प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ९वें
आर्य-असुर-संबंध.

असुरांच्या प्रदेशांत आर्य. (डॉ. रा. गो. भांडारकर) - ''आशिया-मायनरमध्यें, हिटाइट लोकांचा राजा आणि मिटनीचा राजा यांच्यांत झालेल्या तहासंबंधी जो शिलालेख सांपडला आहे, त्यांत मिटनीचा राजा, इंद्र, मित्रावरूण आणि नासत्य यांनां त्यांच्या ॠक्संहितेंत आढळणार्‍या नांवांनीं आव्हान करीत असल्याचें दिसून येतें. हा लेख सांपडल्यापासून यांत घडलेल्या गोष्टीला वैदिक संस्कृतींत कोठें स्थान द्यावें असा प्रश्न पंडितांपुढें येऊन पडला आहे. या प्रश्नाचें समाधानकारक उत्तर अद्याप मिळालेलें नाहीं; पण ज्या योगानें या प्रश्नाचा पटेल असाच उलगडा होणार आहे, अशी एक संशोधनाची दिशा दाखवितां येईल. संशोधनाला 'असुर' शब्दापासून सुरुवात करावी. ब्राह्मणग्रंथामध्यें याचा अर्थ देवांचे वैरी असणाऱ्या प्राण्यांची एक जात, असा आहे. ॠक्संहितेंत सजीव, ''वीर्यशाली, '' ''बलिष्ठ'' अशा अर्थानेंच बहुधा हा योजलेला असून, द्यौ, इंद्र, वरुण इ. निरनिराळ्या देवांचे विशेषण म्हणून असतो. पण तीन चार ठिकाणीं देवशत्रु असा अर्थ घ्यावा लागतो. तथापि अशीं कांहीं स्थळें आहेत कीं, त्यांता असुरांसंबधीं जें म्हटलें आहे ते दैस्यूच्या संबंधांत लागू पडण्यासारखें असतें; आणि त्या स्थळीं असुर शब्दाचा अर्थ मानवशत्रू असा घेतां येतो. ॠ. ८, ९६,९ या ॠचेंत, जे देव नाहींत किंवा ज्यांनां देव नाहीं अशा असुरांना आपल्या चक्रानें मारण्याविषयीं इंद्राला पाचारण केलें आहे. दुसऱ्या स्थळीं बर्चिन्, आणि पिप्रु असुरांच्या सैन्यांचा देवांनीं नाश केल्याचें म्हटलें आहे. इंद्र, अग्नि, सूर्य यासारख्या कांहीं देवांना असुरहन् म्हटलें आहे.

खालीं दिलेल्या उल्लेखांतून असुर संज्ञेचा अर्थ ज्यास्त स्पष्टपणें मानवशत्रु असा होतो, अथर्व. १९.६६,१ मध्यें उपासक असुरांनां शत्रू (सपत्नान्) असें म्हणतो व त्यांना मारण्याविषयीं अग्नीची प्रार्थना करितो. जर ते उपासकाच शत्रू असले तर ते दस्यूंप्रमाणें मानव असले पाहिजेत. अथर्व ९,२,१७ आणि १८ मध्यें पुन्हा, देवांनीं ज्याप्रमाणें दस्युंना निबिड अंध:कारांत लोटून दिलें त्याप्रमाणें उपासकांच्या शत्रूंनां हांकलून लाविण्यासाठीं कामाला आव्हान केलें आहे. या ठिकाणीं असुरांची दस्तूंशी तुलना केली आहे. आणि म्हणून ते एखाद्या विशिष्ट देशांतील मूळ रहिवाशी असावेत. अथर्व. १०.