प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
संज्ञाकोशाची आवश्यकता:- वरील विवेचनावरून संज्ञा म्हणजे काय, संज्ञांची आवश्यकता काय व नव्या संज्ञा किती प्रकारांनी करतां येतील हें कळून येईल. हे कळल्यानंतर संज्ञाकोशाची आवश्यकता काय व साधनें कोणतीं या संबधानें फारसें लिहिण्याची जरुरच राहत नाही. असे पुष्कळ विषय आहेत कीं, जे मराठीत लिहुं लागल्यास संज्ञांच्या अभावीं आपणांस पदोपदीं अडचण भासते. ज्ञानकोशाचे लेखक व संपादक यांजकडून मुख्य संपादकांकडे त्या अर्थाची आजपर्यंत कितीतरी पत्रें आली आहेत. त्या सर्वांची अडचण दूर करण्याकरीतां मराठीत संज्ञाकोशाची अत्यंत जरुर भासूं लागली आहे. रानडे यांनी आपल्या इंग्रजी-मराठी कोशांत पुष्कळ शास्त्रीय विषयांतील शब्दांनां संज्ञा बनविल्या आहेत. परंतु अद्यापहि पुष्कळ संज्ञा बनविण्याची गरज आहे. शिवाय, वर दिल्याप्रमाणें त्यांनी वापरलेल्या कांहीं संज्ञा निःसंशय चुकीच्या आहेत. त्यांचा प्रथम प्रयत्न असल्यामुळें, कितीहि परिश्रम घेतलें तरी त्यांत चुका रहाणें साहजिक आहे. याबद्दल त्यांस तो दोष देतां येत नाहीं. वाटपाड्ये लोक नवीन रस्ता बनवितात, तेव्हां तो एकदमच सपाट व गुळगुळीत व्हावा अशी कोणीहि अपेक्षा करीत नाहीं. साधारण जाण्यासारखा रस्ता असला म्हणजे झालें. कोणत्याहि विषयावर प्रथम लिहिणारांची स्थिति तद्वतच असते. परंतु त्यांच्या हातून चुका रहाणें साहजिक असलें तरी, त्या चुका अनुभवानंतर तशाच कायम राहूं द्याव्यात असें कोणीहि म्हणणार नांही. तर त्यांच्या संज्ञांचें नीट परीक्षण करून त्या दुरूस्त करणें, व ज्या शेंकडों शब्दांना संज्ञा मुळीच नाहीत, त्या तयार करणें या दोन क्रिया अवश्य झाल्या पाहिजेत. याशिवाय सर्व ज्ञानकोश हा एकच ग्रंथ असल्यामुळें त्यांत संज्ञासाम्य पाहिजे. म्हणजे एका ठिकाणीं एक संज्ञा व त्याच अर्थी दुसर्या ठिकाणीं निराळी संज्ञा असें असून चालणार नाहीं. त्यायोगानें वाचकांचा घोटाळा होण्याचा संभव आहे.