प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
शास्त्र आणि शाब्द प्रमाण:- अनुभव बाजूला ठेवून केवळ शब्द सत्य धरुन त्यावर अनुमानपरंपरा बसविणें ही विचारपद्धति यूरोपांत पुष्कळ वाढली होती आणि त्यामुळें शास्त्रीय ज्ञानाच्या प्रगतीस बराच अडथळा आला. या पद्धतीचें अत्यंत परिणत स्वरुप जेमिनीच्या मीमांसेत जेवढें आहे तेवढें जगांत कोठेंहि नसेल. हिदुस्थानांत शास्त्रीय ज्ञान तयार होऊं लागलें तें एका दृष्टीने शब्दमूलक होतें. सर्व ज्ञान वेदमूलक आहे हें तत्त्व प्रत्येक शास्त्रास गौरव आणण्याकरितां उद्गारिलें आहे. परंतु, ज्याप्रमाणे एखाद्या अडाणी लोकांची भाषा भाषाशास्त्रज्ञ अभ्यासाकरितां घेतो त्याप्रमाणें हिदुंस्थानांतील शास्त्रज्ञांनी वेदांचा उपयोग साहित्य या रूपांतच केला. वेदवाक्य सिद्ध सत्य म्हणून कधीच धरलें नाहीं. उदाहरणार्थ वेदांगें घ्या. समजा आज जर कोणीं शेक्सपिअरच्या अभ्यासासाठी खटपटी केल्या तर त्या अनेक प्रकारच्या होतील. कोणी शेक्सपिअरमधील वृत्तें व छंद यांचाच अभ्यास करील (छंद); कोणी शेक्सपिअरचीं नाटकें रंगभूमीवर आणतांना वाक्यें चांगलीं म्हणावीं कशीं याकरितां शेक्सपिअरमधील स्वराघातावर लिहील (शिक्षा); कोणी शेक्सपिअरमधील व्याकरणाच्या प्रयोगांचा अभ्यास करील (व्याकरण); कोणी शेक्सपिअरकालच्या चालीरीती किंवा नाट्यशास्त्र पाहूं लागेल (कल्प). या प्रकारच्याच अभ्यासपद्धतीनें या देशांतील शिक्षा कल्पो व्याकरणं निरूक्तंछंद ज्योतिषम् । ही सहा शास्त्रें तयार झालीं.