प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.   

संज्ञा कशा असाव्या:- येणेंप्रमाणें संज्ञा म्हणजे काय, व त्यांचें प्रयोजन कोणतें या गोष्टी कळल्यानंतर संज्ञा कशा असाव्या हा प्रश्न येतो. या प्रश्नाचें उत्तरहि वर दिलेल्या उदाहरणावरूनच कळून येईल. संज्ञा आटपशीर असून, पुष्कळ अर्थ थोडक्यांत व्यक्त करण्यांचें सामर्थ्य त्यांच्या अंगी असावें. विवक्षित गुणधर्म ( उ. पाण्याच्या १९ पट जड असणार्‍या पिंवळ्या, चकचकीत, घनवर्धनीय, तन्य, कोणत्याहि अम्ल पदार्थाचा ज्यावर सहसा परिणाम होत नाही इ. इ. एवंगुणविशिष्ट पदार्थाला आपण सोनें नांव देतों. ) अथवा विवक्षित क्रिया दाखविण्याकरितां  त्या गुणांशी अथवा त्या क्रियांशीं मुळीच संबंध नसणारा शब्द संज्ञेकरितां उत्तम असें कांही म्हणतात. सोनें, रुपें वगैरे धातुंची, त्याचप्रमाणें इतर पदार्थांचीं नांवे, व बहुतेक क्रियापदें, याच प्रकारच्या संज्ञांची उदाहरणें आहेत. ज्या संज्ञा पदार्थांचे गुणधर्म, अथवा क्रिया, पुर्णपणें नाहीं, तरी बर्‍याच अंशाने व्यक्त करतात अशा संज्ञा दुसर्‍या प्रतीच्या मानतात. कमी जास्त मानानें आंबट, धातू व इतर पदार्थ खाणारे, व त्यामुळें क्षार बनण्यास मदत करणारे, अल्कलीनां उदासीन करणारें, असे पदार्थ त्यांच्या अंगच्या आंबटपणामुळें अम्ल (म्हणजे आंबट) या संज्ञेंनें दर्शविले जातात; व त्यामुळें अम्ल हा शब्द उच्चारला असतां वरील बहुतेक गुण डोळ्यांपुढे येतात. "मंदवाहक" "विद्युज्जागृत" वगैरे संज्ञा याच प्रकारच्या, म्हणजे शब्दाच्या अर्थावरून गुणधर्मांचा, क्रियेचा अथवा स्थितीचा बोध करणार्‍या आहेत. केव्हां केव्हां गुणधर्म, क्रिया, अथवा स्थिति यांचा विचार करून संज्ञा ठरविण्याचा प्रयत्‍न केलेला असतो, व मागुन ते गुणधर्म वैगेरे चुकीचे आहेत असें कळून आलें कळून आलें तरी पूर्वीचीच संज्ञा कायम ठेवण्यातं येते. अशा संज्ञा तिसर्‍या प्रतीच्या होत. इंग्रजींतील "ऑक्सीजन" ही संज्ञा अशा प्रकारची आहे. "ऑक्सीजन"  या शब्दाचा अर्थ अम्ले तयार करणारा. ज्या इंग्रज गृहस्थानें हा वायु शोधून काढला, त्यानें या वायूंत गंधक, स्फुर, वगैरे कांही पदार्थ जाळून पाहिले. तेव्हां त्याला असें आढळून आलें कीं, ज्या बाटलींत वायु धरून हे पदार्थ जाळले असतील, त्या बाटलींत थोडें पाणी टाकून त्यांत निळा लिटमस कागद टाकल्यास तो तांबडा होतो; व निळा लिटमस तांबडा करण्याचा गुणधर्म फक्त अम्लांच्या अंगी आहे, त्यावरून बाटलींत अम्ल पदार्थ तयार झाले असले पाहिजेत; म्हणून त्यानें चुकीनें त्या वायूला अम्लजन अथवा "ऑक्सीजन" असें नाव दिलें. परंतु पुढें असें कळून आलें की, या वायुंत पदार्थ जाळले असतां अम्लेंच तयार होतात असें नाही, तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणजे अल्कलीहि मिळतात. यामुळें "ऑक्सीजन" हें नांव हल्ली अन्वर्थक नाही; परंतु तें अद्याप बदलण्यांत आलेलें नाहीं व बदलेल असें दिसत नाही. कारण मनुष्याची पुराणप्रियता जबर आहे. याच प्रकारच्या संज्ञेचें मराठी उदाहरण पाहिजे असल्यास "उष्णतामापक"  ही संज्ञा घेतां येईल. उष्णतामापक याचा अर्थ उष्णता मोजणारें (यंत्र) असा आहे. परंतु वास्तविक ज्याला उष्णतामापक म्हणतात त्या यंत्रानें उष्णता म्हणजे उष्णतेचें परिमाण मोजीत नाही, तर उष्णतेची तीव्रता मोजतात. आधणाचें पेलाभर पाणी व हौदभर कोमट पाणी यांपैकी उष्णता जास्त कशांत आहे हें पाहूं गेल्यास हौदांतील पाण्यांतच उष्णता अधिक आहे हें कळून येईल. परंतु उष्णतेची तीव्रता मात्र पेल्यांतील पाण्यांत जास्त आहे. म्हणजे, पेल्यांतील पाण्यानें हात भाजेल परंतु हौदांतील पाण्याने भाजणार नाहीं.

