प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १७ वें.
खलीफत व इस्लामाचा प्रसार.
चीन:- खुद्द चीनमध्यें मंगोलिअन कालापूर्वीं इस्लामधर्म नव्हता. अशी दंतकथा आहे कीं, महंमदाचा मामा वाहब अबूकबशहा हा ६२८-२९ सालीं कँटन येथें उतरला. त्यानें महंमदापासून चीनच्या बादशहाला मौल्यवान वस्तु नगर करण्यास आणल्या होत्या; तसेंच इस्लामधर्माचा स्वीकार करण्याबद्दल आज्ञापत्रहि आणलें होतें. नंतर तो सिआन फु कडे गेला. दुसरी अशी एक दंतकथा आहे कीं, कँटनमध्यें ज्याचें थडगे अजून दृष्टीस पडतें अशा सादइब्रअबिवक्कास यानेंच प्रथमतः संदेश आणला. तसेंच ७५५ सालीं बंडखोरांच्या विरुद्ध बादशहाला मदत म्हणून खलीफा मनसूर यानें ४००० सैन्य पाठवून दिलें. बादशहानें त्यांस मुख्य मुख्य शहरांत रहाण्यास परवानगी दिली. त्यामुसलमानांनीं चिनी स्त्रियांशी लग्नें लावलीं व ते चीनमधील मुख्य मुख्य मुसुलमानी जातीचे जनक झाले.
वरील दंतकथा अरब इतिहासकारांच्या ग्रंथांतून आढळून येत नाहींत. चीन व इस्लाम यांचा संबंध परिस्थितीच्या वैशिष्ट्यामुळेंच घडून आला. ६२० सालच्या सुमारास चीनमध्यें व आशियामध्यें नवीन सत्ता उत्पन्न होऊन एकमेक महत्त्वाकांक्षेनें प्रेरीत होऊन एकमेकांच्या प्रदेशांवर स्वारी करण्याच्या निमित्तानें येत असतां दोघांचा संबंध जडला. ज्याप्रमाणें ७२० मध्यें इस्लामानुयायांनीं ऑक्ससच्या पूर्वेकडील प्रांत जिंकला त्याचप्रमाणें टाइसूंनें काश्गर जिंकून आपले नांव गाजविलें. या दोघांमध्यें संबंध जडण्याचें मुख्य कारण म्हणजे व्यापार होय व हा व्यापार सुई घराण्यांतील राज्यांनीं आपल्या कारकिर्दींत फार वाढविला. दुसरें कारण म्हणजे ख्रिस्ती मिशन-यांनीं केलेलें काम होय; व या संबंधामध्यें अधिक शैथिल्य आणण्याचें कारण म्हणजे दोन्हीहि सत्तांचा अल्पसंतोषीपणा होय. मुसुलमान लोकांनीं कुतैबा इब्न मुस्लिम याच्या सेनाधिपत्याखालीं फरगाना प्रांत हस्तगत केला पण काश्गर घेण्याचा त्यांचा यत्न फसला. ताबरींत सांगितल्याप्रमाणें चीनच्या दरबाराकडे वकील पाठविल्याची कथा ऐतिहासिक असेल. उमईद खलीफांच्या कारकीर्दींत चीनशीं अप्रत्यक्ष रीतीनें दळणवळण सुरू होतें. त्या वेळची जी एक गोष्ट सांगतात त्यांत नैझॅक व जबघू एका बाजूस व शद्द आणि सेबेल दुस-या बाजूस असा एक प्रवेश दाखविला आहे. हा जबघू हा पहिला चिनी तुर्क असून त्याला दमास्कसला पाठविण्यांत आलें होतें. एक गोष्ट मात्र खरी कीं चीनच्या राजकारस्थानामुळें चीनच्या तंत्राखालील व इतर मुसुलमानी राज्यें चिडून जाऊन त्यांनीं चीनविरुद्ध