प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
मूळ शब्दांतील इष्ट अर्थाची भाषांतरार्थ योजलेल्या शब्दाशीं समान व्यापकता:- मुळांतील शब्दांच्या अर्थकक्षेंतील अनवश्यक भाग काढून टाकल्यानंतर पुढची पायरी म्हणजे जो अर्थ आपणांस घ्यावयाचा आहे, त्या अर्थाशीं सामानार्थक असा मराठी शब्द शोधणें. परंतु हें कार्य करतांना देखील सावधगिरी ठेविली पाहिजे ती ही की, जो अर्थ आपणांस व्यक्त करावयाचा आहे, आणि तो व्यक्त करण्याकरितां आपण जो मराठी शब्द वापरीत आहों, त्या मराठी शब्दाच्या ठायी अतिव्याप्ति अगर अव्याप्ति आहे काय ? अतिव्याप्ति व अव्याप्तीचा दोष लक्षांत येण्यासाठीं अत्यंत सुलभ मार्ग म्हणजे मूळ अर्थाचें पृथक्करण करणें. मूळ शब्दाच्या घेतलेल्या अर्थामध्यें कोणकोणत्या कल्पना येतात त्या निरनिराळ्या काढून प्रथम मांडाव्या; आणि त्या मांडल्यानंतर जो मराठी शब्द आपण वापरणार त्यांत मुळांतील सर्व उद्दिष्ट कल्पना येत आहेत की नाही हें पहावें. मराठी शब्द जर अव्यापक असेल तर त्याची उणीव भरून काढण्यासाठी दुसरा आणखी एक शब्द घालून दोन शब्दांनीं ती कल्पना व्यक्त करतां येईल काय हें पहावें. मराठी शब्द जर अतिव्यापक असेल, तर अर्थाधिक्याचा छेद विशिष्ट संदर्भानें तो शब्द वापरल्यानें होत आहे किंवा नाही हें पहावें; व तसा होत नसल्यास दुसरा शब्द वापरून पहावा. ज्या वेळेस आपण मुळांतील शब्दाच्या घेतलेल्या अर्थाचें पृथक्करण करीत असूं, त्या वेळेस आपणांस पृथक्करणकार्य सुलभ होण्यासाठी इंग्रजी कोश उघडून पहावा. त्यांत एकापेक्षां अधिक शब्द वापरून अर्थ दिला असेल; तसें असल्यास अर्थांगाचें पृथक्करण करण्याचें कार्य सुलभ होईल. इंग्रजी डिक्शनरींत अर्थ देतांना जे शब्द वापरले असतील ते देखील साधे नसतील. त्यांपैकीं अनेक असे असतील कीं, प्रत्येक शब्दांत अंतर्भूत होणारी कल्पना साधी नसून संकीर्ण असेल. तर त्या त्या शब्दांचे देखील पृथक्करण केलें पाहिजे; व त्यासाठीं घटकावयवीभूत तेहि शब्द पुन्हां कोशांत पाहिले पाहिजेत.