प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.

मनुष्यविषयकशास्त्रें:-  हीं अनेक प्रकारची आहेत. शास्त्रीय ज्ञानाच्या इतिहासामध्यें त्यांच्या विकासाचें ज्ञान कमी महत्त्वाचें नाहीं. शास्त्रीय ज्ञानाचा इतिहास म्हणजे भौतिक शास्त्रांचा इतिहास नव्हे. यासाठीं मनुष्यविषयक शास्त्रें कोणकोणतीं आहेत याची सामान्य कल्पना दिली पाहिजे.

मनुष्याच्या राजकीय करामतीमुळें ज्या क्रिया उत्पन्न होतात त्यांमध्यें (१) शासनशास्त्र (२) धर्मशास्त्र अगर कायदेशास्त्र (३) अर्थशास्त्र वगैरे शास्त्रांचे विषय मोडतात. अर्थशास्त्रादि शास्त्रांस अधिक शिस्तवारपणा येण्यासाठीं (४) आंकडेशास्त्रांसारखी शास्त्रें निपजतात. राजकीय घडामोडीमुळें आणि कालाच्या क्रमामुळें जो इतिहास होतो त्यामुळें (५) इतिहासाशीं संबद्ध शास्त्रें अनेक तयार होतात.

मनुष्याच्या इतिहासाशी संबद्ध शास्त्रें किती आहेत याचा हिशोब देणें फारच कठीण होईल. काहींचा हिशोब व वर्णन पहिल्या विभागांत (पृष्ट. ९९-९४) येऊन गेलेंच आहे. तसेंच मनुष्यपरिभ्रमणाचा इतिहास भाषाशास्त्राशीं आणि प्राणिशास्त्र व वनस्पतिशास्त्र यांशीं कसा संबद्ध आहे, याचें विवेचन तिसर्‍या विभागाच्या दुसर्‍या प्रकरणांत आलेच आहे.

समाजशास्त्र, शासनशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचा अभ्यास जो वाढला त्या वाढीस कारण होणारा जो सामाजिक विकास त्याचा वृत्तांत देण्यासाठीं तिसरा व चौथा विभाग खर्ची पडला आहे.