प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
शास्त्र आणि प्रत्यक्ष.— प्रत्येक शास्त्रांत संशोधन करतांना अनेक ज्ञानोत्पादक पद्धतींची, व अवलोकनदोष टाळण्याच्या पद्धतींची माहिती असावी लागते. तथापि, जी सर्वसाधारण विचारपद्धति शास्त्रांत प्राधान्यें करून दिसून येते ती येणेंप्रमाणे:- संशोधकाच्या मनांत कोणत्याहि संशोधनप्रसंगी काय असावे याविषयी एक कल्पना बनलेली असते. ती कल्पना बरोबर आहे किंवा नाहीं हें पहाण्यासाठीं तो साहित्य गोळा करतो. आणि साहित्याच्या अभ्यासानंतर त्याची मूळची अंधुक कल्पना बरीच निश्चित होते किंवा तींत महत्त्वाचे फेरफार होतात. ही एक सामान्य पद्धति झाली. दुसरी पद्धति म्हणजे बर्याचशा सदृश गोष्टी अगोदर जमा करावयाच्या आणि नंतर त्यांच्या अभ्यासानें जे नियम निघतील ते निघूं द्यावयाचे. या दोन पद्धतींमध्यें वस्तुतः तीव्र भेद नाही. कारण साहित्य जमा करावयाच्या अगोदर, त्याच्या उपयोगासंबंधाने कांही तरी कल्पना असल्याशिवाय साहित्य जमाच करतां येणार नाही. आणि जो आपल्या मनांत कांही तरी कल्पना अगोदर बसवितो आणि मग साहित्य जमवितो त्याची कल्पना देखील साहित्यमूलकच असते. या दोन पद्धतीत फारसा फरक नसतांना त्यांच्याविषयी अकांडतांडव बरेंच झालें आहे. साहित्य आधी कीं कल्पना आधी, हा वाद बीज आधी की वृक्ष आधीं या वादाप्रमाणेंच वायफळ आहे. साहित्यमूलक (ए पॉस्टिरिओरि) आणि मतमूलक (एप्रायोरि) सिद्धांत हे दोन्ही एकमेकांच्या साहाय्यानें तपासले पाहिजेत.