प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
 
शास्त्र आणि कविता.— शास्त्र व कविता या दोहोंचेहि पितृत्व एकच म्हणजे अद्‍भुत कथांकडे आहे, असें एक मत आहे. त्या मताचे लोक रसापेक्षां कल्पनावैचित्र्यावर जोर देतात व कवितेचा उगम अद्‍भुत कथांतून काढतात; पुराणातील अद्‍भुत कथा ("मिथ्स") या देखील प्रथम चराचराच्या स्पष्टीकरणार्थ असलेला प्रयत्‍न होता. जेव्हां चराचराच्या अस्तित्वाचें स्पष्टीकरण अन्य तर्‍हेनें म्हणजे शास्त्रीय तर्‍हेनें झालें, तेव्हां पुर्वीच्या चराचरोत्पत्तीच्या सर्व कल्पना नष्ट झाल्या नाहीत. चराचराचें स्पष्टीकरण किंवा उत्पत्तिकथन करण्यासाठी जी देवकोटीची योजना झालेली होती ती नष्ट न होतां समाजांतील कांहीं लोकांच्या मनांत राहिली. तेव्हां तो देवलोक कवितेचा विषय झाला किंवा पूर्वीच झालेला असल्यास तो अधिक प्राधान्यानें झाला, व येणेंप्रमाणे शास्त्र व कविता यांच्यामध्यें भेद उत्पन्न झाला.