प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.

शास्त्रघटनापद्धति.- शास्त्र म्हणजे काय याच्या व्याख्या अनेक आहेत. शास्त्र म्हणजे ज्ञान असा अर्थ सर्वमान्य आहे. संस्कृतमध्यें शास्त्र हा शब्द आला त्या वेळेस शास्त्र शब्दाचा अर्थ, "नियमांनी जें कांही तरी शासित होतें म्हणजे बांधलें जातें तें" असा होता. शास्त्राचा उगम आणि सामान्य ज्ञानाच उगम एकच आहे. सामान्य ज्ञानच व्यवस्थित रीतीनें मांडले म्हणजे शास्त्र झालें. सामान्य ज्ञान पुष्कळ जमलें म्हणजें थोडक्यांत सांगणें अवश्य होतें आणि शास्त्रांतील बरेसचे नियम आणि संज्ञापद्धति ही उपलब्ध माहिती थोडक्यांत सांगण्यासाठींच आहेत.

शास्त्राची घटना कशी होत जाते हें निरनिराळ्या शास्त्रांच्या अवलोकनानें सांगतां येईल; आणि शास्त्र तयार करण्याचें शास्त्र आपणांस तयार करावयाचें झालें म्हणजे कोणत्याहि "भावा" ( फिनॉमिना) चें क्षेत्र निराळें समजून त्याचें शास्त्र कसें करावें हा प्रश्न आला. यासंबंधानें डॉ. ह्यूएल यांनीं इंग्रजीमध्यें "नोव्हम् ऑरग्यानम रेनोव्हेटम" हा ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी त्यांनीं "इंडक्टिव" म्हणजे  "अनुभवमूलक" शास्त्रें यांचा इतिहास लिहिला होता. शास्त्र बनते कसें याचें पद्धतशीर विवेचन कोठें दिसत नाहीं. कांहीं नियम ह्यूएलसारख्याच्या ग्रंथांत आणि कांहीं कार्ल पीअरसनच्या "ग्रामर आफ सायन्स" सारख्या ग्रंथांतून इतस्तत: विखुरलेले दिसतात.