प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण ३ रें.
ईजियन संस्कृति.
उगम. - कीट बेटांतील पुराणवस्तू जास्त जास्त सांपडत गेल्यामुळें ही संस्कृति किती काळ टिकली व ती अव्याहत कोठपर्यंत चालू होती या प्रश्नाचें उत्तर सध्यां देतां येतें. तिचा उगम मानववंशशास्त्रज्ञांच्या मतें प्रत्येक स्थानाच्या प्रागौतिहासिक युगांपैकीं प्रास्तरायुध युगाच्या उत्तरकालांत झालेला आहे असें दिसतें. ती तीन हजार वर्षे अविच्छिन्नपणें अस्तित्वांत होती. वरील विधान करण्यास पुरावा एवढाच आहे कीं, क्रीट बेटांत जेथें पुराणवस्तूंच्या शोधांकरितां खणलें आहे, तेथें प्रास्तरायुध युगांतील अवशेष त्याच थरांत सांपडतात. त्याला लागूनच उत्तरसंसकृतिनिदर्शक नक्षीकाम केलेले मातीच्या भांड्याचे तुकडे सांपडतात.
यानंतर लगेच ब्रांझयुगास सुरुवात होते. ब्राझ युगाचे मुख्य तीन भाग कल्पिले आहेत व या तीन भागांचें आठ पोटविभाग करितात. मातीचीं भांडी करणें व त्यांवरील नक्षीकाम या कालांची वाढ व तींत आपोआप होणारे फरक सारखे चालू होते असें दिसतें.
या फेरबदलामध्यें बाहेरच्या कलेचा परिणाम झाला नाहीं तर अंतस्थ सुधारणा झाली. सुधारणा बाहेरची आली नाहीं म्हणण्यास कारण या युगाच्या थरांत दुसऱ्या परकीय देशांतील कलांचे अवशेष येथें क्वचितच आढळतात.
येथल्या संस्थासंप्रदायाविषयीं माहिती फारच थोडी आहे. त्यांच्या परमार्थविषयक विचारांकडे पाहिलें तर सृष्टीतील शक्तींच्या पूजेपासून अवतारोपासनेपर्यंत जी जी स्थित्यंतरें दिसतात, तीं तीं या लोकांत संशोधकांस आढळून येतात.