प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
शास्त्रीय ग्रंथांची चिरकालता व वैज्ञानिक इतिहासांत महत्त्व:- अशा प्रकारच्या पुस्तकांची, त्यांत कमजास्त प्रमाणांत दिसून येणारा भाषाकौशल्याचा गुण बिलकुल लक्षांत न घेतांहि आधुनिक जगांतील श्रेष्टतम ग्रंथांत गणना करणें भाग आहे. कारण त्यांनीं जगांतील एकंदर विचारप्रगतीवर, इतकेंच नव्हे तर प्रत्यक्ष जागतिक सुधारणेच्या कार्यांवर फार परिणाम घडवून आणलेला आहे. उदाहरणार्थं, आरिस्टॉटलचे निरनिराळ्या शास्त्रीय विषयांवरील लेख शास्त्रीय ज्ञानाच्या बहुधा प्रत्येक शाखेवर अत्यंत प्रमाणभूत म्हणून आरिस्टॉटलनंतरच्या सुमारें शंभर पिढ्यांतील त्याच्या अनुयायांकडून मानले जातत. टॉलेमीचे आल्माजेस्ट व जॉग्रफिया, आणि थोरल्या प्लीनीचा नॅचरल हिस्ट्री ( भौतिक शास्त्रें ) हे ग्रंथहि, ऑरिस्टॉटलच्या मतांशी विरोध नाहीं अशा सर्व बाबतींत, त्या त्या ज्ञानक्षेंत्रात अखेरचा निर्णय देणारे म्हणून एक हजार वर्षे गणले जात होते. कोपर्निकसचा “ रेव्होल्यूशनिबस ऑर्बियम सीलेश्चियम् ” यानें तर विश्चरचनेच्या बाबतींतील परंपरागत मान्य मतांमध्यें, व विश्चरचनेमध्यें पृथ्वीचें महत्त्व किती या संबधाच्या कल्पनेमध्येंहि प्रत्यक्ष क्रांतीच घडवून दिली. न्यूटनच्या “ प्रिन्सिपिया” या ग्रंथानें आकाशांतील गोलांची परस्परांशीं यंत्रासारखी व्यवस्थित जुळणी स्पष्टपणें समजावून देऊन अखिल मानवजातीला आश्चर्यचकित करून सोडलें.
लापलासच्या ‘ मेकानिक सेलेश्ची’ व “ सिस्टिम डु माँड ” या ग्रंथांनी तेजोमेघसिध्दान्तविषयक उपपत्ति ( नेब्युलर हायपॉथेसिस ) पुढें मांडून विश्वाच्या उत्पत्तीसंबंधाचें कोडें प्रथम उलगडून सांगितलें.
पृथ्वीच्या पोटांतील निरनिराळ्या थरांच्या उत्पत्तीसंबंधाचें ज्ञान मनुष्यजातीला अस्पष्टपणें सुद्धां नव्हतें तें प्रथम जेम्स हटन या लेखकाच्या “ रेव्होल्यूशन्स ऑफ दी ग्लोब ” या ग्रंथानें करून दिलें. त्यानें जे सिद्धांत पुढें मांडले, त्यांच्या योगानें आपल्या या भूगोलाच्या वयोमर्यादेसंबंधाच्या पूर्वापार चालत आलेल्या कल्पना पूर्णपणें बदलून टाकल्या. हटनचेच सिन्त लायेलनें अधिक व्यापक करून व सुधारून स्वत: च्या “प्रिन्सिपल्स ऑफ जीऑलजी” या नावांच्या ग्रंथांत पूर्ण सविस्तरपणें वर्णन केलेले आहेत.
