प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.

शास्त्रज्ञान आणि भारतीय दृष्टि:- अस्तित्वांत आलेल्या ज्ञानाचा, आणि ज्ञान देऊं असा बाणा अगर बहाणा करणार्‍या वाङ्‌मयाचा हिशोब घेण्याचें प्रयोजन शास्त्रेतिहासामुळें उत्पन्न होतें, आणि यामुळे शिक्षणविषयक मुत्सद्देगिरीस शास्त्रेतिहासाचा उपयोग आहे. आपल्या राष्ट्राचा काल ज्ञानग्रहणाचा आहे. ज्ञानग्रहण करतांना आपणांस दिशा पाहिजे. नाहीं तर काय शिकावे आणि काय नाहीं इकडे लक्ष राहणार नाही. सामान्यतः शिक्षण गरजांवर अवलंबून असतें. म्हणजे ज्या शिक्षणाची बाजारांत किंमत अधिक तें शिक्षण वाढतें. तथापि बाजारांतील किमंत देखील पुष्कळदां अस्पष्ट आणि सदोष असते. सरकारच्या हातीं नोकर्‍या देण्याचीं संधि असल्यामुळें पुष्कळदां समाजांत अनुपयुक्त अशा शिक्षणास देखील मागणी उत्पन्न करणें शक्य आहे. शिवाय हेंहि लक्षांत ठेवले पाहिजे की, ज्ञानग्रहण करतांना अमक्यानें काय शिकावें हा वैयक्तिक प्रश्न झाला. राष्ट्रास सर्व प्रकारच्या ज्ञानाची जरूट


(१) जें आपण शिकावयाचें तें ज्ञान म्हणजें काय आणि अज्ञान म्हणजे काय याचें कठोर अवगमन करून घेतलें पाहिजे; आणि (२) ज्या अर्थी पुष्कळ ज्ञान आपणांस भाषांतर करून घ्यावयाचें आहे, त्या अर्थी आपण केवळ ज्ञानच भाषांतरून घेत आहों, अज्ञान किंवा वायफळ गोष्टी भाषांतर करून घेत नाहीं याबद्दल काळजी वाहाणें आपणास अवश्य आहे.

जगाचें शास्त्रीय ज्ञान एकत्र करणें हे आज आपले कर्तव्य आहे. शास्त्रीय ज्ञान जगांतील निरनिराळ्या राष्ट्रांत उत्पन्न होतें. एखाद्या राष्ट्रास एखाद्या विषयाचें ज्ञान अधिक झालें म्हणजे त्या ज्ञानाचा फायदा इतर राष्ट्रें घेऊ लागतात. आणि हा फायदा घेतांना घेणारीं राष्ट्रें साधारणपणें दुसर्‍या राष्ट्रांत अगर भाषेंत जें ज्ञान पैदा झालें असेल त्या ज्ञानाची मांडणी आपल्या भाषेंत आणि आपल्या परंपरेला जुळेल अशी करतात.

या प्रकारचे प्रयत्‍न ग्रीकांनीं केले, आरबांनी केले आणि पाश्चात्त्य सुसंकृत राष्ट्रांनीहि केले. पाश्चत्त्यांनी कांही ज्ञान आरबांपासूनहि घेतलें आहे.

आपणांस जगाचा ज्ञानसंग्रह स्वायत्त करून घेतांना ज्या क्रिया कराव्या लागतील त्या करतांना दोन गोष्टी लक्षांत घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हटली म्हणजे काय घ्यावयाचें आणि काय टाकावयाचें याचें निरीक्षण. ज्ञान हें ज्ञान मांडण्याच्या रचनेपासून आणि सांपडलेल्या सत्यांस एकत्र जोडण्यासाठीं वारंवार तयार झालेल्या "तत्त्वज्ञानां" पासून म्हणजे विचारपद्धतीपासून मोकळे केलें पाहिजे. आपल्या देशांत पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाकडे पहात असतां आपली वृत्ति अत्यंत साशंक असली पाहिजे.

ज्ञानाच्या शुद्धीकरणासाठीं एक गोष्ट अवश्य आहे की, जें ज्ञान एका राष्ट्रांत प्रसृत होतें त्या ज्ञानाची दुसर्‍या राष्ट्रांकडून किंवा संस्कृतींकडून तपासणी झाली पाहिजे. पाश्चात्त्यांनीं जो ज्ञानसंचय केला तो प्रथम विद्यार्थिबुद्धीनें शिकलाच पाहिजे. तथापि तो ग्राह्य म्हणून घेऊन दुसर्‍यास देण्यापुर्वी तपासला पाहिजे. एका संशोधकानें प्रयोग करून कांहीं सिद्धांत काढले तर त्यांवर एकदम विश्वास टाकण्यापुर्वी दुसर्‍या कोणा संशोधकानें ते तपासून पाहिलेले असावेत, असें ज्याप्रमाणे शास्त्रज्ञांस वाटतें, त्याप्रमाणेंच एका राष्ट्रांत किंवा संस्कृतींत तयार झालेले सिद्धांत दुसर्‍यांनी स्वीकारतांना तपासलेच पाहिजेत.