प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.   
 
संज्ञा व त्यांचें प्रयोजन:-  लेखनाचे दोन प्रकार आहेत; शास्त्रीय व सामान्य. कोणत्याही विषयाचें विवेचन या दोन प्रकारांनी करणें शक्य आहे. विषय सामान्य जनांना समजावून द्यावयाचा असल्यास, तो आपटशीर नसला तरी सुबोध असावा लागतो. परंतु शास्त्रीय लेखन हें विशिष्ट लोकांकरितांच असल्यानें तें सर्व लोकांनां समजण्याइतकें सुबोध नसलें तरी आटपशीर व व्यवस्थित असावें लागतें. या कारणामुळें लिहिण्यांत फरक करावा लागतो. उदाहरणार्थ समुद्राच्या पाण्यापासून पिण्यालायक पाणी कसें करतां येईल यासंबंधी लिहावयाचें असल्यास, सामान्य लोकांकरितां येणें प्रमाणें लिहावें लागेल:-

“ समुद्राच्या पाण्यांत मिठाचा भाग असल्यामुळें तें खारें असतें. तें पाणी आधण येईपर्यंत तापवून, त्यापासून निघणारी वाफ दुसर्‍या थंड भांड्यांत नेऊन पुन्हां तिचें पाणी करावें म्हणजे दुसर्‍या भांड्यांत पिण्यालायक पाणी जमेल. कारण खार्‍या पाण्यांतील मिठाची वाफ न झाल्यामुळें तें वाफेबरोबर न जातां, पहिल्या भांड्यांतच रहाते; व याप्रमाणें मीठ आणि पाणी ही निराळी होतात."

हीच गोष्ट शास्त्रीय रीतीनें लिहतांना, "खार्‍या पाण्याचें ऊर्ध्वपातन करावें म्हणजे शुद्ध पाणी मिळेल" एवढें लिहिल्यानें वर लिहिलेला सर्व बोध होतो.

परंतु यातं "उर्ध्वपातन" व "शुद्ध"  असे दोन नवीन शब्द वापरावे लागले; व या शब्दांचे अर्थ ज्यांनां अवगत नाहीत त्यांनां हें लेखन अर्थशून्य भासणार. परंतु शास्त्रज्ञांनां या दोन्ही शब्दांचे अर्थ परिचित असतात; त्यामुळें पहिल्यानें दिलेल्या पांच सहा ओळी न वाचाव्या लागतां एका ओळीतच त्यांचे काम भागतें. पांच सहा ओळीचें काम एकाच ओळींत होण्याला जे शब्द कारणीभूत झाले त्यांचा अर्थ तरी काय हें आपणासं पाहिलें पाहिजे. (परंतु तत्पूर्वी अशा शब्दांसच "संज्ञा" म्हणतात असें सांगण्यास हरकत नाही.)

"उर्ध्वपातन" या शब्दानें "द्रव पदार्थांस उष्णतेंनें वायुरूप देणें व पुन्हां थंड करुन द्रवरूपांत आणणें ह्या क्रियांचा बोध होतो. त्यामुळे "उर्ध्वपातन" करावें असें लिहिलें, म्हणजे पाण्याला उष्णता लावून त्याची वाफ होऊं द्यावी व ती वाफ निराळ्या भांड्यांत धरून थंड करावी असें लिहिण्याची जरूर रहात नाही. त्याचप्रमाणें "शुद्ध" याचा अर्थ "इतर पदार्थ नसलेलें" असा असल्यामुळें, त्यांत मीठ नाहीं व तें पिण्यालायक आहे हें सहजच समजतें.

शास्त्रीय ग्रंय़ लिहितांना "ऊर्ध्वपातन" व "शुद्ध" यांसारखे शब्द वारंवार योजावे लागतात. वर दिलेल्या उदाहरणावरून असे शब्द उपयोगात आणण्याचें प्रयोजन सहज दिसणार आहे. अशा शब्दांनांच "संज्ञा" असें नांव देतात.