प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.

स्वराज्यस्थापनेस परिस्थितीचें अनुकूलत्व.- यावरून महाराष्ट्रांत ज्या वेळीं स्वराज्यसंस्थापक शिवाजी जन्मास आला त्या वेळीं तेथील परिस्थिति कशा प्रकारची होती याची अंशतः कल्पना करतां येईल. येथें कोणी अशी शंका घेईल कीं, दक्षिणेंतील मुसुलमानी राज्यामध्यें जर कर्तबगार हिंदु माणसास आपलें नशीब काढ्यास पूर्ण वाव होता, तर तत्कालीन हिंदू लोकांकडून स्वातंत्र्यप्राप्तीचा प्रयत्न कां करण्यांत यावा? वस्तुतः मुसुलमानी अमदानींतील चिमुकल्या किल्लेक-यांपासून तों तहत लुकजी जाधव, मुरारपंत यांच्यासारख्या नांवलौकिकास चढलेल्या पुरुषांपर्यंत सर्व हिंदू सरदारांमध्यें मसुलमानी सत्तेखालींच आपआपला व्यक्तिविषयक उत्कर्ष करून घेण्याची आकांक्षा दृग्गोचर होते. देशमूख, देसाई वगैरे वतनदारहि आपआपल्या क्षेत्रामध्यें बहुतेकांशीं स्वतंत्रच असल्यामुळें त्यांना देखील मुसुलमानी सत्तेविरूद्ध एकत्र जमून कारस्थानें करण्याची अवश्यकता भासत नव्हती. बहामनी राज्याच्या स्थापनेपासून पुढें दोनशें वर्षेपर्यंत दक्षिणेतील मुसुलमानांचा बहुतेक काळ विजयानगरच्या राजांशीं व त्यानंतर आपआपसांत व मोंगलांशीं लढण्यामध्येंच गेल्यामुळें ह्या वतनदारांच्या कारभारांत हात घालण्यास मुसुलमानी सरदारांनां म्हणण्यासारखी संधीच मिळाली नाहीं. त्यामुळें हे लोक स्वातंत्र्यास इतके लालचावलेले होते कीं पुढें शिवाजीनें स्वराज्यस्थापनेचें कार्य हातीं घेतलें तेव्हां त्यास ह्या वतनदारांनां एकछत्री अंमलाखालीं आणण्यास जरा जडच गेलें.

याचा अर्थ असा नाहीं कीं, सदरहू पारतंत्र्याच्या काळांत महाराष्ट्रामध्यें सुराज्य होतें किंवा शांतता नांदत होती, व येथील लोकांस मुसुलमानी अंमलाविरूद्ध कोणत्याहि प्रकारची कुरकुर करण्यास जागा नव्हती. उलट पक्षीं अहमदनगरच्या विजापूरशीं, विजापूरच्या मोंगलांशीं आणि मलिकंबर व शहाजी यांच्या ह्या दोघाशींहि ज्या अनेक लढाया झाल्या त्यांमध्यें सर्व दक्षिण देश उध्वस्त झाला होता. उदाहरणार्थ, निजामशाहीच्या अखेरच्या वर्षांत विजापूर व मोंगल यांच्यामध्यें जें युद्ध झालें त्यांत मोंगलांचे सैन्य विजापुरास वेढा देण्यास आलें असतां महंमद आदिलशहानें आपल्या शत्रूस दाणवैरण मिळूं नये म्हणून राजधानीच्या सभोंवतालच्या २० मैलांच्या घेरांतील सर्व मुलूख उध्वस्त करून टाकला; व ह्याबद्दल उसनें फेंडण्याकरितां उलट मोंगलांनीहि विजापूरचा तितकाच मुलूख आणखी उध्वस्त केला. धान्य पेरणें म्हणजे शत्रूच्या फौजेस तें उध्वस्त करण्याकरितां आमंत्रण देणें व प्रसंगविशेषीं आपलेंहि मरण जवळ ओढून आणणेंच झालें होतें. हे लोक केवळ इतकेंच करून थांबत नसत. ज्या ज्या मुलुखांत यांची धाड येई, तेथील मुलांमुलींनां व तरुण बायकांनां ते आपल्या बरोबर धरुन नेऊन बलात्कारानें त्यांनां बाटवून मुसुलमान करीत. दासबोधांतील वर्णनावरून असें दिसतें की हिंदूंच्या तरुण स्त्रिया धरुन नेऊन त्यांचा मुसुलमानांशीं निका लावल्याचीं उदाहरणें त्या वेळी वारंवार घडून येत होतीं.