प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
शास्त्रीय परिभाषा.— समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, इत्यादि शास्त्रांच्या व इतर शास्त्रांच्या विकासामध्यें व रचनास्वरूपामध्यें कांही स्थुल फरक दृष्टीस पडतात. त्यांपैकी एक मोठा फरक म्हटला म्हणजे एका शास्त्राच्या विषयामध्यें नवशिक्या किंवा अशिक्षित मनुष्य पांडित्य बिलकूल करीत नाही. परंतु बर सांगितलेल्या मनुष्यविषयक शास्त्रांमध्यें शास्त्रीय पद्धतीचें एकहि तत्त्व ठाऊक नसलेला मनुष्य पांडित्य करूं लागतो, लेख लिहितो आणि त्याचा श्रोतृवर्ग जो सर्वसामान्य समाज त्या समाजावरहि आपल्या वाक्पाटवाने किंवा लेखनकौशल्यानें परिणाम घडवूं शकतो. यामुळें म्हणजे अनधिकारि माणसाशीं वारंवार संबंध आल्यामुळें शास्त्राची भाषा आणि सामान्य भाषा यांमध्ये फारसें अंतर रहात नाहीं; आणि त्यामुळें शास्त्राच्या प्रगतीस विनाकारण अडचण उत्पन्न होत आहे. समाजांत होत असलेल्या क्रियांचें पृथक्करण झालें, पृथक्करण होऊन जे अंतिम घटक सांपडतील त्या घटकांचें नामकरण झालें आणि त्या अंतिमघटकबोधक शब्दांनीं सर्व क्रिया वर्णन केल्या गेल्या म्हणजे शास्त्रांत बरीचशी शुद्धता राहील. भारतीय नृत्यशास्त्र याच तर्हेनें बनलें आहें. साहित्यशास्त्रामध्यें आढळणारें बरेंचसें मानसशास्त्र मनाच्या निरनिराळ्या विकारांचे व अनुभवांचे पृथक्करण व नामकरण याच रीतीनीं झालें आहे. ("नृत्य" व "मानसशास्त्र" पहा.)