प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
विज्ञानेतिहासाचे कालविभाग — या इतिहासाचे कालविभाग दुसरा एखादा विकास घेऊन, त्याच्या विशिष्ट विकासस्थितीच्या दर्शक रेषा ओढून आणि त्या रेषांमुळें जे काल दृष्ट होतील त्यांत वैज्ञानिक इतिहास बसवून पाडले पाहिजेत. या पद्धतीनें वैज्ञानिक इतिहासाला उपयोगी जे कालभाग आम्हांस दिसतात ते व त्या विभागांत झालेली ज्ञानविषयक प्रगति हीं येणेंप्रमाणे :-
(१) मनुष्यकल्पत्व सुटून मनुष्यत्व प्राप्तीचा काळ. त्या कालाचा विज्ञानेतिहास केवळ अनुमानपद्धतीनेंच काढला पाहिजे.
(२) अश्मायुध स्थितींत किंवा तीपूर्वी मनुष्यप्राणी चोहोंकडे भ्रमण करता झाला, त्या भ्रमणाचा म्हणजे जगत्संचाराचा काल. त्या कालापासून म्हणजे अश्मायुध स्थितीपासुन लोहायुध स्थितीपर्यंत एक काल पाडतां येईल. या कालचा वैज्ञानिक इतिहास लिहावयाचा झाल्यास तो मनुष्य आपल्या उपयोगात ज्या गोष्टी आणीत होता त्यांचें अस्तित्व हें कोणत्या प्रकारच्या ज्ञानाच्या अस्तित्वास पुरावा म्हणुन धरतां येईल, या प्रकारचा विचार करून लिहावयाचा.
(३) विशिष्ट प्रगमनशील राष्ट्रें ज्या कालांत प्रगतिमार्गास लागली आणि इतिहासास सुरूवात झाली, त्या म्हणजे असुरराष्ट्रसंस्थापनेच्या कालापासून सुरुवात केली असतां वैज्ञानिक इतिहासाविषयीं कांहीं निश्चित गोष्ट सांगण्यास प्रांरभ होईल.
(४) विशिष्ट संस्कृतींचा विकास आणि लय आणि ह्याबरोबर ज्ञानविकास, म्हणजे मिसरी, बाबिलोनी, भारतीय, पर्शु, चिनी, हिब्रू ग्रीक, रोमन, ख्रिस्ती, अरबी, अर्वाचीन युरोपीय व जागतिक ज्ञानाचा विकास हा द्यावयाचा म्हणजे प्रत्येक संस्कृतींतील ज्ञानविकासाचा वृत्तांत द्यावयाचा; आणि त्या सर्वांचें अर्वाचीन ज्ञानसंचयांत पर्यवसान द्यावयाचें, हा इतिहास प्रस्तुत विभागाचा मुख्य भाग होय.
तिसर्या विभागांत असुरपूर्वसंस्कृतीचा वैज्ञानिक आणि एकंदर सांस्कृतिक इतिहास कसा याची रूपरेखा दिलीच आहे. मनुष्यप्राणी चोहोंकडे अश्मायुध स्थितींत सांपडतो त्या अर्थी या स्थितींत किंवा याहूनहि प्राचीन व प्राथमिक स्वरुपाच्या सांस्कृतिक स्थितींत मनुष्य असतां मनुष्य प्राण्याचा प्रसार चोहोंकडे झाला असावा आणि नंतर त्यानें प्रत्येक ठिकाणीं आपली प्रगति करून घेतली असें दिसतें. प्रत्येक ठिकाणच्या मानवानें जी प्रगति करून घेतली तिचा स्थूल इतिहास तिसर्या आणि चवथ्या भागांत दिलाच आहे. ज्या अत्यंत प्राचीन महत्त्वाच्या काळाचा एक इतिहास आपणासं उपल्ब्ध नाहीं तो कालविभाग म्हटला म्हणजे विस्तरणकालापासून असुरराष्ट्रस्थापनेपर्यंतचा काल होय. या दीर्घकालांत सांस्कृतिक प्रगति या राष्ट्रांत इतकी झाली कीं, आज हिंदुस्थानाच्या अनेक भागांची संस्कृति तितकी नसेल.
इ. स. १५०० पुर्वीच युरोपांतील बराचसा भाग अश्मायुध स्थितींतून बाहेर पडून धातूंचा उपयोग करूं लागला होता. आशियांतील राष्ट्रें अनेक मोठमोठ्या इमारती बांधणें कायदे करणें, महाकाव्यें तयार करणें, ज्योतिष, वैद्यक इत्यादि शास्त्रांवर ग्रंथ करणें इत्यादि क्रिया करण्यास आणि अत्यंत व्यापक विचार व्यक्त करण्यास समर्थ झालीं होती; आणि त्यांची परमार्थसाधनांच्या बाबतींतील प्रगति भुताखेतांची पुजा करण्यापासून एकतर अगडबंब विधींचे यज्ञ, किंवा ईश्वरविषयक निर्भय विचार करण्याइतकी विविध होती, हें वैदिक वाङ्मयावरुन आणि दुसर्या अनेक प्रकारच्या पुराव्यांवरून दिसून येईल.