प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
 
शास्त्रेतिहासाचीं अंगें:-  एखाद्या शास्त्राच्या इतिहासाचा अभ्यास करतांना पुढील गोष्टींकडे विशेष लक्ष दिलें जावे :-

१. शास्त्राच्या बाह्यांगाच्या वाढीचा म्हणजे त्या शास्त्राचें क्षेत्रं किती याचा अभ्यास करण्यांत यावा;  व नंतर शास्त्रीय विचारांची परिणति निरनिराळ्या अवस्थांतून कसकशी होत गेली हें समजण्याचा प्रयत्‍न करावा.

२. कलारूपानें तें प्रथम जन्म कसें पावलें, पुढें अंतस्थ अंगांची वाढ कशी झाली, शास्त्राच्या क्षेत्रांत पडणार्‍या निरनिराळ्या गोष्टी व कल्पना यांचा एकमेकींशी कशा रीतीनें संबंध जडला, हें जाणण्याचा शास्त्रेतिहासज्ञानें प्रयत्‍न करावा.  एकंदर कल्पनांचा परस्परांशीं संबंध लावण्याचे विविध प्रयत्‍न कसकसे होत गेले हें जाणण्याचाच त्यानें प्रयत्‍न केला पाहिजे.

३. प्रस्तुत शास्त्रास निरनिराळ्या पद्धतींपासून म्हणजे इतर शास्त्रांपासून कोणकोणते फायदे झाले आहेत हें त्यानें लक्षांत आणावें. विशिष्ट पद्धतींचा शास्त्रांत प्रवेश कसा झाला व त्यांमुळे त्या शास्त्रांत काय फेरबदल झाले याचें निरीक्षण करावें.

४. या शास्त्रांतील संप्रदायरूपी विचारपद्धतींची वाढ कशी होत गेली इकडेहि त्यानें लक्ष दिलें पाहिजे.  त्यांच्या अस्तित्वापासून काय बोध घेण्यासारखा आहे हें त्यानें ठरवावें;  व वाटल्यास त्यासंबधी आपलीं स्वतःचीं मतेंहि व्यक्त करावीं.

५. प्रत्येक शास्त्राच्या वाढीस कोणते मानवी हितसंबंध कारण झाले याचें वर्णन, म्हणजे त्या शास्त्राच्या आणि भोंवतालच्या आर्थिक व सामाजिक इतिहासाचा अन्योन्याश्रय द्यावा.

६. ग्रंथकाराची इच्छा असली तर त्यानें ज्यांनी या शास्त्राच्या वाढीस थोडाबहुत हातभार लावला असेल त्यांच्या स्वतःविषयींहि थोडिशी माहिती द्यावी. शास्त्राच्या वाढीच्या दृष्टीने या गोष्टीस फारसें महत्त्व नाही;  तथापि असल्या पुरूषांची व्यक्तिविषयक माहिती व त्यांच्या चरित्रांतील ठळक ठळत गोष्टी दिल्यानें एक प्रकारें करमणूक होऊन इतिहासग्रंथ चित्ताकर्षक होऊं शकेल.