प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
शास्त्रीय ग्रंथ आणि त्यांची वाङ्मय या दृष्टीनें योग्यता:- निबंधमालेंत विष्णुशास्त्र्यांनी “ विद्वत्व आणि कवित्व ” या नावांचा महत्त्वाचा पण सत्य या दृष्टीनें थोड्या योग्यतेचा एक निबंध प्रसिद्ध केला, त्यांत विद्वत्व आणि कवित्त्व यांचा विरोध दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यांतील मतें शास्त्रीबोवांच्या अस्सल भक्तांसहि मान्य झाली नाहींत. तथापि फार खोल न जातां सहज मनांत येणारे विचार त्यांत चांगल्या तर्हेनें निदर्शित केले आहेत. विद्वत्ता आणि कवित्व यांचा विरोध शास्त्रीबोवांनी दाखविला तोच शास्त्रज्ञता आणि कवित्त्व यांचा अनेक ठिकाणीं व्यक्त होतो. चांगला कवि शास्त्रज्ञ नसलाच पाहिजे असें नाहीं, तथापि शास्त्रज्ञतेच्या अभावीं कवित्व शक्य आहे असें शास्त्रज्ञ आणि कवि यांच्या वैयक्तिक योग्यतेकडे पाहून विधान करतां येईल. शास्त्रीय वाङ्मय आणि काव्य यांमध्येंहि विरोध शास्त्रज्ञ आणि कवि यांपेक्षा अधिक तीव्र आहे. आपल्याकडील शास्त्रीय वाङ्मय घेतलें तर तें फारच रूक्ष आहे असें आढळून येईल. कवित्व आणि पद्यमयता यांचें भिन्नत्व कधी कधी दाखविण्यांत येतें. हें भिन्नत्व भारतीय पद्यमय शास्त्रीय ग्रंथांत फारच स्पष्ट होतें. भारतीय शास्त्रीय ग्रंथ पद्यमय जरी असले तरी त्यांस काव्य असें कोणी म्हणणार नाही एवढेंच नव्हे तर त्यांची वाङ्मय या दृष्टीनें देखील मोठी योग्यता कोणी धरणार नाही ! आपल्याकडील शास्त्रीय विषयांवरचे ग्रंथ तर बरेचसे सूत्रमय आहेत. शिक्षकाच्या अभावीं ती सूत्रें कशी अभ्यासतां येणार? पाणिनीच्या सूत्रांस ललितवाङ्मय कोण म्हणेल? श्रौतसूत्रें, गृह्मसूत्रें यांची कथा तशी जरी नाही तरी त्यांस आल्हादकारक वाङ्मय म्हणून कोणी वाचणार नाही. बादरायणाच्या सूत्रांच्या अर्थाविषयी आणि संगतीविषयीं इतके मतभेद झाले कीं, त्यामुळें निरनिराळे संप्रदाय उत्पन्न झाले. शुल्बसूत्रें व गणितावरचे ग्रंथ समजण्यास काय मारामार पडते! वाङ्मयापासून आल्हाद उत्पन्न व्हावयाच्या पूर्वी अवश्य असलेली क्रिया जी सहजावगमन, त्या बाबतीतच जर इतकी अडचण तर आल्हादाची गोष्ट दूरच. पाश्चात्त्य संस्कृतीत वाङ्मय आणि शास्त्र यांच्या सरहद्दीवरील विषय म्हटले म्हणजे सामाजिक, राजकीय आणि अर्थशास्त्रीय होत. म्याकिअव्हिलीचा “ प्रिन्स” हा ग्रंथ, शास्त्र, तसाच वाङ्मय या दृष्टीनें देखील उपयोगी होतो. पण चाणक्याचा अर्थशास्त्रावरील प्रंचड ग्रंथ निवळ शास्त्र या दृष्टीनेंच वाचला पाहिजे. त्यांतील कांही भागांचा अर्थ अजून स्पष्ट झाला नाहीं.
आपल्याकडील हे जे शास्त्रीय ग्रंथ आहेत त्यांचें वाङ्मयापासून दूरक्रांत झालेलें स्वरूप शास्त्राच्या दृष्टीनें अयोग्य आहे असें मुळींच नाहीं. उलट नवशिके, तात्पुरतें लक्ष देऊन पांडित्य करूं पाहणारे अशा लोकांस दूर ठेवण्यास योग्य असेंच शास्त्रीय ग्रंथांचें स्वरूप आहे, पारिभाषिक शब्दांनी विवेचन थोडक्यांत व अधिक सूक्ष्म होतें. तथापि शास्त्रज्ञ आणि सामान्य वाचक यांस जोडणारें देखील वाङ्मय पाहिजे. आपल्याकडील नृत्यविषयक किंवा नाट्यविषयक वाङ्मय हें केवळ तज्ज्ञवाङ्मय आहे. सामान्यजनवाङ्मय नाही. पाश्चात्त्य संस्कृतींत बरेंचसें शास्त्रीय वाङ्मय हें लौकिक वाङ्मय आहे. पाश्चात्त्यांत शास्त्र आणि वाङ्मयता यांचा विरोध बराच आहे, आणि आहे त्यापेक्षां विरोधाचा बभ्रा अधिक आहे.