प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
भिन्न वाचकांच्या मनोभूमिकांचे अवगमन:- मूलग्रंथाच्या वाचकवर्गाचें बौद्धिक अथवा ज्ञानविषयक पूर्वार्जित अथवा पूर्वसंचित, व आपल्या श्रोत्यांचे पूर्वसंचित यांमधील भेद भाषांतकारास जितका सुक्ष्मपणें अवगत होईल तितकें त्यानें केलेलें भाषांतर सुलभ होईल.
उदाहरणार्थ, लो. टिळकांचे "आर्टिक होम इन दी वेदाज" हें पुस्तक घ्या. या पुस्तकाचे भाषांतर जर करावयाचें असलें, तर भाषांतरकर्त्यानें ज्या गोष्टी लक्षांत घ्यावयाच्या त्या येणेंप्रमाणे :-
आर्यन् या शब्दास पाश्चात्त्यांनी जातिविषयक किंवा महावंशविषयक जो अर्थ दिला आहे तो महाराष्ट्रीयांस परिचित आहे काय ? या आर्यन् महावंशाच्या मूलोत्त्पत्तिविषयक ज्या कल्पना यूरोपियांनी निर्माण केल्या आहेत त्या कोणत्या आहेत ? त्यांपैकीं प्रस्तुत ग्रंथकारानें कोणत्या सत्य म्हणुन गृहीत धरल्या आहेत ? आणि कोणत्या, खोडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे ? भूस्तरशास्त्रविषयक कोणती माहिती वाचकांस परिचित आहे असें मूलग्रंथकर्त्यानें गृहीत धरलें आहे ? वेदाभ्यासविषयक कोणते प्रयत्न पाश्चात्त्यांनी केले आहेत ? त्यांतले कोणते निर्णय प्रस्तुत ग्रंथकारानें मान्य करून आपली विचारपरंपरा त्यांस जोडली आहे ? अशा तर्हेचें निरनिराळ्या अंगानीं पृथक्करण करावें. तें अगोदर कागदावर लिहावें. त्यांतील अंगे, वाचकांस पुस्तकांत : बोधिलेली नवीन मतें अगर सत्यें शिकविण्यापूर्वी परिचायक प्रस्तावनेंत, अथवा पुस्तकाच्या अंगातच विषयांतर करुन किंवा टीपारूपानें वाचकांच्या पुढें मांडावीत.