सारखी चळवळ चालविली. परंतु जेव्हां अरबीसाम्राज्याला उतरती कळा लागून मुसुलमानांची सत्ताहि ढिली पडूं लागली व त्याबरोबरच तंग बादशहांच्या कारकीर्दींत चीन साम्राज्याजाहि उतरती कळा लागली, त्यावेळेस किरकोळ राष्ट्रें शिरजोर होऊन त्यांनी मुलुख बळकावण्यास सुरवात केली. यामुळें चीनमध्यें इस्लामधर्माचा प्रवेश होण्याचे मार्गांत अडथळे येऊं लागले. चीनमध्यें बादशाही सत्ता डळमळीत झाल्याकारणानें चिनी लोकांनीं इतर धर्माचा आंत प्रवेशच होऊं दिला नाहीं. बुद्धधर्मानें अडथळ्याला न जुमानतां चीनमध्यें प्रवेश केला होता पण याला एक दोन कारणें होतीं; (१) बुद्धधर्म हा त्यांच्या प्रचलित तर्कविद्येशीं जुळता होता, (२) बुद्धधर्मानें चीनलोकांच्या राष्ट्रीय स्वभावांतील तत्त्वें आपल्यामध्यें घेऊन तेथील परिस्थितीशीं व भावनेशीं जुळतें करून घेतलें. परंतु इस्लामधर्माचा, आत्मा एकरूपता असल्याकारणानें व त्यांत अनेक भिन्न संप्रदाय निघूं शकत नसल्यामुळें व त्यांचा निषेधहि असल्यामुळें, आणि विशेषतः इस्लाम हा राजकीय धर्म असल्यानें, राजसत्तेच्या आश्रयाच्या अभावीं त्याचा प्रवेश प्रसार व चीनमध्यें होऊं शकला नाहीं. अशा प्रकारचा राजश्रय चेंगिझखानानें स्थापलेल्या मोंगल साम्राज्यावर राज्य करणा-यांकडून प्रथमतः इस्लामधर्माला मिळाला पण चेंगिझखानाचा मुख्य उद्देश चीनपासून वेगळें होण्याचा असल्याकारणानें व असें केल्यावर आपल्याविरुद्ध चीननें प्रयत्न केला असतां तो सफळ होऊं नये म्हणून त्यानें या शौर्यांत नांवाजलेल्या पश्चिमेकडील मुसुलमान जातीशीं सख्य केलें व अर्थातच त्याला तुर्कलोकांची संख्येनें, शौर्यानें, व शिस्तीच्या बाबतींत फार मदत झाली. पठाण लोकहि निवळ भाडोत्री असल्याकारणानें त्यांनींहि त्याला मदत केली. तरी पण सर्वांत मोठी मदत चीनच्या व चीनीतुर्कस्तान, ट्रॅन्सऑक्सिआना व खुरासान यांमध्यें असलेल्या मुलखांतील लोकांपासून मिळाली. यामुळें, मुसुलमानी चीनच्या प्रदेशांत पर्शिअन भाषेला कां महत्त्व प्राप्त झालें याचा उलगडा होतो. चिनी मुसुलमानांच्या शब्दप्रयोगांत पर्शिअन भाषेचा भरणा जास्त असण्याचें मुख्य कारण म्हणजे या मोंगलराजांच्या सैन्यांत जवळच्या आशिया खंडांतील मुलखांतून निरनिराळ्या जातींतील लोकांचा भरणा झाला व या जातींतील लोकांनां पर्शिअन भाषेबद्दलचा फार आदर असे. शिवाय ज्यावेळेस कुबलाइखानानें चीनमध्यें आपला अंमल बसविला त्यावेळीं त्यानें आपल्या दरबारीं बरेच पर्शिअन सरदार ठेवले होते. व त्या सरदारांनीं पर्शिअन भाषेचा येथेंहि बराच फैलाव केला.
