प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १७ वें.
खलीफत व इस्लामाचा प्रसार.
पहिले चार खलीफ.- अबूबकर (इ. स. ६३२-६३४), उमर (६३४-६४४), उस्मान (६४४-६५६) आणि अल्ली (६५६-६६१) हे मदीना येथें लोकांनीं निवडलेले खलीफ होत. यांच्या कारकीर्दीला ''आरबांचें लोकसत्ताक राज्य'' म्हणतात. अबूबकरचा सरदार खालीद यानें बहुतेक अरबस्तान पादाक्रांत करून इ .स. ६३५ त दमास्कस शहर काबीज केलें. उमर खलीफानें सिरिया देश जिंकून, ज्याकरितां पुढें कित्येक शतकें ख्रिस्ती व मुसुलमान यांमध्यें मोठमोठीं युद्धें झालीं. तें यरुशलेम शहर हस्तगत केलें. इराकमध्यें इराणी लोकांशीं सामना करून त्यांनां तेथून हुसकून लाविलें. ६४० मध्यें उमर नांवाच्या सरदारानें इजिप्तवर खलीफाचा अंमल बसविला, म्हणजे फार थोड्या अवधींत मुसुलमानांनीं आर्यन लोकांपासून बहुतेक सर्व मुख्य मुख्य जुने सेमिटिक प्रदेश जिंकून घेतले. ते प्रदेश म्हणजे यरूशलेम, सिरिया, मेसॉपोटोमिया. असुरिया, आणि बाबिलोनिया हे होत. या विजयमालिकेंत इजिप्तची भर घालून ओसाड अरबस्तानच्या सरहद्दीवरील प्रदेशांचें एक पूर्ण वर्तुल आपल्या मालकीचें केलें. ६३५ मध्यें बसरा व कुफा हीं शहरें वसविलीं जाऊन नवीन साम्राज्याची तीं केंद्रस्थांने बनण्याइतकें महत्त्व त्यांनां प्राप्त झाले. हीच गोष्ट दमास्कसची. मदीना ही कांहीं दिवस पावेतों इस्लामची राजधानी होती खरी पण पुढें हेजाझ व बहुतेक सर्व मूळचें अरबस्तान खलीफत चळवळींच्या बाहेर पडल्यासारखें झाले. ६४३ च्या सुमारास सर्व इराण जिंकून उमरनें खलीफतच्या दिग्विजयावर कळस चढविला.
उस्मानच्या कारकीर्दीपासून अरबस्तानचा नाश करणा-या अंतःकलहाला सुरूवात झाली असली तरी परदेशावरच्या मोहिमी बंद पडल्या नाहींत. उत्तरेकडे मुसुलमानांच्या तरवारी अर्मेनिया व आशियामायनरपर्यंत पोंचल्या होत्या; पश्चिमेकडे आफ्रिकेच्या उत्तर किना-यावरच्या कार्थेज शहराला जाऊन भिडल्या होत्या. या खलीफानें मुसुलमानांचे प्रचंड आरमार तयार केलें व आपल्या विजिगीषेला समुद्रमार्ग मोकळा केला. या आरमाराच्या साहाय्यानें माल्टा, -होडस, ग्रीस वगैरे देश मुसुलमानांनीं जिंकले. ६५२ त अलेक्झांड्राजवळ बायझ्रशियम आरमाराचा पराभव झाला. अशा रीतीनें सिंधु व ऑक्सस नद्यांपासून अटलंटिक महासागरापर्यंत मुसुलमानी सत्तेचा दरारा बसला होता. पण खुद्द मदीना येथें खलीफाचा खून झाला त्या वेळी त्याच्या संरक्षणाला जवळपास कोठेहि सैन्य नव्हतें. देशांत अशांतता पसरली होती. महंमदाचा जांवई (फतीमाबिबीचा नवरा) अल्ली हा उस्मानानंतर खलीफ झाल. पण त्यालाहि अंतःकलह मिटवितां येईना व उस्मानाप्रमाणें तोहि या वैराला बळी पडला. या वेळीं खलीफतींत ताकद राहिली नाहीं. खलीफ कोणीं व्हावें याविषयीं एकसारखीं भांडणें चालू असत व त्यामुळें देशांत तट पडून परदेशांत तरवार गाजविण्याचें काम तहकूब राहिल्यासारखें झालें.