प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.         

आद्यकालीन वनस्पतिविषयक ज्ञान:- मनुष्याच्या शरीरावर घातक परिणाम करणार्‍या पदार्थांबद्दलच्या ज्ञानाला जोडूनच रोगनिवारक अशी कित्येक वनस्पति विषयक माहितीहि बर्‍याच प्राचीन काळापासून मानवजातीला प्राप्त झालेली असली पहिजे. हे त्यांचे औषधिविज्ञान अर्थात् अगदीं प्राथमिक अवस्थेत आणि तेहि केवळ प्रत्यक्ष अनुभवानें मिळविलेले असलें पाहिजे, वर सांगितलेच आहे की हलक्या प्राण्यांनांसुद्धां कित्येक रोगनिवारक वनस्पतीचें उपजत ज्ञान असतें ( कदाचित् हे थोडें असेल ); आणि हे जर खरें आहे, तर इतर कित्येक गोष्टींप्रमाणें हे उपजत ज्ञानहि मानवजातीस प्राङमानुष पुर्वजांपासून वंशपरंपरेनें प्राप्त झालेले असले पाहिजे. या आनुवंशिक ज्ञानामध्यें अवलोकनानें आणि प्रत्यक्ष अनुभवानें पुष्कळ भर घालून लवकरच मानवजातीनें अनेक प्रकारच्या रोगांवरील वनौषधी उपयोगांत आणलेल्या असाव्या, ही गोष्ट हल्लीं आढळून येणार्‍या रानटी जातींतील लोकांनां असलेल्या अनेक रोगांवरील वन्य औषधीच्या ज्ञानावरून निर्विवाद सिद्ध होते. पुढील विवेचनामध्यें आपणांस असें दिसून येईल कीं, ऐतिहासिक काळांत सुद्धां कित्येक प्रचारांत असलेले औषधोपाय अडाणीपणाचे होते, व त्यांनां अशास्त्रीय या शब्दानें आपण नेहमी संबोधित असतों;  तथापि त्यांपैकी अत्यंत अडाणीपणाचे उपाय सु वास्तविक शास्त्रीय नियमांवरून बसविलेले होते. कारण ते पूर्वावलोकनानें व्यावहारिक अनुमानें काढून ठरविलले होते, कांही औषधें कांहीं विशिष्ट लक्षणांच्या रोगांवर दिली जातात, याचें कारण औषधांवैद्यांनां तसल्या औषधांचा तसल्या प्रकारच्या रोगांवर गुणकारी परिणाम झाल्याचा पूर्वी अनुभव आलेला असतो.