मोंगलराज्यकर्त्यांनीं आपल्याबरोबर मुसुलमान किती आणले याची कल्पना आपल्यला करतां येणार नाहीं. तरी पण हल्लीं प्रसिद्ध झालेल्या एका गोष्टीवरून आपल्याला कांहीं अनुमान काढतां येईल. १२२६ सालीं महंमदाचा वंशज म्हणवून घेणारा बुखारा येथील एक शूर तरूण सय्यद नांवाचा योद्धा चेंगिझखानाकडे आला. या तरूणाची तरतरीत बुद्धिमता पाहून चेंगिजखानानें त्याला आपला शरीरसंरक्षक नेमलें व हळू हळू त्याला खास महत्त्वाच्या कामगि-या सांगण्यास सुरवात केली. कुबलइखानानें त्याला युनान प्रांत जिंकण्यास पाठवलें व सहावर्षेंपर्यंत त्या प्रांताची व्यवस्था या सय्यदकडेच होती. या अधिकारावर बसतांनांच तो वारला व थुन अँनफु व सिअँनफू येथें असलेलीं त्याचीं थडगीं फ्रेंच संशोधकांनां सांपडलेलीं आहेत. याची या प्रांतावर योजना झाल्यावर याच्या बरोबर पुष्कळच लोक आलेले होते. व तेव्हांपासून यूनान प्रांतात मुसुलमानांचा प्रवेश झाला. चीनमधील मुसलमानांची लोकसंख्या किती आहे या प्रश्नाचा आपण थोडासा विचार करूं. चेंगिझखानाच्या अगदीं प्रथम स्वारीपासून तों मोंगलसत्तेला उतरतीकळा लागेतों मुसुलमानांची चीनमध्यें असलेली लोकसंख्या १०,००,००० पलीकडे असूं शकणार नाहीं. हल्लींची चीनमधील मुसुलमानांची संख्या कमींत कमी ४०,००,००० भरते. ही संख्या आपोआपच हळूहळू वाढत गेली असें म्हणणें चुकीचें होईल. या वाढीचीं दोन तीन कारणें आपल्याला दाखवतां येतील. (१) वेळोवेळीं तुर्की राजकन्यांच्या झनान्याबरोबर ज्या मुसुलमानांच्या टोळ्या आल्या त्यांतील पुष्कळ लोक चीनच्या बादशाहाच्या जनानखान्यांत नोकरीस राहिले. (२) चीनी मुलें मुसुलमानीधर्मांत दीक्षा देऊन ओढून घेतलीं गेलीं व अद्यापिहि घेतली जातात. (३) ज्या ज्या वेळीं प्लेग वगैरेमुळें चीनमधील अधिकाराच्या जागा रिकाम्या पडत असत त्यावेळेस मुसुलमान लोकांनां त्या देण्यांत येत असत. कारण त्यावेळची अशी समजूत होती की मुसुलमान लोक कोणत्याहि संकटाला न जुमानतां तोंड देत असत. चीनच्या लोकांनां व चीनच्या सरकारला मुसुलमानांबद्दल किती आदर व उच्च कल्पना होती व हल्लीं आहे हें हल्लीं शेतें नांगरण्याच्या बाबतींत त्यांची नेमणूक व योजना व्हावी असें सरकारनें ठरवलें आहे त्यावरून दिसतें. अशा प्रकारचीं वाढीला पोषक अशीं जरी दोन तीन कारणें होतीं तरी पण एक दोन प्रतिबंधक कारणेंहि आपल्याला दाखवितां येतील. पहिलें कारण म्हणजे मुसुलमानांच्या धार्मिक व राजकीय संघटनाशक्तीची चीनच्या लोकांनां फार भीति वाटत असे व तसेंच चीनमधील मुसुलमान लोक व त्याच धर्माचे इतर ठिकाणचे लोक यांमध्यें फार भांडणें होत असत.
चीनच्या मुसुलमान लोकांनां ज्या नांवांनीं संबोधण्यांत येतें. त्यांबद्दल एक दोन शब्द सांगणें जरूर आहे. त्यांनां डगन्स म्हणण्याचा प्रघात आहे. तुर्कलोक यांनां डंगन्लर असें म्हणतात. हे चीनचे मुसुलमान स्वतः आपल्याला हुयिहुयि अथवा हुयिहुटझु असें म्हणवून घेतात. पण चिनीलोक हें नांव सर्वच मुसुलमानांनां वापरतात. ह्या नांवाचा स्वतःतुर्कलोक निषेध करून आपल्यांस शांट असें म्हणवून घेतात.
