प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.

जगांतील ज्ञानसंचयासंबधीं आपलें कर्तव्य:-  एखाद्या राष्ट्रांत एखादे शास्त्र वाढलें म्हणजे त्या राष्ट्रांतील कांही माणसांना कांही गोष्टी मान्य होतात. त्या राष्ट्रांतील शास्त्रीय सिद्धांतांस मान्यता देण्यापूर्वी दुसर्‍या राष्ट्रानें त्याचें ज्ञान तपासून घेतलेलें बरें. कां कीं, एखादा शास्त्रज्ञ ज्याप्रमाणें

हीं पूर्वग्रहांमुळें चुकीचे सिद्धांत काढतो, त्याप्रमाणें चुकीच्या पूर्वग्रहांनी बाधा पावलेले त्या त्या देशांतील शास्त्रमंडल कांही गोष्टी चुकीनेंच मान्य करील. अशा गोष्टी ज्ञानाच्या इतिहासांत अनेकदां झाल्या आहेत आणि यासाठीं एका देशांतील शास्त्रज्ञांनी दुसर्‍या देशांत संवृद्ध झालेलें ज्ञान किंवा शोध काळजीपूर्वक तपासणें अवश्य आहे. जगाचें ज्ञान पुन्हां तपाशीत बसणें व वाढविणें इत्यादि क्रिया करण्यास समर्थ इतका शास्त्रज्ञांचा वर्ग आपल्या देशांत वाढला नाही. परंतु न वाढण्याचें कारण ती बुद्धीच जागृत झाली नाही हें होय. येथे आपणांस एवढीच क्रिया करतां येईल कीं, जो ज्ञान म्हणून पुढें गेलेल्या राष्ट्रांनी मांडलेला समुच्चय आहे, त्याचें दुसर्‍या भाषेंत पात्रांतर करतांना केवळ भाषेमुळे आणि तिनें जखडलेल्या विचारपरंपरेमुळें जे दोष ज्ञानांत शिरतात ते काढूण टाकणें. ही क्रिया करण्यासाठी ज्ञानपात्रांतरतत्त्वें पुढें मांडली पाहिजेत.