प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १२ वें.
समाजरूपांतराचे नियम आणि हिंदुसमाजाचें भवितव्य.
जातींचा व्यक्तींवर ताबा.- संप्रदायसंस्थेमार्फत जातिभेद मोडणें म्हणजे काय, तर मनुष्याला आपल्या जातिसमुच्चयांतून ओढून संप्रदायरूपी जातीस जोडावयाचें. नुसती जातिभेद नसावा म्हणून होणारी ओरड निष्फळ होते. हिंदुस्थानाचें समाजस्वरूप समुच्चयसंहतीचें आहे. व्यक्ति संहतीचें नव्हे हें मागें सांगितलेंच आहे. समुच्चयसंहतीची व्यक्तिसंहति बनवावयाची म्हणजे त्याबरोबर कोणकोणत्या क्रिया होणार हें पाहूं. प्रत्येक व्यक्ति आपल्या समुच्चयाच्या तावडींतून सोडवावयाची आणि सर्व समाजाला एक केंद्र उत्पन्न करून त्यास त्या व्यक्ती जोडावयाच्या हा जो एवढा खटाटोप व्हावयाचा हा केवळ समाजाचें मत जातिभेद नसावा असें झाल्यानें होत नाहीं. प्रत्येक व्यक्तीस आकर्षण करणारा असा बलवान केंद्र उत्पन्न झाला पाहिजे तर त्या केंद्राकर्षणामुळें व्यक्तींचें आणि पूर्वगत समुच्चयांचें आकर्षण दृढ होत जाईल. वीस कोटी प्रजेस आपल्याकडे ओढून तें बंधन बलवान करणारा आणि पुढें त्या बंधनाविषयींच्या भक्तीमुळें जुन्या बंधनास दुर्बल करणारा असा केन्द्र उत्पन्न होणें फारच कठिण आहे. असा केंद्र आपल्या समाजांत अजून उत्पन्न झालेला नाहीं. ख्रिस्ती व मुसुलमान लोकांनीं मात्र निरनिराळ्या जातींतील माणसें आपणांकडे ओढलीं आहेत.
ख्रिस्ती व मुसुलमान जगांत जातिभेद नाहीं असें आपण समजतों पण ती गोष्ट सर्वांशीं खरी नाहीं. बहुतेक मनुष्यांचीं लग्नें स्थानिकच होतात आणि फारच थोड्यांचीं आपल्या समुच्चयाच्या बाहेर होतात. उच्चनीचतेचा प्रश्न समाजांतील तत्त्ववेत्त्याच्या मनांत नसला तरी आपल्या समूहाच्या बाहेर लग्न करणें हें फारच थोड्या प्रमाणांत शक्य असतें. बेदुइन बायका पैशाकरितां दुसर्या जातीच्या मनुष्याबरोबर तात्पुरता व्यभिचार करतील तथापि दुसर्या जातीच्या मनुष्याबरोबर त्या लग्न करणार नाहींत. याप्रकारचीं अनेक उदाहरणें वेस्टरमार्क यानें विवाहसंस्थेच्या इतिहासांत (History of Human Marriage) दिलीं आहेत. हार्वर्डचा प्रो. रिप्ले यानें ‘युरोपांतील जाती’ या ग्रंथांत असें दाखविलें आहे कीं मोठमोठ्या राज्यक्रान्त्या होवोत, मोठमोठे सामाजिक फेरफार होवोत, पण यूरोपांतील बहुतेक लोक आपआपल्या जागेला चिकटून राहिले आहेत. त्यांचीं लग्नेंहि स्थानिक होतात आणि भूभागावर जातींची प्रादेशिक व्याप्ति जशी अनेक शतकांपूर्वीं होती तशीच जवळ जवळ आजहि टिकली आहे. हिंदुस्थानामध्यें सध्यांच्या चार पांच हजार जातींपैकीं बर्याचशा जाती राष्ट्रस्वरूपाच्या आहेत आणि कांहीं जीवनव्यवसायाच्या वैशिष्ट्यामुळें उत्पन्न झाल्या आहेत. जीवनव्यवसाच्या वैशिष्ट्यामुळें जे संघ अगर श्रेणी उत्पन्न झाल्या त्यांचा ताबा सभासदावर दिवसानुदिवस अधिक वाढत गेला आणि त्यांस जातीचें स्वरूप प्राप्त झालें असें दिसतें. जेव्हां रोमन साम्राज्य दुर्बल होत गेलें तेव्हां त्याबरोबर आर्थिक अडचणीहि नवीन नवीन उत्पन्न होत गेल्या आणि त्यावेळेस व्यवसायविशिष्ट ज्या श्रेणी होत्या त्या श्रेणींनीं आपल्याच हातीं धंदा राखण्यासाठीं श्रेणीमध्यें इतरांचा प्रवेश होऊं देण्यास अडचणी फार ठेवल्या होत्या आणि प्रत्येकानें लग्नहि आपल्या श्रेणीच्या मनुष्याशींच केलें पाहिजे असा नियम केला होता. त्यामुळें इटलीमध्यें व्यवसायविशिष्ट जाती हिंदुसमाजासारख्याच पडत होत्या. याचें वर्णन प्रो. डिल यांनें आपल्या ग्रंथांत केलें आहे.