प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.    

संज्ञा बनवितांना लक्षांत ठेवावयाच्या गोष्टी:-  परकी भाषेंतील शब्दांकरीतां मराठी संज्ञा बनवितांना आपणांस कोणत्या प्रकारची संज्ञा करावयाची आहे हें ठरविलें पाहिजे. परका शब्द आपण मुळीच राहूं देणार नाहीं, कीं तो अपभ्रष्ट करुन घेणार, किंवा त्या शब्दाचें भाषांतर देणार, अथवा त्या शब्दानें जी कल्पना व्यक्त होते ती कल्पना मराठी शब्दांनी व्यक्त करणार ? यांपैकी जो मार्ग आपण स्वीकारुं त्याप्रमाणें संज्ञा बनविण्याची पद्धत अथवा नियम बदलतील हें उघड आहे. परका शब्द आपल्या भाषेंत मुळींच राहूं देऊं नये असें कांहीचें मत आहे. परंतु असें करणें इष्ट असलें तरी शक्य आहे काय हें पाहिलें पाहिजे. याचे उत्तर बहुधा नकारात्मकच येईल असें वाटतें. गव्हर्नर, टेबल, मास्तर, पोस्ट, कार्ड, मनीआर्डर, अपील, कोर्ट, व्ही. पी. पोलीस, स्टेशन, रेलवे, डॉक्टर वगैरे इंग्रजी शब्द मराठींत इतके रूढ होऊन गेलेले आहेत कीं, त्यांपैकी कांही परके आहेत असें सुद्धां वाटेनासें झालें आहे. त्यांच्याऐवजी मराठी शब्द करुं लागलों, तर मात्र थोडा बहुत घोटाळा होण्याचा संभव आहे. अर्थात् असे शब्द मराठीत तसेच राहूं द्यावेत हें चांगलें. याशिवाय, आणखीहि कांही इंग्रजी शब्द मराठींत सहज येण्यासारखे असतील तर ते घेण्यास हरकत नसावी. त्यामुळें मराठी शब्दसंग्रह वाढण्यास मदतच होईल. परंतु याप्रमाणें कांही शब्द निरूपायास्तव घ्यावेत असें म्हटल्यानें सर्वच इंग्रजी शब्द घेणें मात्र योग्य होणार नाहीं. यायोगानें मराठीचें वैशिष्ट्य नाहीसें होऊन ती केवळ महाराष्ट्रीकृत इंग्रजी बनेल. म्हणून होतां होई तों परका शब्द न घेण्याची खबरदारी घ्यावी, परंतु निरुपायास्तव व मराठींत सहज खपण्यासारखा असल्यास परका शब्द घेण्यास कचरुं नये.

परकीय शब्द जसाचा तसा घ्यावयाचा नसेल, तेव्हां कांहीं प्रंसगीं तो अपभ्रष्ट करून, म्हणजे त्याला मराठी अथवा संस्कृत रूप देऊन तो तसाच घेण्याची चाल आहे. उ. असबस्ट,प्लाटिन, कंत्राटदार इ. अपभ्रंश करतांना कोणकोणते नियम पाळावे हें ठरविणें कठिण आहे. परंतु सामान्यतः असें म्हणतां येईल कीं, तो शब्द जेणें करून परकी वाटणार नाही, असें रुप त्याला देणें चांगलें.

परकी शब्दाचें केवळ भाषांतर करणें हा कनिष्ट मार्ग आहे. उ. ऑक्सीजन याचें अम्लजन असें रुप करणें चांगले नाहीं.  या योगानें मुळांतील चुक आपल्या भाषेंतहि कायम राहते.

परकी शब्द जी कल्पना व्यक्त करतो ती कल्पना मराठी शब्दांनीं व्यक्त करणें सर्वांत उत्तम. याकरितां, मूऴ शब्दाची अर्थकक्षा इंग्रजी कोशांतून शोधून काढावी; व अतिव्याप्ति व अव्याप्ति हे दोष टाळून नवीन शब्द बनवावा. उ."हिस्टीरिया" या शब्दाला "गर्भाशयोन्माद" असा प्रतिशब्द देणें बरोबर होणार नाहीं. कारण कीं, हिस्टीरिया हा रोग केवळ स्त्रियांनांच होतो असें नाहीं, हिस्टीरियाचा अर्थ "मज्जादोषमूलक भावनासंयमनाभाव"  असा आहे, हें कोश पाहिल्यास समजून येईल;  व आपल्याला अन्वर्थकच शब्द कराव याचा असल्यास त्यानें, वरील अर्थ व्यक्त झाला पाहिजे. हिस्टीरिया याबद्दल "मज्जादोषमूलक भावनासंयमनाभाव" अशी संज्ञा मात्र वापरतां येणार नाहीं. निदान ती वापरणें सोयीचें तरी नाहीं. कारण संज्ञेचा मुख्य धर्म सुटसुटीतपणा, तो तींत मुळींच नाहीं. "ट्राइब" बद्दल "राष्ट्रजाति"  "रेस" बद्दल  "महावंश" अथवा "खिश्चानिटी" बद्दल  "ख्रिस्ती संप्रदाय" या संज्ञा याच प्रकारच्या आहेत. "रिलिजन" बद्दल हल्ली प्रचारांत असलेली "धर्म"  ही संज्ञा केवळ भाषांतररूप म्हणजे मुळ रिलिजन या शब्दाचा अर्थ न समजतां दिलेली आहे. रिलिजन या शब्दानें व्यक्त केल्या जाणार्‍या कल्पनेंचें विशेष सादृश्य कोणाशी असल्यास तें "संप्रदाय" या शब्दांतील कल्पनेशीं होय. यासाठीं मुळ शब्दाची कल्पना बरोबर व्यक्त करणार्‍या संज्ञेचाच उपयोग करणें इष्ट आहे.

केव्हां केव्हां मूळ शब्दांने निरनिराऴ्या प्रंसगी अथवा निरनिराळ्या विषयांत निरनिराळा अर्थबोध होतो. अशा शब्दाबद्दल मराठी संज्ञा बनवितांना मराठी संज्ञेनेंहि तसेंच बव्हर्थी असलें पाहिजे असा हट्ट धरण्याचे कारण नाहीं. त्याच शब्दाकरितां निरनिराळ्या अनेक संज्ञा कराव्या लागल्या तरी चालेल.