प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.

सामाजिक इतिहास व ज्ञानेतिहास.- विज्ञानेतिहास आणि मनुष्येतिहास यांचा संबंध जोडतां येतो, तसाच विज्ञानेतिहास आणि भावांचे प्रामुख्य यांचा संबंध जोडतां येतो. साधारणपणे असें म्हणतां येईल की, ज्या ज्या राष्ट्रांची विज्ञानांत प्रगति झाली त्या राष्ट्रांचें महत्त्व राजकीय दृष्ट्या जगांत वाढलेंच. या विधानास आक्षेप थोडेसेच घेतां येतील. उदाहरणार्थ एखादें राष्ट्र ज्ञानसंचयांत कमी प्रतीचें असलें पण फार मोठें असलें, त्याचा व्यापार मोठा असला, त्याचें द्रव्य पुष्कळ असलें, त्याला साहाय्यक पुष्कळ असले, म्हणजे तें ज्ञानांत थोडेसें कमी असूनहि जय पावतें. असें कधीं कधीं होतें. पण ते अपवाद समजावेत.

विज्ञानेतिहास आणि राजकीय व आर्थिक इतिहास यांचा अन्योन्याश्रय कोणासहि नाकबूल करतां यावयाचा नाही.

विज्ञानेतिहास आणि सर्व सामान्य इतिहास यांतील संगति प्रत्येक काल घेऊन स्पष्ट करतां येते. ख्रिस्ती शकापूर्वी एक हजार वर्षांचा काल घेतला. तर असें म्हणतां येईल कीं जीं राष्ट्रें त्या वेळेस ज्ञानांत प्रमुख होती ती राजकीय दृष्टीनें देखील प्रमुख होती. इजिप्‍त, बाबिलोनिया, हिंदुस्थान, चीन या राष्ट्रांचें त्या कालांत ज्ञानदृष्टीनें देखील महत्त्व होतें. ग्रीकांची व रोमन लोकांची वैज्ञानिक प्रगती व आर्थिक व राजकीय प्रगति या एककालीन आहेत. जेव्हां आरबांचा उदय झाला तेव्हा त्यांची त्याबरोबर ज्ञानाच्या बाबतींतहि प्रगती झालेली होती. मुसुलमानांनीं हिंदुस्थान जिंकलें तें रानटी लोकांनीं संस्कृत लोकांचा पाडाव केल्याचें उदाहरण नसुन अधिक संस्कृत लोकांनीं कमी संस्कृत व अधिक मूर्ख अशा लोकांचा पाडाव केल्याचें उदाहरण आहे. जेव्हा पश्चिम यूरोपांतील राष्ट्रें महत्त्व पावलीं, तेव्हां त्यांनी राजकीय व व्यापारविषयक यांबरोबर वैज्ञानिक प्रगति साधण्याचाहि यशस्वी यत्‍न केला. रशिया महत्त्व पावला त्या वेळेस रशियन झारनें आपल्या राष्ट्राच्या वैज्ञानिक विकासासाठी देखील निकराची खटपट केली. आजच्या व्यापारी युगांत ज्या लोकांचें शास्त्रीय ज्ञान अधिक त्यांचा औद्योगिक व्यापहि अधिक अशी स्थिति आहे.