प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
संस्कृत शास्त्रीय परिभाषेशीं संगति:- पुढचा विचार म्हणजे, त्या शास्त्रांविषयी संबद्ध अशा संस्कृत ग्रंथांतर्गत कोणत्या संज्ञा अत्यंत रूढ झाल्या आहेत हें पाहणें हा होय. अर्थात् जेव्हां जुन्या संस्कृत संज्ञांचा प्रचार देशांत झाला नसेल तेव्हां लेखकाचें ज्ञानवर्गीकरणविषयक स्वातंत्र्य अधिकच वृद्धिंगत होंतें.
लिहिण्याचे प्रकार वाचकवर्गाच्या स्वरूपावर अवलंबून असतात; आणि त्यामुळें एकच भाषेंतील लिहिण्यामध्यें स्वरूपभेद दृग्गोचर होतो. विशिष्ट लेखन तज्ज्ञांसाठी आहे अगर सामान्य जनतेसाठीं आहे हा विचार आपण करावा; आणि प्रत्येक प्रकारच्या लेखनाचीं लक्षणें ध्यानांत घ्यावीं. शास्त्रीय लेखन या दोन्ही प्रकारचें आढळतें. तज्ज्ञांसाठी जें लेखन असतें त्याचीं मुख्य लक्षणें येणेंप्रमाणें :-
जें विधान करावयाचें आणि जी माहिती द्यावयाची ती शास्त्रीय तर्हेने द्यावयाची. उदाहरणार्थ, हळद व चुना यांचे मिश्रण केलें असतां लाल रंग उत्पन्न होतो ही व्यावहारिक माहिती होय. परंतु हळदींतील पीतरंग द्रव्य चुन्यांतील अल्कलीच्या संयोगाने या दोहोंच्या मिश्रणांस तांबडेपणा आणतें हें शास्त्रीय विधान होय. हे शास्त्रीय कारण दिल्यामुळें आपणांस असा बोध होतो कीं, ज्या ज्या पदार्थांत अल्कली असतो ते सर्व हळदीशीं संयुक्त झाले म्हणजे हळदीस लाल करतात. तर अल्कली हा शब्द शास्त्रांत आल्यामुळें हळदीस कोणते पदार्थ तांबडी करतात त्या सर्वांची यादी देणें जरूर नाही. अल्कलीखाली त्यांची माहीती दिली म्हणजे झालें. चुन्यांत पाण्याचा अंश मुळीच न ठेवतां त्यातं तेल घालून आपण आर्द्रता आणली आणि हळकुंड उगाळलें तर त्यानें तांबडा रंग होणार नाही हेंहि सांगावयास नकोच. शास्त्रीय लेखनामध्यें तीन गोष्टी विशेष होत.
(अ) जें कांही लिहावयाचें तें सोपपत्तिक म्हणजे जितक्या दूरवर कार्यकारणभाव पोहोंचेल तितक्या दूरवर तो नेऊन व्यक्त करावयाचें.
(आ) जें ज्ञान आपणांस सांगावयाचें आहे तें शक्य तितक्या थोडक्या विधानांत सांगावयाचे; आणि या लेखनध्येयामुळें त्यांत संज्ञाप्राचुर्य यावयाचें; अर्थात् संज्ञांची प्रयोजनें दोन होत; एक प्रयोजन म्हटलें म्हणजे विधानांची काटकसर, व दुसरें प्रयोजन म्हटलें म्हणजे, सामान्य व्यवहारांत अगर नैसर्गिक स्वरूपांत अदृश्य, परंतु, ज्यांचे अस्तित्व अनेक कार्यकारणांवरून व्यक्त होतें, अशा वस्तूंचें आणि संबंधांचे विधान करणें व हें शास्त्रास अवश्य असतें. अर्थात् ज्या वस्तू नैसर्गिक स्थितींत नसतात, किंवा जे संबंध सहजी दृश्य नसतात त्यांची गोचरता शास्त्रास भाग आहे.
सामान्य जनतेसाठी जे लेख तयार करावयाचे ते सर्व शास्त्रीय नसतातच असें नाहीं. पुष्कळदां शास्त्रीय विषय सामान्य तर्हेनें द्यावयाचा असतो. त्या वेळेस मनुष्याचा हेतु विषयाचें विशेष स्पष्टीकरण करावयाचें हा असतो; आणि शास्त्राची सर्व माहिती द्यावयाची हा नसतो. त्यामुळें जितकी काटकसर सबंध शास्त्र देतांना करावी लागेल तितकी एका अंगाच्या स्पष्टीकरणाच्या प्रंसगीं करण्याचें प्रयोजन नाही. त्यामुळें त्यांत संज्ञांचें अल्पत्व आढळून येतें.