आपल्या या पृथ्वीच्या पाठीवर वस्ती करून राहिलेल्या अनेकविध प्राणिमात्रांच्या पिढ्यांसंबंधानें, त्यांच्या पूर्वकालीन अस्तित्त्वासंबंधानें, पृथ्वीच्या पोटांत इतस्तत: सांपडणार्या अवशेषांखेरीज दुसरा यत्किंचित् पुरावा नसतांहि, कूव्हिएनें आपल्या “ ऑसेमेंटा फॉसिल्स” या ग्रंथात त्यांची प्रथम कल्पना आणून दिली. प्राणिमात्रांच्या या निरनिराळ्या जातींच्या उत्पत्तीचीं कारणें प्रथम लामार्कनें १८०९ मध्यें पुढें मांडलीं व त्यानंतर अर्ध्या शतकानेंच डार्विननें आपल्या “ओरिजन ऑफ स्पीशीज” या ग्रंथात त्याची अधिक समाधानकारक अंशी उपपत्ति लावून दिली.
याप्रमाणें ज्ञानात्मक वाङ्मयांतील प्रसिद्ध ग्रंथांची ही सहज सुचलेली यादी आहे. यापैकीं प्रत्येक ग्रंथ नवशककर्ता होता असें म्हणण्यास हरकत नाहीं; आणि ज्ञानाची प्रगति करण्याच्या कामी त्यांनीं जे साहाय्य केलं आहे, तें लक्षांत घेतां या ग्रंथाचीं नांवे अजरामर होऊन राहणार याबद्दल बिलकुल शंका वाटत नाहीं. तथापि त्यांमध्यें ऊहापोह केलेल्या प्रश्नांचें स्वरूप असें आहे कीं त्यांपैकीं कांही ग्रंथ सुशिक्षित असलेल्या लोकांपैकीं सु बहुतेकांच्या दृष्टिपथांत येणें शक्य नाहीं. उदाहरणार्थ ‘प्रिन्सिपिया’ आणि’ मेकॅनिक सेलेश्ची’ वास्तविक गणितविषयक आहेत, आणि त्यामुळें वाचनप्रेमी अशा सर्व लोकांचा, एक लहानसा विभाग खेरीज करून, कोणालाहि अर्थबोध होणार नाहीं असे आहेत. उलट पक्षीं, पृथ्वीच्या पोटांतील थरांची उत्पत्ति व निरनिराळ्या सेंद्रिय जीवांचा विकास हे विषय शास्त्रीय असूनहि अशा प्रकारचे आहेत कीं, तद्विषयक शास्त्रीय ग्रंथांत सुंदर मनोहर भाषा वापरणें अगदीं सुलभ असतें. अशा ग्रंथांपैकी कांहींचा इतिहास पाहिल्यास त्यावरून असें स्पष्ट तात्पर्य निघतें कीं, अत्यंत पारिभाषिक शब्दयोजना करणार्या शास्त्रीय लेखकांनां सु भाषाकौशल्याची पुष्कळ मदत होते. उदाहरणार्थ, हटननें लिहिलेल्या ग्रंथाचा विषय अद्भूत असूनहि त्याच्या बोजड व नीरस भाषापद्धतीमुळें त्या ग्रंथाला वाचक फारच थोडे मिळाले, प्लेफेयर तो ग्रंथ बहुतेक पुन्हां लिहून काढीपर्यंत त्यांतील माहिती बहुतेक अज्ञात स्थितीतच पडलेली होती. पुढें तोच विषय जेव्हां लायेटनें हाती घेतला तेव्हां वास्तविक त्या विषयांत एका सबंध पिढीच्या ज्ञानाची अधिक भर पडली होती; पण लायेलनें आपल्या “प्रिन्सिपिया” या ग्रंथांत घातलेल्या नवीन ज्ञानाच्या भरतीपेक्षां त्या ग्रंथांतील सुस्पष्ट व मनोहर लेखनशैलीमुळेंच लोकांचें लक्ष या नव्या भूस्तरशास्त्राकडे अधिक वेधलें. चित्ताकर्षक भाषा वापरणें हें काम किती कठिण आहे, पण त्याबरोबरच तें किती स्पृहणीय आहे या दोन्ही गोष्टी लायेलनें उघडपणें पुढें मांडल्या. आणि सुलभ मनोहर भाषा लिहिण्यांत त्याला जें यश आलें त्यामुळेंच त्यांने पुढें मांडलेल्या अगदी क्रांतिकारक तत्त्वांनां त्याच्याच पिढीकडून मान्यता मिळाली. नाहींतर ती मान्यता आणखीहि बराच काळ मिळाली नसती.
