प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
कायद्याचें ज्ञान:- वर सांगितल्याप्रमाणें मानवीप्राणी समाज बनवून राहूं लागले की, सर्वांची आपसांत एकी रहावी एतदर्थ समाजांतील व्यक्तीचें वैयक्तिक हक्कहि ठरविणें अवश्य असतें. रोजच्या जीवनक्रमांत लागणार्या निरनिराळ्या वस्तू व हत्यारें यांच्यासंबंधाने वैयक्तिक मालकीचे हक्क मान्य करणें जरूर होतें. नाहीतर सामाजिक जीवनक्रमाला अवश्य असलेली आपसांतील एकीच नष्ट व्हावयाची. म्हणून समाजांतील दुर्बल इसमांचे बलिष्ठ प्रतिस्पर्ध्यांपासून संरक्षण करण्याकरितां कांही न्यायनिवाडा करण्याबाबतचे नियम - प्राथमिक कायदे - सर्वांच्या मतानें तयार झाले असले पाहिजेत. नीतिशास्त्राचा मूळ आरंभ अशा गोष्टीतून झालेला आहे. आद्यकालीन लोकांमधल्या न्यायनीतीसंबंधाच्या या प्राथमिक नियमांनां नीतिशास्त्र असें मोठें नांव देणें कोणाला अप्रयोजकपणाचें वाटेल; परंतु नीट विचार केला तर वरील विधानांत असंबद्धता नाही असें दिसून येईल. आधुनिक सुधारणेची भव्य इमारत वर सांगितलेल्या प्रकारच्या न्यायान्यायसंबंधाच्या मूळ तत्त्वांवरच उभारलेली आहे; आणि तीं मूळ तत्त्वें शास्त्रीय अनुमानपद्धतीनें म्हणजे तींच तत्त्वें समाजाच्या उत्कर्षाला पोषक आहेत अशी अवलोकनानें व अनुभवाने खात्री झाल्यानंतर ग्राह्म केलेलीं आहेत, याबद्दल शंका घेण्याचें कारण नाहीं. इतिहास वाचणारांनां वरील तत्त्वें न पाळणारे लोक व राष्ट्रें वारंवार आढळतात; पण कोणत्याहि कृत्याचा न्यायनिवाडा करतांना तरी वरील ध्येयस्वरूपी तत्त्वें प्रमाण मानण्यांत येतात.