प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.

वर्गीकरणदोषकारणें.- वर्गीकरण तपासतांना एक गोष्ट दिसून येते कीं, सर्व वर्गीकरणें किंवा शास्त्रांना विशिष्ट नांवे देणें या क्रिया शास्त्रविषयांच्या इतर विषयापासून स्वाभाविक पृथकपणावर किंवा निष्पादित ज्ञानाच्या सादृश्यासादृश्यावर झालेल्या दिसत नाहींत. केवळ तर्कशास्त्राच्या दृष्टीनें, बुद्धि निरंकुश ठेवुन, वर्गीकरण करणें या पद्धतीस अडथळा करूं पहाणार्‍या अहंकारमूलक मानवी भावना शास्त्रज्ञांमध्यें दिसून येतात. शास्त्राच्या क्षेत्रामध्यें अहंकारमूलक मानवी भावनांचे प्रयोजन काय ? प्रयोजन नसलें तरी अहंकाराचें वर्गीकरणांत व व्याख्येंत अस्तित्व दृष्टीस पडत आहे, हें आपणांस दिसून येईल. अहंकार खालील प्रकारांनी दृष्टीस पडतोः-

(१) जातिमूलक अहंकार.— अर्थशास्त्राच्या इतिहासांत इंग्रजी व जर्मन असे दोन संप्रदाय झाले होते, व कांही अंशी अद्याप आहेत.  बोस्टनच्या आसपासच्या शिक्षण संस्थांतील प्रोफेसर इंग्रजी संप्रदायाचे अवलंबन करतात; आणि याचें अंशतः तरी कारण आम्ही इंग्रज आहों ही भावना त्यांत असतें हें होय. ग्रेट ब्रिटनमध्ये ख्रिस्ती संप्रदाय सुरू होण्यापूर्वी देखील लोकांच्या नीतिकल्पना उच्च होत्या हें जर कोणी जुन्या वेल्श ग्रंथापासुन, किंवा "ट्रियाड" सारख्या वेल्श स्मृतिग्रंथांवरून सिद्ध करून दाखविलें, तर वेल्श पंडितांचा त्यावर लौकर विश्वास बसतो. तसेंच, येसू ख्रिस्त हा ज्यू नसून "आर्यन रेस" चा होता असें दाखविण्याची आवड आज ज्यू नसलेल्या अमेरिक लोकांत पुष्कळ झालेली आहे.

(२) अभ्यासक्षेत्रमुलक दुरभिमान.— ज्या विषयाचा अभ्यास आपण करतों त्याचा नकळत अभिमान जडतो. सेमिटिक भाषांचा व वाङ्‌मयाचा अभ्यास करणार्‍यास वेदांचें प्राचीनत्व सांगितलेलें आवडत नाही. र्‍हीस डेव्हिड्स सारख्या पाली वाङ्‌मय वाचलेल्या मनुष्यास पालीतील ग्रंथ संस्कृत ग्रंथापेक्षां ज्यास्त विश्वसनीय वाटतात.  कांहीं झंदावेस्ताचा अभ्यास करणार्‍या पंडितांस (उदाहरणार्थ प्रोफेसर जाकसन यांस) वेदाचें ज्ञान बेताचेंच असतां वेदाच्या बर्‍याच भागापेक्षां झंदावेस्ताचें प्राचीनत्व गृहीत धरण्याचा मोह उत्पन्न होतो. जो विषय आपला अभ्यासाचा असें आपण ठरिवलें असेंल त्याच्या लगतचे विषय घेऊन ते आपल्याच विषयांत घुसडण्याचा, व ते विषय जर स्वतंत्र शास्त्र म्हणून स्थान मागत असतील तर त्यांस तें नाकारण्याचा देखील परिपाठ आहे. आपापल्या विषयांचें क्षेत्र कोणी वाढवीत असलें आणि दुसर्‍या विषयांचे पुरस्कर्ते त्याबद्दल भांडत असले म्हणजे दोघांची समजुत काढण्याकरितां आणि तडजोड करण्याकरितां देखील वर्गीकरणें बनविण्याचा प्रयत्‍न होत आहे. आणि या प्रकारच्या प्रयत्‍नांमुळें मानवशास्त्रविषयक शास्त्रांत म्हणजे अँन्थ्रॉपॉलॉजी एथनालॉजी, सोशिआलॉजी, फिलासफी आफ हिस्टरी, इन्टरप्रिटेशन ऑफ हिस्टरी, वगैरेविषयीं जो वर्गीकरणात्मक वादविवाद झाला आहे ह्याचें बहुतेक आज हयात असलेंलें वाङ्‌मय जळून गेलें तर जगाचें नुकसान न होतां झाला तर फायदाच होईल. आपल्या अभ्यासक्षेत्राच्या दुरभिमानीपणानें आणि त्यांत तडजोड करण्याच्या भावनेनें चांगल्या शास्त्रज्ञांनी इतका मूर्खपणा लिहुन ठेवला आहे कीं सुशिक्षित माणसें इतका बाष्कळपणा करीत बसतील असें कोणीं सांगितल्यास खरें देखील वाटणार नाही.

(३) राजकीय भावनामूलक.— तसेंच इतर सामाजिक भावनामूलक दुराग्रहांनी शास्त्रांत जी घाण होते ती "इतिहाससंशोधन" या सदराखाली दिलीं आहे.