३,११मध्यें ''स मे शत्रून् वि बाधताभिन्द्रो दस्यूनिवासरान्'' असा ॠगर्ध आहे; तेथें, वरण वृक्षाच्या ताईतानें, इंद्राने दस्यु असुर यांचा नाश केल्याप्रमाणें तो धारण करणाऱ्याच्या शत्रूंचा नाश करावा अशी इच्छा केली आहे. या ठिकाणीं दस्यु आणि असुर हे शब्द जवळ जवळ आले असून दस्यु शब्द असुराला लाक्षणिक म्हणून आला आहे. त्यांचा एकत्र अर्थ ''दस्यु असुर'' म्हणजे ''रहिवासी असुर'' असा तरी होईल किंवा ''दस्यु आणि असुर''असा होईल. तेव्हा भारतांतील मूळ रहिवाशांनां दस्यु असें नाव असलें तर असुर हेंहि दुसऱ्या एखाद्या देशांतील मूळ रहिवाशांचें नांव असलें पाहिजे, हें समजण्यास अवघड पडणार नाहीं. कांहीं लोक दस्यु याचा अर्थ दैत्य किंवा देवशत्रु असा घेतात. पण, आर्य देवांनां न जुमानणारें, आर्यसंस्कार न पाळणारे आणि ज्यांचा पाडाव करण्यास देवानीं आर्यांना समर्थ केले असे कृष्णवर्णीय भारतांतील मूळ रहिवाशी असा अर्थ ज्यास्त रूढ असून, त्यापासूनच देवशत्रू असा अर्थ पडला असावा. ऐतरेय ब्राह्मणांत (७.१८) याचा अर्थ मूळ रहिवाश्यांची जात असा स्पष्टपणें घेऊन, आंध्र, पुण्ड, शायर पुलिन्द आणि मूतिब हे त्याच्याच जातींत घातले आहेत. ''

या वरील उताऱ्यांत असुर हे दस्यूंप्रमाणेंच आर्य फिरस्त्यांचे शत्रू असून आर्यांच्या देवांनी त्यांचा नाश केला असें वर्णन आहे. पातञ्जलमहाभाष्यात एके ठिकाणीं असुर हें नांव म्लेच्छांच्या किंवा परकीयाच्या एका विशिष्ट वर्गाचें द्योतक म्हणून आलें आहे. ''तेऽसुरा हेलयो हेलय इति कुर्वन्त: पराबभूवु: । तस्माद्ब्राह्मणेन न म्लेच्छित वै नापभाषितवै । म्लेच्छो हवा एष यद्पशब्द: । म्लेच्छा मा भूमेत्वध्येयं व्याकरणम्॥'' ''ते असुर हेलय: हेलय: असे शब्द करीत पराभव पावले – कारण, भाष्यकार म्हणतात, हे ३ अरय: हे ३ अरय: या शुद्ध संस्कृताच्या ऐवजी, त्यांनी दीर्घ स्वर गाळला, अ तोडून काढला, आणि र चा ल केला आणि अशा रितीनें आपण आर्य नाहीं. म्लेच्छ आहोंत असें दाखविलें. म्हणून ब्राह्मणानें म्लेच्छाप्रमाणें वागूं नये व अपशब्द बोलूं नये. अपशब्द म्लेच्छ आहे असें म्हणतात. आपण म्लेच्छ बनता कामा नये म्हणून व्याकरण शिकावें. '' या ठिकाणीं असुर शब्दाचा अर्थ परकीय, अब्राह्मण जात असा स्पष्ट केला आहे.

