प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
 
व्यवहारांतील शब्दांवरुन शास्त्रीय परिभाषा.— जेव्हां व्यवहारांतील शब्द घेऊन त्या शब्दांच्या अर्थकक्षा व्याख्येनें वर्णन करून शब्दांचा अर्थ निश्चित करण्यांत येतो आणि व्यावहारिक शब्द या कियेनें शास्त्रीय शब्द बनतात, तेव्हां शास्त्रामध्यें निराळे संप्रदाय किंवा अवश्यक घोंटाळे उत्पन्न होण्यास क्षेत्र रहातेंच. ज्या शब्दांचे अर्थ भिन्न आहेत, अर्थकक्षा विविध आहेत असे शब्द भारतीयांच्या प्राचीन दर्शनांमधुन आणि परमार्थसाधनपद्धतीमधून इतस्ततः विखुरलेलें असतात. शब्दांच्या अर्थकक्षा संपूर्ण घेऊन त्यांचे पृथक्करण शेवटपंर्यत करणें या क्रिया पुष्कळ शब्दांवर झालेल्याच नाहीत. उदाहरणार्थ (१) बुद्धि (२) योग (३) कर्मयोग (४) ज्ञान (५) यज्ञ (६) उपासना (७) धर्म (८) नीति (९) न्याय या शब्दांच्या अर्थाविषयी निरनिराळ्या लेखांत अनिश्चय आढळून येतो. आणि त्यामुळें आपल्या अभिरूचीप्रमाणें शब्दाचा अर्थ घेण्यास सवड राहिली म्हणजे आपण घेतलेल्या अर्थाला अनुरूप असेच शब्द इतर अर्थाच्या परस्परसंगतीसाठीं ठेवावे लागतात. असें झाले म्हणजे अनेक संज्ञाभिन्नत्वमूलक विचारपद्धति अस्तित्वांत येतात.