प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
जैन व बौद्धांच्या धार्मिक आघातांमुळें भारतीय पारमार्थिक कल्पनांत फरक कसकसा होत गेला त्याचा शंकराचार्यांच्या काळापर्यंतचा इतिहास मागील अनेक प्रकरणांत त्रुटित स्वरूपांत आला आहे. शकहूणांच्या आघातामुळें हिंदुस्थानच्या इतिहासांत कोणकोणत्या राजकीय घडामोडी झाल्या त्याचा इतिहास बाराव्या व पंधराव्या-'अशोक ते अराजक' व अराजकापासून महंमदी स्वा-यापर्यंत हिंदुस्थान' प्रकरणांत दिला आहे. या दोन्ही प्रकारच्या हल्ल्यांपासून बचावून नवव्या शतकांतला हिंदुस्थान हिंदुधर्मानुयायी व राजकीय दृष्ट्या पूर्ण स्वतंत्र झाला होता. पण नंतर लवकरच म्हणजे इ. स. १००१ पासून मुसुलमानांनीं राजकीय व धार्मिक हल्ले हिंदुस्थानावर चढविण्यास सुरवात केली. मुसुलमानांच्या इस्लामी धर्माच्या लाटेखालीं अरबस्तानापासून चीनापर्यंत बहुतेक पौरस्त्य देश सापडले. इराणासारखा प्रौढप्रतापी प्राचीन देशहि हतबल होऊन तेथील अग्न्युपासक रहिवाश्यांनीं हिंदुस्थानचा आश्रय केला. मुसुलमानांनीं आपली राजकीय सत्ता तर पश्चिमेकडे स्पेन मोरोक्कोपासून पूर्वेस चीनपर्यंत बसविली. अशी ही जबरदस्त लाट हिंदुस्थानवरहि आली. इस्लामी धर्माच्या जबरदस्तींच्या सांन्निध्यामुळें हिंदूंच्या पारधार्मिक विचारांत तसेंच राजकीय परिस्थितींत काय काय घडामोडी झाल्या त्यांचा विचार या प्रकरणांत करावयाचा आहे.