हा पातञ्जलभाष्यांतील उतारा कोणत्या तरी ब्राह्मणांतून घेतला असला पाहिजे. शतपथ ब्राह्मणांत (३.२, १. १८-२४) अशाच तर्‍हेचा एक उल्लेख आढळतो. त्या ठिकाणीं असें म्हटलें आहे कीं, देव आणि असुर दोघेहि प्रजापतीपासून उत्पन्न झाले, व आपल्या पित्याचा दाय मिळविते झाले; देवांनां मन मिळालें व असुरांना वाणी मिळाली; त्या योगानें देवांनां यज्ञ व असुरांनां फक्त वाणी प्राप्त झाली; देवांना दूरचें जग (स्वर्ग) व असुरांनां ही (पृथ्वी) लाभली. नंतर प्रजापतीपासून असुरांना मिळालेली वाणी त्यांच्याकडून हिसकावून घेण्याचा देवांनीं उद्योग आरंभिला व तसे झाल्यावर असुर हेलव: हेलव: असें म्हणत पराभव पावले यांनीं काढलेले उद्गार अशा प्रकारचे न कळण्यासारखे होते, आणि (जो असें बोलतो) तो म्लेच्छ असतो. म्हणून कोणींहि ब्राह्मणानें म्लेच्छ भाषा बोलूं नये (न म्लेच्छेत्) कारण असुरांची वाणी अशा प्रकारची असते (असुर्याहैषावाक्). येथें दोन विधानांवर भर दिला पाहिजे. देवांनां स्वर्ग नेमून दिला व असुरांनां पृथ्वी दिली हें एक विधान. याचा अर्थ असुर हे पृथ्वीवरील रहिवाशी होते. दुसरें विधान म्हणजे, ब्राह्मणांनीं म्लेच्छाप्रमाणें वागू नये, म्हणजे म्लेच्छ भाषा बोलूं नये अशाबद्दल केलेली आज्ञा. याचें कारण ती असुरी भाषा आहे. यावरून असें दिसून येते कीं, असुर हे म्लेच्छ भाषा बोलणारे पृथ्वीवरील रहिवाशी होते असें मानीत; तेव्हां ते म्लेच्छ किंवा परकीय रानटी लोक होते. जे पृथ्वीवर राहात होते, जे म्लेच्छ होते आर्यांचे जे शत्रू किंवा प्रतिस्पर्धी होते आणि हिंदुस्थानांत आर्यांना अडथळा करणाऱ्या दस्यूंशीं किंवा हिंदुस्थानातील मूळ रहिवाशांशीं ज्यांची तुलना केली आहे ते हे असुर कोण होते, या प्रश्नाचें उत्तर आपण येथें विचारांत घेतलेल्या शिलालेखानें मिळेल.

राजा मितनि आणि त्याची प्रजा टायग्रिस व युफ्रेटिस नद्यांमधील प्रदेशाच्या उत्तर भागांत वास करीत होती. त्यांचे शेजारी असिरियन, किंवा (''वाय'' या ग्रीक स्वराच्या जागीं नेहेमींच्या वहिवाटीप्रमाणें ''यु'' घातल्यास) असुर्यन होते. असिरियन लोकांत असुर-बनि-पाल, असुर-नझिर-पाल, तिग्लथ-पिलेसर इ. नांवे आढळतात. असीरिया हें नांव सुद्धां असुर या त्या देशाच्या प्राचीन राजधानीच्या नांवावरून व तेथील देवाच्या नांवावरून पडलें असें म्हणतात. ईशावास्योपनिषदांतील असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसावृता:॥३॥ लोका: याला जोडलेले 'असुर्या', हें पद 'असिरिया'शीं सदृश असें वाटतें व त्याचा अर्थ असुरांचा प्रदेश असा घेतां येईल. म्हणून, ज्याप्रमाणें हिंदुस्थानांत आर्यांच्या उत्कर्षाला दस्यूंनी विरोध केला त्याचप्रमाणें असिरियाच्या असुरांनींहि केला आणि म्हणून वर आलेल्या कांहीं उल्लेखांतून त्यांची दस्यूंशी तुलना केली आहे, हें संभवनीय दिसतें. हिंदूंच्या कल्पनेप्रमाणें असीरियन म्लेच्छ ठरले, हें उघड दिसतें. पुढील काळांत, विशेषत: जेव्हां आर्य