डार्विनच्या “ ओरिजिन् आफ् स्पीशीज ” या ग्रंथाच्या लोकप्रियतेलाहि बर्याच अंशी त्यांतील भाषाकौशल्यच कारणीभूत झालेलें आहे. हा ग्रंथ म्हणजे त्याच्या कर्त्यानें वीस वर्षे सतत परिश्रमानें मिळविलेल्या अवाढव्य माहितीचा केवळ थोडक्यांत गोषवारा असल्यामुळें तो अथपासून तच्छास्त्रविषयक माहितीनें ओतप्रोत भरलेला आहे, आणि म्हणून तो वाचावयाला सुलभ मनोहर असेल अशी अपेक्षाच करितां येत नाहीं. असे असूनहि लेखनाच्या कौशल्यामुळें तो ग्रंथ वाङ्मयांत मोडेल असा झाला आहे. या ग्रंथासंबधानें प्रोफेसर हक्सले म्हणत असे कीं तो ग्रंथ पुन: पुन वाचतांना प्रत्येक वेळां पूर्ववाचनाच्या वेळीं नजरेंतून गळालेल्या अशा नव्यानव्या गोष्टी मनावर ठसतात; आणि डार्विनच्या अगदीं पट्टशिष्याला जर ही अशी कबुली द्यावी लागली तर पुस्तकांतील सर्व माहिती पूर्णपणें एखाद्यानें अवगत करून घेतली असा एकहि वाचक असणें फार मुष्किलीची गोष्ट आहे. तथापि या ग्रंथांतील माहिती इतक्या व्यवस्थितपणानें व कुशलतेंनें पुढें मांडलेली आहे की, वाचकाच्या मनावर ग्रंथकर्त्याचे उद्दिष्ट सिद्धांत स्पष्ट व नि:संदिग्धपणानें ठसल्यावांचून रहात नाहीत. असें आहे तरी हें कबूल केलें पाहिजे की, या ग्रंथातली माहिती एखादा अधिक कुशल लेखकाला अधिक चांगली मनावर ठसेल अशा रीतीनें मांडतां आली असती. कोपर्निकसचे क्रांतिकारक सिद्धांत गॅलीलिओनें आपल्या “ डायलॉग्ज” या ग्रंथात जरी बर्याच कुशलतेनें पुढे मांडले आहेत, तरी तीच माहिती हक्सलेंने आपल्या “ मॅन्स प्लेस इन नेचर ” निबंधात अत्यंत कौतुकास्पद अशा सुलभभाषापद्धतीनें लिहून प्रसिद्ध केल्यामुळेंच डॉर्विनच्या इतकेच क्रांतिकारक असलेले हे कोपिर्निकसचे सित लोकांत लवकर प्रसार पावले. शिवाय या कार्यात हक्सले एकटाच नसून त्याच्या मदतीला दुसर्या एका शास्त्रांतला विद्वान् व भाषासौदर्यशास्त्राच्या दृष्टीनें अधिक कुशल लेखक पुढें आला. उत्तम इंग्रजी भाषा लिहिणारा या अर्थानें प्रस्तुत लेखक जो प्रोफेसर टिंडाल त्याशीं त्याच्या पिढींतील शास्त्रज्ञ लेखकांमध्यें कोणीच तुल्य नव्हता असें म्हटले तरी चालेल. टिंडालचे ग्रंथ व त्याच प्रमाणें हक्सलेचे ग्रंथ, अत्यंत अवघड शास्त्रीय विषयहि किती सुलभमनोहर भाषेंत लिहिणें शक्य आहे, यासंबंधाचे उत्कृष्ट नमुनें आहेत. त्यांनी आपल्या निबंधात दिलेली सर्व माहिती सारख्या योग्यतेची आहे असें मुळीच नाही. त्यापैकी बरीचशी माहिती वादग्रस्त स्वरूपाची अतएव तात्कालिक महत्त्वाचीच आहे. तरीपण या त्यांच्या लेखांपैकी बराचसा भाग, विशेषत: “ हीट अँज ए मोड ऑफ मोशन ” हें टिंडालचें पुस्तक, व त्याचप्रमाणें हक्सलेची अनेक लोकप्रिय व्याख्यानें वाङ्मयाचे उत्कृष्ट नमुने म्हणून वाचकांना बराच काल मोहित करीत राहतील अशी आशा वाटते.
