प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.   

 
मूलग्रंथपरीक्षण आणि ग्राह्यांशाचें शोधन —  कोणत्याहि शास्त्रावर लिहिण्यासाठी कांहीतरी आधारासाठीं म्हणून आपण एखादा ग्रंथ घेऊन बसलों म्हणजे मूळ ग्रंथाचें खालीलप्रमाणें पृथक्करण करावें :-

१ मुळ ग्रंथांत शास्त्राचा किंवा देय ज्ञानाचा इतर ज्ञानाशीं संबंध सांधणारा भाग कोणता ?

२  लेखक कोणती मतें खोडून टाकण्याचा प्रयत्‍न करीत आहे, आणि आपलें मत स्थापन करण्याकरितां, कोणतीं वाक्यें लिहीत आहे.

६  लेखक जें तुम्हांस देत आहे, त्यांत पूर्णपणें सत्य काय आहे व त्याचीं अनुमानें काय आहेत. त्याचीं जी अनुमानें असतील तीं उद्धृत करण्याची अवश्यकता आहे काय ?  आणि असल्यास काय अवश्यकता आहे ?

४  ग्रंथामध्यें लेखकानें पूर्वगत वर्गीकरण अथवा विचारपद्धति यांशीं नवीन शोध अगर ज्ञान जोडून घेण्यासाठी म्हणजे शास्त्रास अनवश्य काय वाक्यें लिहिलीं आहेत ?

५  उपयुक्त वर्णनाचीं किंवा स्वरूपाचीं जीं वाक्ये अगर विधानें नाहीत अशी कोणतीं विधानें आहेत;  आणि त्यांच्या सत्याविषयीं आपली खात्री कितपत आहे ?

सामान्यत: एक नियम देतां येईल की, पहिल्या तीन वर्गांत मोडणार्‍या गोष्टी अजीबात वगळाव्यात. वर्गीकरणापासून विभिन्न असें देय सत्य हाती आल्यानंतर. मग त्याचें वर्गीकरण करण्याचा विचार पुन्हां करावा; आणि वाटल्यास वर्गीकरणविषयक जुनी मांडणी स्वीकारावी. परंतु त्या वेळीं देखील असा विचार करावा कीं, वर्गीकरणविषयक मांडण्या किती प्रकारच्या आहेतं संस्कृत ग्रंथांतून त्या विषयीं कांहीं वर्गीकरणविषयक माहिती आहे काय ? वर्गीकरणविषयक माहिती असल्यास ती केवळ शास्त्रघटनेच्या दृष्टीनें चांगली आहे कीं दुष्ट आहे ? शिवाय परकीय देय सत्यें देय शास्त्ररचनेच्या तत्त्वानुसार एकच शास्त्रांत मोडतात कीं अनेक शास्त्रांत मोडतात ?