंबंधीं कारस्थान केलें होतें हें उघड होत आहे. सदरहू लेख उपलब्ध झाल्यानंतर दादोजी कोंडदेव याच्या सल्लामसलतीनें व मदतीनें शिवाजीमहाराजांच्या पूर्ववयांतील स्वराज्यस्थापनेसंबंधाच्या सर्व उलाढाली चालल्या होत्या याबद्दल शंका घेण्यास आतां बिलकुल जागा रहात नाहीं (इतिहास आणि ऐतिहासिक, अंक २८-३१ पान १३३.).
स्वराज्यस्थापनेची मसलत शहाजीस संमत असली पाहिजे या विधानास पृष्टि देणारी बाब सप्तप्रकरणात्मक चरित्राचें पान ९२ वर आढळून येते. या ठिकाणीं असें म्हटलें आहे कीं, 'आणि श्री जेजुरीचे देवास शहाजी महाराजांनीं नवस केला होता जे शिवाजी महाराज यांनीं हेतु धरला कीं, राज्य साध्य करून देवगोब्राह्मण यांची पीडा परिहार करून धर्मस्थापना करावी. तो सिद्धीस निर्विघ्न जावा म्हणजे लख रुपयांचें सोनें घेऊन सोन्याच्या मूर्ती करून पाठवूं. त्याप्रमाणें तेथें कर्नाटकी कारागर याजपासून चांगल्या मूर्ती तयार करून पाठविल्या.'' आतां जो बाप आपल्या मुलानें सुरू केलेल्या स्वराज्यस्थापनेच्या मसलतींत यश यावें असा देवापाशी नवस करतो तो बाप त्याच कार्यांत आपल्या मुलास सल्लामसलत अगर प्रत्यक्ष मदत देणार नाहीं हें संभवेल तरी कसे ? [इतिहास आणि ऐतिहासिक, अंक २८-३१, पान १३७].
शहाजीनें विजापूरच्या बादशहास आपल्या कामगिरींनीं उपकारबद्ध करून त्याच्या दरबारावर आपली छाप कशी बसविली होती याचा मागें उल्लेख आलाच आहे. अशा स्थितींत विजापुरच्या सुलतान शिवाजीच्या बंडास मूळ कारण शहाजी आहे अशी पक्की खात्री करून घेतल्याशिवाय शहाजीसारख्या असामान्य महत्त्वाच्या माणसास केवळ संशयावरून ठार मारण्यास तयार होईल हें संभवत नाहीं. ह्या अरिष्टांतून मुक्त होतांच पुन्हां असा पुंडावा करून माझ्या जिवावर संकट आणूं नकोस अशी शिवाजीस ताकीद देण्याऐवजीं शहाजीनें कान्होजी नाईक जेध्यापासून अशी आणभाक घेतली कीं ''चिरंजीव राजश्री सिउबा खेडेबारीयांत व पुणां आहेत त्याजवळ तुम्ही जमावानसी राहावें. तुमची जबरदस्ती त्यां प्रांतें आहे. अवघे मावळचे देशमुख देखील त्यासी रुजू होऊन त्यांचे आज्ञेंत वर्तेत यैसा विचार करून जबरदस्तीनें राहावें. येखादी मोगलाईकडील फौज व ईदिलशाहीकडील फौज आली तरी आपण इमान राखावें त्यांसी लढाई करावी यैशी शफत ईमानपुरस्कर बेलरोटीवर हात ठेऊन घेतली'' (भा. इं. स. मंडळ चतुर्थ संमेलनवृत्त पान १७९-८०). शिवाजी आपल्या मनोदयाप्रमाणें वागत आहे असें वाटत असल्याखेरीज शहाजीच्या हातून असें वर्तन कसें घडेल ? [भा. इ. सं. मंडळ. त्रैमासिक अंक १, पान ३५].
जिजाऊ व शिवाजी यांजबरोबर शहाजीनें दादोजी कोंडदेवास जहागीर संभाळण्याकरितां पुण्यास पाठविलें हें योग्यच झालें पण शामराव निळकंठ पेशवे, बाळकृष्णपंत मुजुमदार, सोनोपंत डबीर व रघुनाथ बल्लाळ सबनीस हे शहाजीच्या अनेक संकटकाळीं उपयोगी पडलेले मुलकी व लष्करी कामांतले वाकबगार-शत्रूचे किल्ले व ठाणीं फितुरानें किंवा हल्ल्यानें घेण्यांत तरबेज असलेले असे मलिकंबराच्या वेळेपासूनचे शहाजीचे विश्वासू कारभारी यांनीं पुण्यास राहून काय करावयाचें होतें ? हे कारभारी लोक पुण्यास नेहमीं राहण्याकरितां पाठविण्यांत राजयस्थापनेखेरीज शहाजीचा दुसरा कांहींच हेतु दिसत नाहीं [भ. इ. सं. मं. त्रैमासिक अंक १, पान ३३-३४].
इ. स. १६४० पासून जिजाऊ व शिवाजी यांवर शहाजीची इतराजी होऊन त्यांचें तोंडसुद्धां पहावयाचें नाहीं असा त्यानें खरोखरच निश्चय केला होता असें जरी मानिलें, तरी त्या दोघांवर संभाजीची नाराजी होण्यास कांहींच कारण नव्हतें. संभाजीची व जिजाऊची विजापुरास शेवटची भेट झाल्यानंतर तो तेरा वर्षें जिवंत होता. या मुदतींत जिजाऊनें आपल्या थोरल्या मुलास भेटण्याकरितां एकदां देखील कर्नाटकाकडे जाऊं नये, अगर आईला भेटण्याकरितां संभाजीनें एकदांसुद्धां पुण्यास येऊं नये हें कसें घडलें ? पुण्याच्या मंडळींनीं कर्नाटकाकडे बघूं नये आणि कर्नाटकच्यांनीं पुण्यास आपलीं कोणीं माणसें आहे हें मुळीं अजीबात विसरून जावें हा सारा शहाजीनें कांहीं मतलबामुळें मुद्दाम घडवून आणलेला प्रकार दिसतो. शिवाजीकडून पुंडावा करावयाचा आणि आपण नामानिराळें रहावयाचें याखेरीज त्यांत दुसरा मतलब दिसत नाहीं [भ. इ. सं. मंडळ त्रैमासिक अंक १, पान ३५].
वरील विवेचनावरुन एक गोष्ट स्पष्ट होते कीं, शिवाजीनें आपल्या आयुष्यांत जें मराठी राज्य निर्माण केलें त्याचा पाया घालण्याच्या कामीं त्याला त्याच्या वडिलाकडून व वडिलांच्या पदरच्या विश्वासू नोकरचाकरांकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीनें बरीच मदत झाली होती. किंबहुना हा पाया घालण्याचें काम स्वतः शहाजीनेंच आपल्या मुलाकडून करविलें असें म्हटलें तरी तें गैरवाजवी होणार नाहीं. स्वतंत्र राज्यस्थापनेचा प्रयोग प्रत्यक्ष शहाजीनेंच करून दाखविला होता. कदाचित् तो व्यक्तींपुरता अथवा आपल्या घराण्यापुरता असेल. राष्ट्रांचा विस्तृत कल्पना शहाजीच्या मनांत नसावी. तथापि रियासतकार म्हणतात त्याप्रमाणें शिवाजीला जर आपण मराठशाहीचा संस्थापक म्हटलें तर शहाजीला मराठशाहीचा संकल्पक असें पद देण्यास हरकत नाहीं.