पांच नद्यांच्या प्रदेशांत येऊन राहिले आणि त्यानंतर जेव्हां ब्रह्मावर्तांत त्यांच्या धार्मिक पद्धतींत वाढ झाली, त्यावेळी मानवी असुर व आर्यांचीं त्यांच्याशीं झालेलीं युद्धें यांच्या आठवणी व त्यांची संस्कृति, या गोष्टींचें देव व असुर यांच्या ठराविक शत्रुत्वसंबंधींच्या कथानकांत रूपांतर करण्यास प्रवृत्ति झाली. दैदिक व अवेस्ती लोक यांच्यामधील देवांसंबधींच्या विभिन्नतेवरून शत्रुत्वाला सुरुवात झाली असें म्हणतात. ब्राह्मणांकडून पूजिल्या जाणाऱ्या देवांनां इराणी लोक राक्षस म्हणून नांवें ठेवीत व याचा वचपा भारतीय लोक अहुर किंवा असुर हे दैत्य आहेत असें भासविण्यानें काढीत. असें समजण्यांत यांत अडचण अशी आहे कीं, अवेस्तांत अहुर हें नांव अहुर-मझ्द या परम देवाचें आहे व जरी दोन-तीन देवदूतांनां हें नांव लावण्यांत येतें तरी एखाद्या सबंध प्राण्यांच्या जातीला उद्देशून हें कधीं लावण्यांत येत नाहीं. तेव्हां आपल्या कथापुराणांतील असुर हे असिरियांतील असुर होत, अशा तर्‍हेचें विवरण जास्त पटण्याजोगें दिसतें. याप्रमाणें असुर हा शब्द प्रथम (१) ''सजीव विभूति'' ''आश्चर्यकारक शक्तीचा'' अशा अर्थाचा वाचक झाला; आणि द्यौ: या सारख्याहि प्राचीनतम देवांचें विशेषण म्हणून योजण्यांत आला. नंतर (२) फिरस्त्या आर्यांना विरोधी असा एक मनुष्य प्राणी, असा त्याचा अर्थ झाला व त्याचें कारण असें कीं, यांत सांगितलेल्या शिलालेखांत दाखविल्याप्रमाणें त्यांचा असिरियांतील असुरांशीं संबंध आला. यावरून पुढील काळांत (३) देवांच्या विरुद्ध असलेल्या पौराणिक प्राण्यांची एक जात असा अर्थ निघाला. यांतील शत्रुत्वाची कल्पना सोडून हा शब्द (४) म्लेच्छ किंवा या नांवाचा एखादा परकीय, अशा अर्थानें पुढें आला. हें पतञ्जलि आणि शतपथ ब्राह्मण यातून दिलेल्या उताऱ्यांवरून दिसून येतें; या पुढें आढळणारें मयासूर हें नांवहि हेंच दिग्दर्शित करितें असुर शब्दाचा पहिला अर्थ पुढील तीनहि अर्थांपेक्षा अगदी निराळा दिसतो.

अथर्व. ६.१०८, ३ यांत असुरांनां बुद्धि असल्याचें सांगितलें आहे. त्यांच्या अंगी माया (जादूची शक्ति) वास करीत असे (अथर्व. ६.७२, १). अश्वलायन श्रौतसूत्रांत (१०, ७, ७) असुरी विद्येचें नांव आलें आहे. असुरी विद्या म्हणजे नि:संशय जादूकला व ज्ञान. मय-असुरानें, अर्जुनानें त्याला खांडववनांत दग्ध होत असतां वाचविलें हा उपकार फेडण्यासाठीं पांडवांकरितां मयसभा बांधिली. बंगाल विभागाचे अर्चिआलॉजिकल सुपरिंटेंडेंट डॉ. स्पूनर हे जें असुर-मय नांवाचा तलास अहुर-मझ्दाशीं लावून त्याला खांडववनांत दडून बसणारा भेकड प्राणी बनवितात हें अगदी हास्यास्पद दिसतें. आपणांस माहीतच आहे कीं, असिरियन लोकांनीं शिल्पकला साध्य करून घेतली होती व इमारती बांधण्याच्या कामांत त्यांची वाकबगारी तर प्रसिद्धच होती, तेव्हां या पांडवांच्या शिल्पकाराचें नांव एखाद्या असिरियन किंवा असुरशिल्पकाराशीं जोडल्यास तें जास्त सयुक्तिक दिसेल.