वरील तीन प्रकारच्या संज्ञांखेरीज, परक्या भाषेंतून अपभ्रंश रूपानें कांही संज्ञा घेतल्या जातात. ह्या संज्ञांनां आपल्या दृष्टीनें वास्तविक पहिल्याच प्रकारच्या संज्ञा म्हणण्यास हरकत नाही. त्या संज्ञांनां मराठीत मूळचा कांहीच अर्थ नसतो त्या अर्थी त्या स्वतः कोणतेहि गुणधर्म व्यक्त करण्यास समर्थ होत नाहींत; व आपण त्यांना आपणांस वाटतील ते गुणधर्म देऊं शकतों. उदाहरणार्थ, मराठी "राकेल" हा शब्द इंग्रजी "रॉक ऑइल" या शब्दावरून आला आहे;  परंतु त्या शब्दानें इंग्रजींत जो अर्थ व्यक्त होतो, तो "राकेल" या शब्दानें होऊं शकत नाहीं. त्यामुळें जमिनींतून खणून काढलेंले तेल ह्या अर्थी राकेल शब्द वापरणें, हें पहिल्या प्रकारांतच मोडतें. त्या तेलाला सार्थ नांव द्यावयाचें असलें तर तें "मातीचें तेल" असेंच होईल. मातीचें तेल हा शब्द रूढ असुन थोडा बहुत सार्थ असल्यामुळें घ्यावयास हरकत नाहीं. वस्तुतः तो सुद्धां बरोबर आहे असें नाहीं. कारण, मातीचें म्हणजे मातीपासून केलेलें (उ. तिळाचें तेल) असा अर्थ होतो. "पॅरॅफिन" याला मराठीत "पाराफिन" म्हणतात. ही संज्ञाहि याच प्रकारची आहे. मुळ इंग्रजी शब्दाचा अर्थ "(रसायन) प्रीति फार कमी असलेला" असा आहे. त्याबद्दल मराठी शब्द सार्थ पाहिजे असल्यास "अल्पस्नेहक" असा करावा लागेल.

लाक्षणिक अर्थावरून अथवा काल्पनिक सादृश्यावरून दिलेल्या (उ. बोल्ट = सूत्रधार म्हणजे सुतें असलेला, व त्याच्या साहचर्यानें असलेली नट् = नटी) परक्या भांषेतून घेतलेल्या व आणखीही कांहीं प्रकारच्या संज्ञाविषयीं लिहितां येण्यासारखें आहे. परंतु तूर्त त्यांविषयीं लिहिण्यास अवकाश नाहीं, व प्रस्तुत विषय समजण्यास त्याची जरूरहि नाहीं.

संज्ञा म्हणजे काय, त्यांचें प्रयोजन व प्रकार सांगितल्यानंतर नवीन संज्ञा बनवितांना कोणत्या गोष्टी लक्षांत ठेवल्या पाहिजेत त्यांचें थोडक्यातं दिग्दर्शन करतों.