तथापि या पुस्तकांची लोकप्रियता यावच्चंद्रदिवाकरौ टिकेल अशी आशा करणें व्यर्थ आहे; शिवाय एकदोन पिढ्यांनंतर त्यांतील माहितीला तर ऐतिहासिक महत्त्वाखेरीज इतर कोणतेंहि महत्त्व उरणार नाही. प्रथमप्रसिद्धीच्या काळांत हे ग्रंथ शास्त्रीय वाङ्मयांत श्रेष्ठ प्रतीचे म्हणून मानले गले, व पुढेंहि ते तसेच मानले जातील; परंतु विषयाचे व माहितीचें नाविन्य जसजसें कमी होत जाईल तसतशी त्यांची लोकप्रियता कमी होत जाणार हें उघड आहे. अशा प्रकारच्या पूर्वकालीन पुंस्तकांचा इतिहास पाहिल्यास वरील चिरकालतेविषयीं प्रतिकूल भाकिताच्या सत्यतेविषयी फारशी शंका उरत नाहीं. उदाहरणार्थ, कवि व शास्त्रज्ञ असलेला जो डेव्ही याने त्याच्या निबंधानीं १९ व्या शतकाच्या आरंभीच्या काळांतील इंग्रजी भाषा बोलणारांना फार मोहून टाकलें होतें; किंवा त्यानंतर १८७९ च्या सुमारास ऑरॅगो याच्या सहजसुंदर लेखांनी फ्रान्सची सर्व राजधानी हलवून सोडली होती हें खरें आहे; तथापि इतकी लोकप्रिय असलेली ही पुस्तकें आजकाल पुस्तकांच्या कपाटांतून केवळ धूळ खात पडलेली आढळतात.
शास्त्रीय विषयावरील सर्व पुस्तकांची अखेर गत हीच व्हावयाची; कारण अशा पुस्तकांची भाषा कितीहि सुंदर असली तरी त्यांचें महत्त्व मुख्यत: त्यांत दिलेल्या शास्त्रीय माहितीपुरतेंच असतें. उलट पक्षी काव्य, नाटक व गोष्टी या विषयांवरील वाङ्मयांत मनुष्यस्वभावांत दिसून येणार्या कित्येक अत्यंत महत्त्वाच्या मनोविकारांसंबंधानें वर्णन असल्यामुळें व असल्या मनोविकारांच्या स्वरूपांत केवळ कालगतीमुळें फरक होण्याचा फारच थोडा संभव असल्यामुळें अशी पुस्तकें पिढ्यानुपिढ्या लोकरंजनाचें काम सारख्या प्रमाणांत करीत राहणार हें उघड आहे. पतंजलीपेक्षां कालिदासाची लोकप्रियता आणि चिरकालत्व यामुळेंच आहे. केवळ शास्त्रीय माहिती देणारी पुस्तकें थोड्याफार अवधीनें मागें अज्ञात स्थितींत पडल्यावांचून कधींहि रहावयाची नाहीत हें निश्चित आहे.