प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १७ वें.
खलीफत व इस्लामाचा प्रसार.
दरवेशीं पंथ:- उलेमा पंथापेक्षांहि या दरवेशी पंथाचें वजन तुर्कीसमाजावर अधिक आहे. ओटोमन साम्राज्याच्या काळापासून यानीं आशियामायनरमध्यें महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत. जुन्या ख्रिस्ती लोकांनां हळूहळू मुसुलमान बनविण्याचें काम यानींच केलें. यापैकीं मौलवी पंथ सर्वांत प्रसिद्ध आहे व हा 'नाच्या दरवेशांचा' पंथ म्हणून लोकांच्या परिचयाचा आहे. दुसरा रूफाई पंथ 'गुरगुरणान्या दर्वेशांचा' म्हणून प्रसिद्ध आहे. तिसरा बक्ताशी पंथ. याचा 'जॅनिझरी' शीं संबंध असल्यामुळें एकेकालीं त्याचें महत्त्व बरेंच होतें. या पंथाचीं मतें पाखंडी असल्यामुळें या पंथांतील लोकांना मुसुलमान मानितहि नाहींत. पण त्यांचा आग्रह त्यांनां मुसुलमान मानावें असा आहे. याशिवाय दुसरेहि कित्येक किरकोळ पंथ आहेत.
तुर्की बहुजनसमाजांत भोळेपणा व अंधविश्वास पुष्कळ आहे. अशा धर्मभोळेपणाच्या समजुती तुर्की मुसुलमानांत कोणत्या आहेत याची संपूर्ण माहिती अद्याप कोणी मिळविलेली नाहीं. तथापि हा विषय मोठा गमतीचा व उपयुक्तहि होईल. शिवाय तुर्की लोकांत साधुसंतांचे उत्सव व ठिकठिकाणची यात्रेचीं पवित्र स्थळें यांचेंहि माहत्म्य फार आहे. यांत कित्येक जुन्या बायझँशियन शहरांतील साधुपुरुषांचाहि समावेश झालेला आहे. स्त्रीपुरूषांनीं वाचावयाजोगे धार्मिक ग्रंथ पुष्कळ आहेत. ते जुन्या ओस्मानली तुर्कांच्या काळचे असल्यामुळें त्यांतील कित्येक शब्द आजच्या वाचकांनां समजत नाहींत; तथापि लोकांची त्या ग्रंथांविषयीची भक्ति कायम आहे. यापैकीं महंमदीय व अहंमदीय हे दोन ग्रंथ फार प्रसिद्ध आहेत. तुर्की वाङ्मयाचा इतिहास पाहूं इच्छिणारांनां हे ग्रंथ उपयुक्त आहेत; पण देवज्ञानविषयक माहिती त्यांत अगदीं अल्प असल्यामुळे सदरहू विवेचनांत त्यांचा अधिक परामर्ष घेण्याची जरूर नाहीं. इल्मा-इ-हाल नामक वाङ्मयविभागांत लहान लहान ग्रंथ असून त्यांत मुसुलमानी धर्माची प्रमुख तत्त्वें प्रश्नोत्तर स्वरूपांत समजाऊन सांगितली आहेत.