प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
शास्त्रांचा उदय व संवर्धन.— शास्त्रांचा उदय सामान्य ज्ञानांत होतो. सहज दिसणारीं कार्ये आणि कारणें प्रथम विचारविषय होतात, आणि तदनंतर त्या अनेक सद्दश प्रत्यक्षांचा समुच्चय होऊन व त्यांमधील एकमेंकास जोडणारे धागे सांपडून त्याचें शास्त्र होतें. जें दिसतें त्याचें कारण देण्याची प्रवृत्ति होते; आणि तें कारण देतांना प्रथम अद्भुत कारण दिलें जातें.
फ्रेंच तत्त्ववेत्ता आगस्ट कोंट यानें म्हटलें आहे की, आपल्यां ज्ञानाच्या पायर्या तीन आहेत. पहिली पायरी म्हणजे दृश्य भावाचें पहिलें स्पष्टीकरण. हे ईश्र्वरविषयक समजुतीवर रचलेलें असतें. धरणीकंप कां होतो, तर डोक्यावर धरणी धरणारा शेष आपली मान हलवितो म्हणून. कांही तरी सर्वव्यापी, भावविषयक व ज्याचें अस्तित्व वस्तुतः नाही पण केवळ सुशिक्षित कल्पनेलाच ज्ञात आहे अशा कारणांनी कार्य समजाविलें जाणें ही ज्ञानाची दुसरी पायरी होय. कुत्रा चालतो कां ? तर त्यांत गति आहे म्हणून. अशा प्रकारचें उत्तर म्हणजे प्रश्नाचीच भाववाचक पुनरावृत्ति होय. शास्त्रीय तर्हेनें प्रत्येक गोष्टी सोडवावी ही आपल्या ज्ञानाची व ज्ञानमूलक प्रवृत्तीची तिसरी पायरी होय. येथे प्रत्येक कार्याचीं प्रथमतः निकट व नंतर दूरस्थ कारणें शोधावयाचीं आणि निकट व दूरस्थ यांतील संबध शोधावयाचा व जीं आपण कारणें देतों त्यांचा व कार्यांचा कांहीं पद्धतिमूलक संबंध आहे, किंवा आपण जें कारण म्हणतों तें कार्याचा केवळ सहचारी भाग आहे किंवा नाहीं हे पहावयाचें.
जगांत होणार्या कार्यांस कारण देण्यासाठीं व जगांत होणार्या सर्व क्रियांचा अर्थ लावण्यासाठीं, तसेंच जगाच्या उत्पत्तीचें कारण देण्यासाठी आपणाकडे जे पहिले प्रयत्न झाले त्यांत देखील देवकृति हेंच स्पष्टीकरण होतें. पाऊस कां पडतो ? तर इंद्र आपल्या वज्रानें वृषपर्व्यानें अडकवून ठेवलेले मेघ सोडवितो म्हणुन. विश्व उत्पन्न कसें झालें ? तर देवांनीं आणि साध्यांनी सहस्त्रशीर्ष, सहस्त्रपाद व भूमीस आणि विश्वदिशांनां व्यापून दहा अंगुळें उरणार्या विराट पुरूषाचा यज्ञ केला, त्या यज्ञांत झालेल्या विराट पुरूषाच्या अंगांच्या रूपांतरानें किंवा प्रकृति व पुरूष या दोन सर्वव्यापी तत्त्वांच्या परस्परांवर होणार्या परिणामानें ! हें कोंटनें वर्णिलेल्या दोन प्रकारांनीं होणारें स्पष्टीकरण होय. यूरोपियन लोकांनी आकाशांतील निरनिराळे तारे व तारकापुंज व आकाररूप न पावलेला आकाशांतील द्रव्यसंचय (नेब्यूला) या पासून तर आजच्या होत असलेल्या नैसर्गिक क्रिया यांचे अवलोकन करून जगांतील रूपातरांसंबधीं जे नियम बसविले ते शास्त्रीय होत, असें अर्वाचीन शास्त्राचे उपासक म्हणतील.
येथें असेंहि सांगितलें पाहिजे की, वर सांगितलेली प्रकृति-पुरूष-मूलक सृष्टीची उत्पत्ति आहे, या मताच्या जवळजवळ अर्वाचीन शास्त्रज्ञांचे मत येत आहे.