प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
शास्त्रीकरण.— एकंदर ज्ञान पुरेसें वाढलें म्हणजे प्रगतीची द्वितीयावस्था प्राप्त होते. आतां गोळा झालेल्या झानाचें व्यवस्थेशीर रीतीनें वर्गीकरण होण्यास आरंभ होतो सजातीय कल्पना विजातीय कल्पनांपासुन पृथक करण्यांत येऊन निरनिराळ्या ठिकाणच्या सजातीय कल्पना, त्यानां व्यवस्थित ज्ञानाचें रूप देण्याकरितां, एकत्रित केल्या जातात; व अशा रीतीनें कलेपासून शास्त्र जन्मास येऊन त्यास स्वतंत्र क्षेत्र प्राप्त होतें.
सजातीय कल्पनांच्या एकीकरणाची क्रिया चालली असतां तिजबरोबरच कल्पना स्पष्ट स्वरूपांत येण्याचीहि क्रिया चालू असते, म्हणजे पूर्वीच्या ज्या लौकिक कल्पना असतात त्यांचें आतां शास्त्रशुद्ध कल्पनांत रुपांतर होतें.
लौकिक कल्पना अस्पष्ट, अव्यवस्थित, एकसुत्रीपणा नसलेल्या, निरनिराळ्या ठिकाणांहुन घेतलेल्या व अतएव एकमेंकांशी असंबद्ध स्थितीत असतात. परंतु तत्त्वज्ञ याच कल्पना नियमबद्ध, परस्परनिगडित व सुव्यवस्थित करून उद्गमभेदामुळें या कल्पनांतून दिसून येणारे विरोध काढून टाकण्याचा यत्न करितात. या कल्पनांनां शास्त्रशुद्ध स्वरुपांत आणीत असतां पुष्कळ वेळां तत्त्वज्ञांनां लोकांत प्रचलित असलेल्या शब्दांचीच कांस धरावी लागते. विशेषतः अर्थशास्त्र, नीतीशास्त्र व राजकारणशास्त्र यांसारख्या शास्त्रांत असे प्रसंग फार येतात. कारण अशा शास्त्रांतून विचारी व शोधक बुद्धीच्या शास्त्रज्ञांचे विचार व सामान्य बुद्धीच्या मनुष्याचे विचार यांमध्ये पृथक्त्व दर्शक रेषा स्पष्टपणें दाखविणें फार कठिण असतें. अशा प्रंसगी शास्त्रज्ञांचा प्रचलित शब्दच उपयोगांत आणण्याकडे कल दिसून येतो. हा कल चांगला अगर वाईट किंवा या वांचुन अन्य मार्गच नाही असें सांगण्याचा येथें उद्देश नाहीं. लोकांच्या मनाचा कल अशा प्रकारचा असतो एवढेच फक्त विधान करावयाचें आहे.
लौकिक कल्पना शास्त्रीय विचारांत परिणत होण्याचे मार्ग अनेक आहेत. शब्द व त्यांपासून व्यक्त होणार्या कल्पना यांच्यामधील पृथग्भाव प्रथम ओळखला जाऊं लागतो; व या कल्पनांचें वास्तविक स्वरूप ओळखण्याचा प्रयत्न करण्यांत येतो. ज्यावेळीं कित्येक निरनिराळ्या कल्पना व्यक्त करणार्या एखाद्या शब्दाशीं शास्त्रज्ञांचा संबंध येतो, त्यावेळी त्या शब्दानें व्यक्त होणार्या किंवा सुचविल्या जाणार्या कल्पना, शब्दाच्या अनेकार्थत्वासारख्या भाषावैशिष्ट्यामुळें एकशब्दांकित झाल्या आहेत किंवा मूळ कल्पनांमध्येंच परस्परसंलग्न अशा निरनिराळ्या कल्पनांची प्रणालिका असल्यामुळे झाल्या आहेत या गोष्टींचा ते शाध लावण्याचा प्रयत्न करितात. त्या शोधानंतर शब्दांतर्गत कल्पनेचा विस्तार अगर संकोच करण्याचें काम हाती घेण्यांत येतें. शास्त्रज्ञ दुसरी जी एक गोष्ट करतो ती ही कीं, आपल्यापुढें असलेल्या दोन भिन्न कल्पनांमध्यें कार्यकारणसंबंध अगर अवयवायवीसंबंध यांसारख्या तर्कशास्त्रास अनुमत असा कांहीं संबंध आहे कीं काय, हे पहाण्याचा तो प्रयत्न करतो.
निरनिराळ्या ठिकाणचे विचार, त्यांची सुसंबद्ध रीतीनें मांडणी करण्याकरितां एकत्रित केल्यानंतर व या निरनिराळ्या विचारांमध्ये असलेले अंतस्थ संबंध माहीत झाल्या नंतर शास्त्रज्ञ त्यांस एकमेकांस जोडणारी आणखी एक क्रिया करतो. या सर्व तत्त्वांचा व कल्पनांचा त्या सर्वांच्या मुळांशी असलेल्या ज्या एका किंवा अनेक मूलभूत तत्त्वांमुळें परस्परसंबंध जोडला जातो, ती शोधून काढण्याच्या प्रयत्नास तो लागतो. अशा रीतीनें, शास्त्राचें स्वरूप कसें असलें पाहिजे याची सर्वमान्य उपपत्ति निष्पन्न होते.
वर दर्शविल्याप्रमाणें कल्पनांचा एक ओबडधोबड सांगडा तयार केल्यानंतर त्यामध्यें जी कांही उणीव राहिली असेल ती काढून टाकून त्यास पूर्णत्वास पोंचविण्याची शास्त्रज्ञ खटपट करतो. सुचविलेलें स्पष्टीकरण किंवा अनुमानिक प्रतिज्ञा त्या सिद्धांताची नीट रीतीनें उपपत्ति लावूं शकते किंवा नाही किंवा त्या सिद्धांताची दुसर्या एखाद्या स्पष्टीकरणानें किंवा अनुमानिक प्रतिज्ञेनें त्याहून चांगली उपपत्ति लागणें शक्य आहे काय असले प्रश्न जिज्ञासू लोकांपुढे उभे राहतात.