प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
हिंदुसंस्कृतीची पाठिराखी राज्यें.- मुसुलमानांसारख्या धर्मवेड्या लोकांनीं हिंदुस्थानांत स्थूलमानानें इ. स. १००० पासून १८०० पर्यंत निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळ्या प्रमाणांत अंमल गाजविला, तरी त्यांनां एकंदर लोकसंख्येच्या पंचमांशाहून फारसे अधिक लोक आपल्या संस्कृतींत आणतां आले नाहींत याचें हिंदू लोकांची पुराणप्रियता हें तर एक कारण आहेच, पण ऐतिहासिक दृष्ट्या त्याहूनहि महत्त्वाचें कारण म्हटले म्हणजे हिंदुस्थानांत मुसुलमानांत संस्कृतिप्रसाराच्या कामीं अबलपासून अखेरपर्यंत विरोध होत राहिला हें होय. हें विरोधाचें कार्य नर्मदेच्या उत्तरेस रजपुतांनीं व कांहीं अंशा शीखांनीं व दक्षिणेस प्रथम विजयानगरच्या राजांनीं व नंतर मराठ्यांनीं अव्याहतपणें व एकनिष्ठेनें चालू ठेविलें होते. तेव्हा पश्चिमेकडून आलेल्या इस्लामी संस्कृतीच्या लाटेविरुद्ध हिंदूनी जी उचल केली तिचें खरें स्वरूप ध्यानांत येण्याकरितां आपणांस रजपूत, विजयानगरचे राजे, मराठे व शीख यांच्या इतिहासांचे पृथक्शः पर्यालोचन केलें पाहिजे.
रजपुतांचा विरोध
इस्लामी विध्वंसक संस्कृतीस रजपुतांकडून जो विरोध झाला त्यांत अब्बलपासून अखेरपर्यंत मुख्यत्वेंकरून मेवाडच्या गेहलोट उर्फ घेलोट घराण्यानेंच प्रामुख्यानें पुढाकार घेतला होता. तेव्हां रजपुतांच्या विरोधाचा इतिहास देण्याकरितां मेवाडच्या घेलोट घराण्यांतील पुरुषांचे मुसुलमानांशीं केव्हां व कसकसे सामने झाले व त्यांचा परिणाम काय झाला हें सांगितलें असतां पुरें होईल. सिंध प्रांतांतील महंमद कासीमाची स्वारी घेलोट वंशांतील जो शूर पुरूष चितोड हस्तगत करून तेथील (घेलोट) घराण्याचा मूळ पुरुष बनला त्या बाप्पारावळाच्या कारकीर्दींतच झाली होती. इसवीसनाच्या बाराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून बाप्पाच्या वंशजांचे इस्लामी संस्कृतीच्या अफगाणांशीं सामने सुरू झाले. मध्यंतरीं दहाव्या शतकाच्या अखेरीस रजपुतांचे सवक्तगीनाशीं व अकराव्या शतकाच्या आरंभास गझनीच्या महंमुदाशी सामने झाले, पण त्यांत हिंदूंस यश प्राप्त झाले नाहीं. पुढें बाप्पाचा समरसिंह नामक एक शूर वंशज इ. स. ११४० त चितोडच्या गादीवर आला तोहि इ. स. ११९३ त स्थानेश्वरच्या घोर संग्रामांत महंमद घोरीविरूद्ध पृथ्वीराजास मदत करण्यास गेला तेव्हां धारातीर्थी पतन पावला. पण त्याच्या मृत्यूनंतर त्याची बायको करूणदेवी हिनें अंबरनजीक घोरीच्या एका सरदाराचा पराजय करून आपल्या राज्यास बळकटी आणली. समरपुत्र कर्ण याच्यानंतर समरसिंहाच्या भावाचा नातु रहूप यानेंहि मुसुलमानांचा पराजय करून शहाणपणानें राज्यें केले. पुढें लक्ष्मणसिंहाच्या कारकीर्दींत अलाउद्दिन खिलजी यानें १३०३ त चितोडवर स्वारी करून तें राज्य काबीज केलें. त्या प्रसंगीं राणा लक्ष्मणसिंह व त्याचे अकरा मुलगे लढून मेले. यानंतर ह्या घराण्यांत हमीर नांवाचा एक विलक्षण पराक्रमी पुरुष निपजला. त्यानें युक्तीनें चितोडचें राज्य परत घेतलें व अलाउद्दिनाच्या मुलाचा पराभव करून त्याच्या मुलास कैद करून आणलें. हमिरानें मेवाडचें राज्य ऊर्जित दशेस आणलें व सर्व रजपुतांची एकी करून मुसुलमानांचा मोड केला. हमिराच्या मागून तीन पिढ्यांनीं भीमसिंह नांवाचा पुरूष मेवाडच्या गादीवर आला. त्यानें आसपासच्या मुसुलमान राजांचा पाडाव करून माळव्याच्या सुलतानास युद्धांत पकडून आणले. इ. स. १४७४ त भीमसिंहाचा पुत्र रायमल गादीवर बसला. तोहि चांगला पराक्रमी होता. त्यानें दिल्ली व माळवा येथील सुलतानांचा पराभव केला व त्याचा पुत्र पृथ्वीसिंह यानें गुजराथचा सुलतान मुजफरशहा यास कैद करून आणलें.