पण असा प्रश्न उद्भवतो कीं, शिलालेखांत दाखविल्याप्रमाणें इ. स. पू. १५ व्या शतकांतल्या असिरियनांचे जर वैदिक आर्य शेजारी असतील तर त्यांनीं हिंदुस्थानांत स्थलांतर कधीं केलें व पांच नद्यांच्या प्रदेशांत ते केव्हां वास्तव्य करून राहिले? जर त्यांनां या ठिकाणीं पोंचण्यास ५०० वर्षे लागलीं असतील व त्यानंतर त्यांनीं सुक्तरचना व यज्ञोपासनाविन्यास या वैदिक संस्कृतीला आरंभ केला असेल तर हें वृत्त व इ. स. पू. ६ व्या शतकांतील बौद्ध धर्माचा उदय यांच्या मधला काळ वैदिक अवस्थेपासून बौद्धिक अवस्थेपर्यंत भारतीयांचा उत्कर्ष दाखविणाऱ्या असंख्यात गोष्टींनां फार अपुरा पडतो. हा आक्षेप खरोखरीचा फार महत्त्वाचा आहे व त्याचें निरसन करण्यासाठीं, सर्व सुक्तें पंजाबांत रचलेलीं नाहींत, तर वैदिक काव्याला भारतीय आर्य अगदीं उत्तरेकडील प्रदेशांत रहात असल्यापासून सुरुवात झाली आहेर्‍या ब्रुन्होफरच्या कल्पनेचा अवलंब केला पाहिजे. हें काव्य ''कास्पियन समुद्रापासून पंजाबपर्यंतच्या उत्तरइराणांतील कवींची कृति'' आहे. या वाक्यांत उत्तरइराणाच्या ऐवजीं उत्तर मेसापोटेमिया किंवा तेथलाच कोठला तरी प्रदेश अशी दुरुस्ती भीं सुचवितों. असिरियांतील रहिवाश्यांच्या नांवांवरून असुर शब्द प्रचारांत आला ही माझी व्युत्पत्ति खरी असेल तर आर्य लोक बराच काळपर्यंत त्यांच्या शेजारीं राहात असले पाहिजेत. कारण संहितांतील मागाहून झालेल्या भागापासूनचें संबंध वाङ्मय व पुढील काळांतील वाङ्मय असुर व तत्संबंधी कथा यांनी परिपूर्ण आहे व ही गोष्ट असुरांनीं आर्यांच्या मनावर मोठा कायमचा ठसा उमटविला होता याची साक्ष देते. मूलगृह-मग तें कोणतेंहि असो-सोडून भटकतांनां वैदिक ॠषींनां वाङ्मयशैथिल्य प्राप्त झालें होतें आणि पंजाबला पोंचल्यानंतर एकदम त्यांनां वाङ्मयाची उकळी फुटली असें म्हणतां येत नाहीं. ज्यांनीं ॠग्वेदाच्या दहा मंडळांत आणि अथर्ववेदाच्या वीस कांडांत सूक्तांचा संग्रह केला त्यांचा हेतू कोठल्याहि कुटुंबांत किंवा आर्य प्रदेशाच्या कोठल्याहि कोंपऱ्यांत पडलेला कसलाहि प्रबंधखंड असो, तो जमा करणें हा होता व तो लावण्यांत प्राचीनतेच्या अनुक्रमाकडे लक्ष दिलेलें नाहीं, तर सध्यांचा संग्रह करण्यांत देवतासारूप्य व ॠचांची संख्या यांसारख्या तत्त्वांचा अवलंब करण्यांत आला आहे. तेव्हां दहा मंडलें व वीस कांडें यांतील सर्व सूक्तें व