चीनमधील निरनिराळ्या प्रान्तांविषयीं थोडक्यांत माहिती खालीलप्रमाणें आहे.-
(१) कानसु.- या प्रांतांत डाब्रीच्या मतें शेकडा ८५.६ म्हणजे सुमारें ८३,५७,००० मुसुलमान आहेत. या प्रांतांची राजधानी लानचौ आहे. येथील मुसुलमानांनीं १८६३-७४ आणि १८९५ सालच्या बंडांत भाग न घेतल्यामुळें त्यांचें कांहीहि नुकसान झालें नाहीं. त्याच्यामध्यें शिक्षणाचें प्रमाण उच्च असून त्यांची संस्कृतिहि उच्च दर्जाची आहे. लानचौ हें व्यापारी शहर असल्याकारणानें येथें हिंदुस्थानांतून पार्शिआंतून व तुर्कस्तानमधून मुसुलमान व्यापारी येतात. धार्मिक चळवळीचीं केंद्रें या नात्यानें होचौ व किंकिणू हीं शहरें प्रसिद्ध आहेत. सिंनिंफू हें ठिकाण तेथील संकीर्ण लोकसंख्येसाठीं महत्त्वाचें आहे. कानसूमध्यें मंगोलियन मुसुलमान आढळतात.
(२) शेनसी.- येथील मुसुलमान वस्ती डाब्रीच्या मतें शेकडा ७६.७ म्हणजे ६५,००,००० आहे. सि आन फू या राजधानींमध्यें ५०,००० मुसुलमान घराणीं असून या गावांत ७ मशीदी आहेत. गँब्रील व मॉरीसच्या मतें आसपासच्या चारी हद्दी धरून एकंदर लोकसंख्या ४,००,००० आहे. त्यांत एकदशांश तार्तर लोक आहेत. दोनदशांश मुसुलमान आहेत व सातदशांश चिनी लोक आहेत.
(३) शानसी.- डाब्रीच्या मतें या प्रांतांतील लोकसंख्या ५०,००० आहे.
(४) चिलि.- फक्त पेकिंग येथील मुसुलमानांची लोकसंख्या अवगत असून ती १,००,००० आहे व ११ मशीदी आहेत.
(५) शाँटंग.- येथील शहरांत मुसुलमान लोक पुष्कळ असून लिनशिंग चौ हें शहर महत्त्वाचें व्यापारी शहर असून तेथे एक विद्यालय आहे व त्यांत पेकिंगच्या मुलांनां शिकविलें जातें. या प्रांतांत ३२५ मशीदी आहेत.
(६) झेचुआन.- या प्रांतांत मुसुलमान लोकांची वसती ३,००,००० असून जवळ जवळ चारशें मशीदी आहेत. येथें तुर्कस्तानांतून फार लोक येतात. या प्रांतांत सुंग पुनतिंग हें शहर असून तेथें ४,००० मुसुलमान व तीन मशीदी आहेत.
(७) हो नान.- या प्रांतांतील मुसुलमान लोकवस्ती २,००,००० आहे.
(८) यु नान.- डाब्रीच्या मतें येथील मुसुलमानांची संख्या साडेतीन ते चार लक्ष आहे.
(९) इतर प्रांतांमध्यें मुसुलमानांची संख्या पुष्कळ कमी प्रमाणांत आढळून येते. डाब्रीनें आंकडे दिल्याप्रमाणें हुनानमध्यें ५०,०००, क्वांगसि ४,०००, क्यांगसु १,५०,०००, क्यांगतुंग २१,०००, क्वाँटासि १५,०००, क्युइचौ ४०,०००, चे कियांग ३०,००० वरील आंकडे अगदीं विश्वसनीय असे नाहींत.