प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
शास्त्रवृद्धीचे दोन मुख्य घटक, आणि त्या दोहोंचे मनुष्यविषयक शास्त्रांत प्रामुख्य:- शास्त्रीय ज्ञानांतील आपली प्रगति पुढील दोन गोष्टींमुळें होते या घटकांच्या म्हणजे प्रगतिकारकांच्या फलांचे शास्त्रेतिहासांत प्रमाण आपणांस निश्चित करतां यावें.
ते घटक म्हटले म्हणजे (१) वस्तुस्थितीविषयी मानवी ज्ञानांत प्रगति व (२) मूलतः वस्तुस्थितींतच प्रगति हे होत. केवळ समाजशास्त्रांतच फक्त यांतील दुसरा भाग महत्त्वाचा असतो. जीवनशास्त्राची गोष्ट तशी नाही. जीवनशास्त्रामध्ये जीवावस्था पूर्वीच्या व नव्या अभ्यासकांच्या काळांत एकसारखीच होती असें गृहीत धरलें पाहिजे. कां कीं, जीवनशास्त्रविषयक विकासामध्यें वस्तुस्थितींतील प्रगति ही सहज निदर्शनास येणारी गोष्ट नाही.
दोन दुरस्थित काळांतील क्रियांसंबंधानें तें एक अनुमान काढण्याचा या शास्त्राभ्यासांत प्रयत्न होत असतो. तथापि शंभर दीडशें वर्षांत अमुक नवीन प्राणी उत्पन्न झाले असें कोणासहि सांगतां येणार नाहीं. समाजशास्त्रामध्यें ज्ञानक्षेत्राचें अधिकतर ज्ञान आणि क्षेत्रवस्तुवृद्धिमूलक ज्ञान या उपरिनिर्दिष्ट दोन्ही हि गोष्टींमुळें ज्ञानवृद्धीची शक्यता आहे. शिवाय या दोन्ही ज्ञानप्रेरकांचा एकमेकांवर परिणाम होत असतो. याचा अर्थ असा कीं, भावी सामाजिक परिस्थितीवर आपणांस आज जें समाजशास्त्रीय ज्ञान असेल त्याचा बराच परिणाम होऊं शकतो. जनावरांचे गृह्यीकरण म्हणजे माणसाळवणें हें आपण समाजशास्त्रांत अंतर्भूत करण्याऐवजीं जीवनशास्त्रांतच अंतर्भूत केलें तर मात्र वस्तुवृद्धिमूलक प्राणिशास्त्रांत वृद्धीचें आणि वास्तविक सृष्टिवर सृष्टिज्ञानमूलक परिणामाचे उदाहरण देतां येईल.
भूस्तरशास्त्र, ज्योतिःशास्त्र व सेंद्रिय सृष्टिशास्त्रें म्हणजे प्राणिशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र व या शास्त्रांतर्गत शरीरशास्त्र व इंद्रियविज्ञानशास्त्र या शास्त्रांचा अभ्यास अधिकाधिक वाढविणें म्हणजे पूर्वकालीं देखील अस्तित्वांत असलेल्या, तथापि आपणांस ठाऊक नसलेल्या गोष्टींची माहिती अधिकाधिक मिळविणें आहे. कदाचित रोगविज्ञानशास्त्र वस्तुसृष्टिवृद्धीमुळें अधिक वाढत असेल, पण त्याविषयीहि खात्री देतां येत नाही. तथापि हें शक्य आहे कीं, कमी प्रगत राष्ट्रामध्यें किंवा काळामध्यें जो मनुष्य मरुन जावयाचा, तो सुधारणेनें अधिक वर्षे जगविल्या मुळें, किंवा नवीन वस्तूंच्या ग्रहणामुळें ज्या रोगांचें किंवा ज्या रोगविकासांच्या लक्षणांचें अस्तित्त्व पूर्वकाली नसेल त्यांचे अस्तित्व नवीन काली असणें शक्य आहे. म्हणजे रोगविज्ञानशास्त्र हें मात्र वस्तुवृद्धीमुळे वाढणें शक्य आहे.
थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे मनुष्य ज्या क्रिया करतो त्यांचा अभ्यास हा नेहमीं वाढतच जाणार. या अभ्यासाला मर्यादा नाहीं.