प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.   
 
शब्दांच्या अर्थकक्षा समजून भाषांतर पाहिजे:-  इंग्रजी कल्पना व्यक्त करतांना, प्रत्येक शब्दाच्या अर्थाचें संपूर्ण क्षेत्र आणि त्या अर्थकक्षेच्या अंगांचा इतिहास लक्ष्यांत न घेतां केवळ इंग्रजी शब्दांपासून व्यक्त होणार्‍या अर्थांगांपैकीं एका अंगाकडेच लक्ष जाऊन त्यास प्रतिशब्द मराठीत योजले गेले आहेत;  आणि हे मराठीत प्रतिशब्द योजतांना जे प्रतिशब्द वापरले गेले त्यांची अर्थकक्षा पूर्णपणें लक्षातं न घेतल्यामुळें जसें ज्ञान दुष्ट झालें आहे तशीच मराठी भाषा देखील दुष्ट झाली आहे; आणि यामुळे शुद्ध ज्ञान देण्याकडे तसेंच शुद्ध भाषा वापरण्याकडे लक्ष देणें अत्यंत अवश्य आहे. यासाठीं, कधी कधी जो विचार आपणांस व्यक्त करावयाचा तो मनांत संस्कृतमध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्‍न करावा, आणि संस्कृतमध्ये व्यक्त करण्यास अडचण पडते कीं काय हें पहावें. ज्या तर्‍हेचे सामान्य विचार आज आपण व्यक्त करीत आहों, त्या तर्‍हेचे विचार इ. स. १८१८ पूर्वी संस्कृत पंडितांनीं कसे व्यक्त केले असते हा विचार मनांत आणावा. असें केल्यानें भाषाशुद्धि बरीच होईल.

उदाहरणार्थ "ही गोष्ट आपल्या धर्मांत आहे काय ?" अशा तर्‍हेचें वाक्य पुष्कळ सुशिक्षितांच्याहि लेखांत आढळून येतें. हें वाक्य. "इझ इट इन अवर रिलिजन ?" या वाक्याचें भाषांतर होय. असें भाषांतर करणारांनी 'रिलिजन' आणि धर्म हे शब्द समानार्थक आहेत असें गृहीत धरलें आहे; आणि हा प्रश्न ह्यामुळें सार्थ आहे असें कित्येकांस वाटते. १८१८ पूर्वीच्या पंडीतांनी 'ही गोष्ट धर्म आहे काय ? ' असा प्रश्न विचारला असता. प्रस्तुत भाषाभेदाचें प्रयोजन एवढेंच कीं, पाश्चात्त्य संस्थांमध्ये वरील प्रकारचा प्रश्न योग्य होता; आणि त्यांच्या वाक्याचें शब्दश: भाषांतर करण्याची संवय गेल्या पिढींतील लोकांस लागली. पाश्चात्यांच्या भाषांमध्ये असल्या प्रकारचा प्रश्न सार्थ होण्यांचे कारण हेंच कीं, त्यांचा समाज कांही विशिष्ट तत्त्वें अगोदर स्थापन होऊन, ती तत्त्वें जे गृहीत धरतील त्यांचा त्या समाजांत अंतर्भान करावा या पद्धतीनें बनलेला आहे. त्यामुळें प्रत्येक मनुष्यास अमुक गोष्ट आपल्या समाजघटनेच्या पूर्व तत्त्वांत म्हणजे 'रिलिजन' मध्यें आहे किंवा नाही हा प्रश्न सार्थ होई. तथापि हिंदु समाज म्हणजे कांही विशिष्ट तत्त्वें अगोदर स्थापन करून तीं ग्राह्य करणारांचा समाज बनवा. वयाचा, आणि जे जे ती तत्त्वें घेतील त्यांचा त्या समाजांत अंतर्भाव करावयाचा अशा पद्धतीनें बनला नाही.