प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.        

आद्यकालीन वैद्यकीय ज्ञान:- वैद्यक शास्त्रासंबंधाच्या क्षेत्रांतहि त्या काळांत लवकरच कांहीतरी प्रगति खास झालेली असली पाहिजे. प्रत्यक्ष पशुपक्ष्यादि हलके प्राणीसुद्धां सभोंवार दिसणार्‍या अनेक तृणलतादि वनस्पतींपैकी योग्यायोग्याचा निर्णय करून, भक्ष्य वनस्पती निवडून काढतात; आणि प्रंसगविशेषीं भक्ष्य वनस्पति सोडून देऊन निराळ्याच औषधी वनस्पती रोगनिवारणार्थ म्हणून खातांना आढळतात. उदाहरणार्थ, मांजरें दुर्वांसारखी वनस्पति खातात हें पाहण्यासारखे आहे. तसेंच आद्य मानव जातीला सुद्धां कित्येक वनस्पतींचे औषधी गुणधर्म परंपरागत किंवा उपजत ज्ञानानें माहीत असले पाहिजेत. निदान विषारी फळें कोणता तें ओळखण्यापुरतें तरी वैद्यकशास्त्रांतल्या विषविज्ञान या भागाचें ज्ञान असलेंच पाहिजे. पण या वरील विधानांत खर्‍या कार्यकारणभावाचा विपर्यास होत आहे असें वाटतें. कारण एकंदरीनें पाहतां आपल्या या प्राणिमात्रांच्या शरीरांत वस्तुस्थितीशीं जुळेंसें करुन द्येण्याची मोठी अद्‍भुत शक्ति आहे. म्हणून जगांत बहुधा अशी एकहि विषारी वनस्पति नाहीं. कीं, जी खाऊन तिचे घातुक परिणाम टाळण्यास मनुष्यदेह शिकला नसता. अर्थात् हें बर्‍याच संवयीचें व कालावधीचें काम आहे. आणि म्हणूनच कांही अंशी असें म्हणण्यास हरकत नाहीं की, आज ज्या अनेक वनस्पतीचे विषारी परिणाम आपल्या शरीरावर होतात, त्याचे कारणच हें कीं, त्या वनस्पती आपल्या पूर्वजांनी खाण्यामध्ये उपयोगांत आणल्या नव्हत्या. उदाहरणार्थ, आज जीं फळें आपणांला विषाप्रमाणें इजा करितात, तीं जर आद्य मानवजाती ज्या प्रदेशांत रहात असत तेथें उत्पन्न होत असतीं व त्यांच्या खाण्यांत आलीं असतीं, तर तींच आज आपल्या रोजच्या आहारांतली बनली असतीं. असो ही विचारपरंपरा प्रमाणाबाहेर गेली असें वाटतें. प्रस्तुत विषयाविषयी येथें इतकें सांगितलें म्हणजे पुरे कीं, कांहीं मुळें, पाने व फळे आपल्या शरीरावर घातक परिणाम करणारी असतात;  आणि ते त्यांचे घातक परिणाम प्राचीन मानवांनी माहीत करून घेतले नसते तर त्याचा भयंकर परिणाम मानवजातीला भोगावा लागला असता. परंतु खरोखर वस्तुस्थिति अशी कीं, त्यांना ते घातक परिणाम कळून आलेले होते व म्हणूनच त्यांना विषविज्ञान नामक वैद्यकशाखेचें ज्ञान होतें असे आम्ही म्हणतों.