प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
शास्त्र, कला आणि शास्त्रोत्पत्ति:- शास्त्र आणि कला यांची भिन्नता वारंवार अर्वाचीन लेखक व्यक्त करतात. कलेचा उद्देश म्हणजे विशिष्ट उपयोगाचा आणि मागणीचा माल बनविणें अगर विशिष्ट क्रिया करणें, आणि शास्त्राचां उद्देश म्हणजे तत्त्वें सांगणें. या तर्हेचा भेद कांही वर्षांपुर्वी तत्त्ववेत्ते काढीत असत; पण त्या प्रकारच्या भेदास आज फारसें महत्त्व देत नाहींत. व्यवहारांत चालू असलेलें शास्त्र अशी कलेची व्याख्या करतां येईल. शिवाय हें लक्षांत ठेवले पाहिजे की, शास्त्र प्रथम कलारूपानें अस्तित्वांत येतें. मनुष्य नेहमी रोजच्या व्यवहारांतील आपणांस उपयुक्त असेच प्रश्न हातीं घेतो व आपले अनुभव व त्यांवरून आपण काढलेले सिद्धांत लिहून ठेवतो. अशा प्रकारें जे ग्रंथ लिहिले जातात त्यांत प्रत्येक प्रश्नाचा निरनिराळ्या शास्त्रांच्या दृष्टीस विचार झालेला असतो.