प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
सृष्टयवलोकन व पृथक्करण:- अगदीं रानटी मनुष्य घेतला तरी सृष्टीचे व्यापार तो पहात असतो ही गोष्ट खरी आहे. परंतु तो अवलोकन केलेल्या गोष्टींचें पृथक्करणहि करीत असतो, ही गोष्ट तितकी ताबडतोब मान्य होण्यासारखी नाहीं. तथापि या मुद्दयासंबंधानें जितका अधिक विचार करावा तितकी आपली अधिकच खात्री होत जाते कीं, या दोन गोष्टी-अवलोकन व वर्गीकरण-इतक्या एकमेकींशी संलग्न आहेत कीं, त्या एकमेकींपासून अलिप्त ठेवणें शक्यच नाही. बाह्य सृष्टींतले व्यापार अवलोकन करणें हा मनाचा जितका स्वाभाविक धर्म आहे, तितकाच त्या अवलोकनापासून अनुमानें काढणें हाहि आहे. रानांतून पळणारें हरिण जमीन हुंगतें आणि तेथें कांही विशिष्ट प्रकारचा वास असल्यास तें लगेंच तेथें थबकतें आणि त्याच्या मनांत एकदम पुढील विचारमालिका सुरु होते. तो वास लांडग्याचा असला पाहिजे ही गोष्ट मागील अनुभवावरून त्याला माहीत झालेली असते, म्हणून तें हरिण शास्त्रीय पद्धत्यनुसार असें अनुमान लगेंच काढतें कीं, त्या रस्त्यानें लांडगे गेले असले पाहिजेत. तसेंच मागील पिढाजाद किंवा वैयक्तिक अनुभवानें हेंहि शास्त्रीय ज्ञान त्याला झालेलें असतें की, लांडगे हे घातक प्राणी आहेत. म्हणून तत्कालीन प्रत्यक्ष अवलोकनानें झालेली माहिती मागील अनुभवानें ठरलेल्या सामान्य सिन्ताशीं एकत्र करून लगेंच तें हरिण तर्कशास्त्रशुद्ध असें आणखी अनुमान काढतें की, त्या रस्त्यानें जाणें धोक्याचें असल्यामुळें दुसर्या बाजूला वळून पळून जाणें शहाणपणाचें होय. या एकंदर प्रकारावरून हरिण शास्त्रीय सिद्धान्तांचा बुद्धिपुर:स्सर उपयोग करीत असतें हें तत्त्वत: कबूल करावें लागतें. आणि हरिणाला शास्त्रीय ज्ञान असतें हें विधान कितीहि चमत्कारिक वाटलें तरी त्यांत चुकीचें असें काहीच नाही. हरिणाला शास्त्रीय ज्ञान असतें, अगदी खास असतें; फक्त तें अगदी कमी प्रमाणांत असतें इतकेंच; बाकी न्यूटनच्या व या हरिणाच्या शास्त्रीय ज्ञानाची जात एकच. फरक कायतो परिमाणाचा. शिवाय आपल्याला झालेल्या ज्ञानाचा व्यवहारांत उपयोग मनुष्यप्राणी जितक्या तर्कशास्त्रशुद्ध पद्धतीनें करीत असतो तशाच तंतोतंत पद्धतीनें, अर्थात् आपल्या बुद्धीच्या मानानें, हलके प्राणी करीत असतात. फार काय, पण जो प्राणी आपल्या भोंवतालच्या परिस्थितीचें बरोबर शास्त्रीय पद्धतीनें अवलोकन करून त्यावरून तर्कशास्त्रसंमत अनुमानें काढू शकत नाही, त्याला या अज्ञानाबद्दल लवकरच शिक्षा भोगण्याचा प्रंसग आल्यावाचून रहात नाहीं.
मनुष्यापेक्षां हलक्या कोटींतील प्राण्यांना जो न्याय लागू, तोच न्याय मनुष्यकोटींतल्या पण अत्यंत मागसलेल्या व्यक्तीनां अधिक व्यापक रीतीनें लागू असलाच पाहिजे, आपल्या ज्ञानाच्या आकुंचित मर्यादेमुळें ज्याला आपण ऐतिहासिक काळाचा आरंभ म्हणून म्हणतों त्या आरंभकाळाच्याहि अनेक युगें पूर्वीचं मनुष्य सुधारणेच्या बर्याच वरच्या पायरीपर्यंत पोहोंचलेला होता. ज्योतिर्विषयक ज्ञानाचा, पशूंच्या गृह्यीकरणाच्या ज्ञानाचा आणि वैद्यकीय ज्ञानाचा उगम इतिहासपूर्व कालांत लपला आहे. मनुष्य स्वभावत:च समाजप्रेमी असल्यामुळें आद्यस्वरूपाचीं सुधारणेचीं सर्व अंगें त्या कालांतच त्यानें सुस्थितीप्रत नेलीं होतीं. म्हणून केवळ सोयीसाठी आद्यसमाजस्थितीला ‘ रानटी, मागसलेली ‘ अशी विशेषणें आपण लावीत असलों तरी त्यांचा अर्थ तारतम्यानेंच घ्यावयास पाहिजे. त्या आद्यसमाजांतील मानवांची ध्येयें आपल्या ध्येयांहून फार निराळीं होतीं असें मुळीच नाहीं. ज्याला अश्मयुग अगर पाषाणयुग म्हणतात त्या प्राचीन युगांत सुद्धां हलक्या प्राण्यांनां कसें माणसाळावें व त्यांनां आपल्या कामीं कसें लावावें, त्याचप्रमाणें जमीन नांगरून त्यांतून पिकें कशी काढावीं या गोष्टी मनुष्यानें अवगत करून घेतल्या होत्या. पुढे अर्थात् बर्याच कालावधीनें व परिश्रमांनीं, खाणींतील अशुद्ध धातू काढून त्या शुद्ध करणें, ब्रॉन्झ नामक मिश्रधातूचीं हत्यारें करणें तसेंच लोखंडाच्या वस्तू करणें वैगरे गोष्टीचें ज्ञान त्यानें मिळविलें. पाषाणयुगांत सुद्धां मनुष्याचें यांत्रिक कौशल्य कौतुक करण्यासारखें होतें, ही गोष्ट त्या काळांतील पाषाणाचीं भाल्याचीं टोंकें पाहिलीं असतां लक्षांत येतें. आणि जे रानटी लोक ब्रॉन्झ धातूच्या कुर्हाडी व सुर्या वगैरे हत्यारें करीत असत, त्यांचें शास्त्रीय तत्त्वांचें व त्यांच्या व्यावहारिक उपयोगाचें ज्ञान फार पुढें गेलेलें असले पाहिजे. त्या काळांतील आपल्या पूर्वजांचे सर्व लक्ष व्यावहारिक उपयोगाकडे होते यांत शंका नाही. आणि त्यामुळेच व्यावहारिक ज्ञानाच्या बुडाशीं कोणतीं शास्त्रीय तत्त्वें आहेत तें शोधून काढण्याचा खटाटोप त्यांनी केला नसावा. तथापि कांही शास्त्रीय तत्त्वें त्यांनां ज्ञात होतीं यांत शंका नाहीं; मात्र तीं तत्त्वें पद्धतशीर रीतीनें त्यांनीं मांडलेलीं नव्हतीं.