अनुवाक आर्य लोक उत्तरमेसापोटेमियांत किंवा दुसऱ्या कोठल्यातरी मूलगृहीं रहात असल्यापासून आणि पंजाबात त्यांचें वास्तव्य होईपावेतों भटकत रहाण्यास निघाल्यापासून रचलेलीं आहेत असें धरण्यास हरकत नाहीं. इ. स. पू. १५ शतकाच्या मध्यकाळीं भारतीय आर्यांनी पांच देवता – एक एकटी व चार, दोहोंचा एक संघ अशा व्यवस्थेनें – मानण्यापर्यंत धर्माच्या बाबतींत प्रगति केली होती. हे संघ त्यांच्या नांवाच्या व्याकरणांतील रूपांसह ॠग्वेदांत आहेत त्याप्रमाणेंच हुबेहुब आढळतात. हा वेळपावेतों या नांवाभोंवतीं बरेचसें सौक्तिक वाङ्मय गोळा झालें असलें पाहिजे. व या वाङ्मयाचा उगमकाल ब्रुन्होफर म्हणतो त्याप्रमाणें इ. स. पू. २५०० वर्षांपर्यंत मागें ढकलावा. आतां एक प्रश्न उरतो तो हा कीं, भारतीय आर्य पंजाबांत या लेखाच्या कालापूर्वी कीं नंतर वसाहत करून राहिले. आर्य लोक हिंदुस्थानांत वेगवेगळ्या टोळ्या पाडून आले. तेव्हां काहीं टोळ्या इ. स. पू. १५ शतकाच्या आधीं हिंदूस्थानांत आल्या असाव्यात; पण असिरियाच्या आसपास राहणाऱ्या टोळ्या त्यानंतरच गेल्या असल्या पाहिजेत. त्या हिंदुस्थानांत गेल्या याबद्दल मुळींच संशय नाहीं. कारण हिंदुस्थानातील दस्यूंशी ज्यांची तुलना करण्यांत येते त्या असुरांबरोबर झालेल्या भांडणाची व इतर त्यांच्या संबंधींच्या गोष्टींची आठवण त्यांनां राहिली. तथापि, ही असुर-लोकांची आठवण त्यांनां मुळींच सुखावह नव्हती; व असें म्हणण्याचें कारण हें कीं, त्या संबंधीं बोलतांना, तो निबिड अंध:कारानें आवृत्त आहे, आत्महत्या करणाऱ्या लोकांनां त्या ठिकाणीं पाठविण्यांत येतें, असा उल्लेख करितात. माध्यंदिन शाखेच्या बृहदारण्यकोपनिषदांत (४.४, १४) अज्ञानी लोकांनां तो लोक दाखविला आहे आणि कण्वशाखेच्या ग्रंथांत (४.४,११) तो असुरप्रदेश आहे हें मुळी विसरून, त्याचें सामान्य वर्णन तो निरानंद प्रदेश (अनंद) आहे एवढेंच सांगून – केलें आहे''

आपल्या वाङ्मयातींल असुर व असिरिया यांचा संबंध राजारामशास्त्री भागवतांनीं सुमारें ३०-४० वर्षांपूर्वी मांडला त्याचा हळु हळु स्वीकार कसा होत आहे हें राजवाडे, टिळक, व डा. भांडारकर यांचे लेख येथें उध्दृत केले आहेत त्यावरून त्यांच्या विधानास मान्यता दिली आहे असें समजूं नये. यावर आणखी बराच परिश्रम झाला पाहिजे. दोहोंच्या लेखांतील विधानें 'सूचक कल्पना' या पलीकडे मुळींच गेलेली नाहींत.